भगवा झेंडा आणि जरीपटका
"भगवा ध्वज आणि जरीपटका “ हि दोन्ही निशाणी छत्रपतींच्या कुळात पूर्वापासून प्रचलित होती . जर्झर ( इंद्राचा ध्वज ) आणि कपटक ( कापडाचा तुकडा ) हे दोन शब्दांपासून “ जर्झरीकपटक “ हा शब्द तयार झाला. त्याचा अपभ्रंश होऊन “ जरीपटका “ हा शब्द अस्तित्वात आला . अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यास त्याचा पदभार स्वीकारताना त्यास छत्रपतींकडून मानाची वस्त्रे व अलंकार तसेच काही वस्तू त्यांच्या पदाप्रमाणे त्यांच्या सन्मानार्थ व स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी दिल्या जात असत. “ जरीपटका “ हे निशाण अष्ट
प्रधान मंडळातील पेशवे , सेनापती व प्रतिनिधी यांना देण्यात येत असे . छत्रपती थोरले शाहू महाराजांनी स्वराज्याचा लष्करी व मुलकी कारभार पेशव्यांच्या स्वाधीन केला . त्यामुळे पेशवे स्वारीवर जात किंवा युद्धप्रसंगी “ जरीपटका “ हे निशाण पेशव्यानसोबत असे. त्यामुळे “ जरीपटका “ हे पेशव्यांचे निशाण असा समज जनमानसात रूढ झाला.
भगवा झेंडा आणि जरीपटका यांचे काही संदर्भ आपणास निरनिराळ्या साधनांत आढळून येतात ते पुढीलप्रमाणे
( इतिहासाच्या सहली :- य.न.केळकर ) अष्टप्रधानांच्या इतिहासात “ छत्रपती महाराज यांची स्वारी चालण्याची रीती “ या प्रकरणात छत्रपती व सेनापती यांच्या निशाणांचा क्रम दिला आहे. क्रमाप्रमाणे एकामागे एक
( १ ). पुढे जरीपटका व भगवे निशाणाचे दोन हत्ती ( छत्रपतींचे )
( २. ) प्रधान व सेनापती यांचे जरीपटक्याचे हत्ती .
( ३.) सर्व फौजेतील निशाणे पागा करवल लोक.
भोसल्यांचे कुलाचार ( सातारच्या छत्रपतींचा खाजगीकडील जाबता अथवा खासगी खात्याचे नियम ) यातदेखील आपणास भगवा झेंडा व जरीपटका याविषयीच्या नोदी आढळून येतात.
भोसल्यांचे कुलाचार ( जाबता पोशाखखाना ) :- दसऱ्याबद्दल वैगरे दागिने जरीपटका व भगवे निशाण व आबादगीरे व बाणबैरागे व लागी व कवडी हे नवे झाल्यास , जुने दागिने गवसणी अस्तरासुद्धा परत जमादारखान्याकडे यावे म्हणोन कलम लिहिलें आहे . त्याप्रमाणे येत जातील.
भोसल्यांचे कुलाचार ( जाबता जिराईतखाना ) :- निशाण भगवे व जरीपटक्यास बकरें व नैवेद्य येतो त्यापैकीं केसरकर यांस मुंडी व फरा एक , बाकी निमे राहील तें भोसले निमे व आम्ही निमे म्हणोन कलम लिहिले आहे. त्यास शिरस्ता चालत आल्याप्रमाणे करणे.
भोसल्यांचे कुलाचार ( जाबता खानजाद ) :- केसरकर यांच्याकडील कोणी न आल्यास , हत्तीवरील दोन्ही निशाणे आम्ही धरावी म्हणून कलम लिहिले आहे. त्यास ज्या भोसल्यास आज्ञा होईल त्याने धरावे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत येणारे झेंड्याचे वर्णन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा भेटीवेळीस २९ मे १६६६ च्या राजस्थानी पत्रात पत्र क्र.२१ ( shivajis visit to aurangzib at agra ) प्रत्यक्षदर्शी कुंवर रामसिंहाचा अधिकारी परकलदास याने शिवाजी महाराजांच्या लावाजम्याचे व सैन्याचे तसेच शिवाजी महाराजांचे वर्णन केले त्यात निशाणीच्या झेंड्याचे वर्णन पुढीलप्रमाणे येते.
‘सेवाजी के नारंजी सीदरयाई का निसान सुनहरी छापा का छाप्पा चालौ छे जी ‘ “ हाथी मोंढा आगे धरया , त्यां उपरी निशान “
शिवाजी महाराजांचे निशाण नारंगी रंगाचे रेशमी कापडाचे आहे. त्यावर सोनेरी नक्षीकाम केलेला शिक्का आहे. सर्वात पुढे गजराज त्याचं निशाण घेऊन चालतो “
ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ३ , रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था ( श्री. शं. ना. वत्स जोशी ) :- भगवा ध्वज रायगडावर हा ध्वज फडकत असे . आणि त्याकरिता प्रत्येक वर्षी “ जोट “ कापड व तें रंगविण्यास “ काय गेरू “ ह्यांची खरेदी नोंदली आहे.
पेशवे दफ्तर खंड २६ पत्र क्र. १९७ दिनांक :- २५-१०-१७५२ सखुबाई निंबाळकर यांनी महाराणी ताराबाई भोसले यांना महादजी निंबाळकर यांच्याविषयी तक्रार केली त्यात भगव्या झेंड्याचे वर्णन पुढीलप्रमाणे येते :- राजश्री पेशवे यांची पत्रे आली जे अविलंबे स्वार होऊन येणें . त्यावरून बमयेफौज चिरंजीव बाबा पेशव्याकडे साहेबाचे ( छत्रपतींच्या ) भगवे निशाणाची सेवा करावी यैसे जाणोन गेले.
इंग्रज अधिकारी मेजर हेन्री टोन त्याच्या “ The Asiatic Annual Register, Or, a View of the History of Hindustan and of the Politics, Commerce and Literature “ या पुस्तकात तो जरीपटक्याचे वर्णन पुढीलप्रमाणे करतो :-
"In the great durbar of Poonah all the higher offices are hereditary. The dewan , furnavese , chitnavese , and even the commander in chief , or holder of the jerry-put
The jerry-put is a small standard, made of cloth of gold, or, as it is called, jarre . It is cut swallow tailed and does not exceed the size of a common handkerchief . This is the ensign of the empire, and is never displayed but when the peshwa takes the field in person.
जरीपटका हे जरीच्या कपड्याचे लहान आकाराचे असते. सर्वसाधारण हातरुमाला पेक्षा आकाराने मोठे नसून स्वालो पक्षाच्या शेपटी सारखे मध्ये कापलेले असते. मराठा साम्राज्याचे चिन्ह असून , पेशवे स्वतः उपस्थीत असतील तरच हे निशाण लावले जाते. "
( ऐतिहासिक पोवाडे :- य.न.केळकर ) मराठ्यांचा काव्यमय इतिहास म्हणजे ऐतिहासिक पोवाड्यात देखील आपणास भगवा झेंडा व जरीपटका याविषयीच्या अनेक नोदी आढळून येतात. पोवाड्यांची विश्वसनीयता व त्यातील अतिश्योक्तीपणा ह्या दृष्टीने पोवाडे इतिहासाच्या दृष्टीने दुय्यम साधन आहे तरी त्यातील भगवा झेंडा व जरीपटका संबंधी काही नोंदी पुढीलप्रमाणे
परशुरामभाऊची कर्नाटकावरील स्वारी ( शाहीर – नरो त्रिंबक )
छत्रपतीचा भगवा झेंडा वैरी दूर पळती // जरीपटक्याशी घेऊन निघाले सेना गुण घेति /
खर्ड्याच्या लढाईचा तिसरा पोवाडा ( शाहीर – कुशाबा )
झांगड झांगड नौबत झडे , श्रीमंती भगवे झेंडे उडे , कानड लोक फाकडे , रांगडे मुबलक / दिले अटकेवर जरीपटका करितो लखलख , भाले बोथाट्या , भाले बरच्छ्या , हौदे अंबारी सरशानिरशा //
भगवा झेंडा व जरीपटका हे छत्रपतींचेच निशाण असून भगव्या झेंड्यासोबत जरीपटका युद्धभूमीवर व एखाद्या स्वारीच्या ठिकाणी डौलाने फडकत असे.
सौजन्य, साभार
नागेश सावंत


Post a Comment
0 Comments