Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*असा रंगला अमृतोत्सव*



*असा रंगला अमृतोत्सव*

 

 औराद शहा ता:१२ सीमावर्ती ज्येष्ठ नागरिक संघ औराद शहाजानी यांच्या वतीने नवव्या वार्षीक उत्सवाच्या निमित्ताने पंच्याहत्तर वर्षा पेक्षा जास्त वय झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा अमृतमहोत्सव पंडित वीरभद्रजी आर्य विद्यालय औराद शहाजानी याठिकाणी विविध कार्यक्रमाने संपन्न झाला.

 

 दिवंगत जनरल बिपिन रावत व त्यांचे सहकारी यांच्यासह यावर्षी मृत्यू पावलेल्या औराद नगरीतील ज्येष्ठ नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुप्रसिद्ध किर्तनकार गणपतराव सुतार गुरुजी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव सर, प्रमुख अतिथी प्रदेश संघटक जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र सतीश हाणेगावे, कोषाध्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद औरंगाबाद विभाग डी.बी.बरमदे सर, सीमावर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार राठी, कथाकथनकार- साहित्यिक गोपाळराव शिंदे गुरुजी, सा.तेरणातीरचे संपादक पी.आर.पाटील, गणपतराव सुतार गुरुजी, रावसाहेब घाटगेसर इत्यादी मान्यवरांचा येथोचित सत्कार संपन्न झाला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अशोक शिंदे यांनी ज्येष्ठासाठी संदेश देणारे गीत गायले. या आठवड्यातील साप्ताहिक तेरणातीर या अंकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

 

ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याला पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सव अत्यंत रंगतदार व उत्साहाच्या वातावरणामध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचे मुखपत्र देऊन हा अनुपम सोहळा संपन्न झाला. यात प्रामुख्याने सामाजिक बांधिलकी जोपासत कार्यरत असलेले मा. गोपाळराव शिंदे गुरुजी, विजयकुमार राठी, काशिनाथप्पा सजनशेट्टी, पी. आर. पाटील सर, गोविंदराव वाघमारे, लिंबाजी अनिगुंटे, बळीराम जाधव सर, रघुनाथ कत्ते, भगवानराव पेटकर, एस.के. येणेगुरेसर सर, काशिनाथ मरगणेसर, वाहब शेखसर, पंच्यान्नव वर्षाचे राजेंद्र डोईजोडे इत्यादींचा यात समावेश होता.



 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विजयकुमार राठी यांनी केले. कथाकथन व मनोगत पर विचार मा. रावसाहेब घाटगेसर, गोपाळराव शिंदे गुरुजी, गणपतराव सुतार गुरुजी, पी. आर. पाटीलसर यांनी अत्यंत रंगतदार पद्धतीने मांडले. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डी.बी. बरमदे सर यांनी ज्येष्ठांची जीवनशैली, त्यांचे प्रश्न, जगण्याचा खरा अर्थ त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समोर अत्यंत प्रभावी व परिणामकारक शैलीमध्ये व्यक्त केले. आपल्या अमोघ व गतिमान भाषाशैलीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ नागरिकांकडे समाज व राष्ट्राला देण्यासारखे खूप काही असून त्यांनी ही ज्ञानाची शिदोरी मुक्तपणे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून वाटली पाहिजे. निश्चितच त्यातून अनेकांच्या जीवनाला उजाळा मिळेल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केला. 

 

सतीश हानेगावे यांनी ज्येष्ठ नागरिक म्हणजे या देशातील चालते-बोलते अनुभवाचे विद्यापीठ असून या ज्ञान व अनुभवाच्या विद्यापीठाला समजून घेण्यामध्ये आम्ही सर्वजणच कमी पडलो याची खंत व्यक्त केली. अशा ज्येष्ठ नागरिकांनी विविध क्षेत्रांमध्ये जीवनाची अनेक दालने समृद्ध करून व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्राला मौलिक योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. समाज सदैव आपल्या पाठीशी उभा राहील अशाप्रकारची ग्वाही दिली. व ज्येष्ठ नागरिकांनी जागोजागी जिथे संधी मिळेल तिथे व्यक्त झाले पाहिजे व जीवनातील ताण-तणाव आणि दुःखातून मुक्त झाले पाहिजे अशी प्रामाणिक भावना व्यक्त केली. समाजातील असाह्य, पीडित असलेल्या व कुटुंब, समाज यांनी टाकून दिलेल्या वृद्धांची समस्या आज देशामध्ये वाढत चाललेली आहे. अश्यांसाठी हा संघ काही करू शकतो का? अशा प्रकारचा प्रस्ताव त्याने ज्येष्ठ नागरिक संघासमोर ठेवला. 


 या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना, माजी मुख्याध्यापक शिवाजीराव जाधव सर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचा आपल्या शब्दांमध्ये यथोचित गौरव केला. लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही झाला नसेल अशा प्रकारचा सुंदर कार्यक्रम औराद नगरीतील पंडित वीरभद्राजी आर्य विद्यालयात घेण्यात आल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. औराद नगरीतल्या अनेकांना आपल्या आयुष्यात स्वतःचा अमृत महोत्सव डोळ्याने पाहण्याचा स्वतःला योग आल्याबद्दल त्याने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांशी सुसंवाद साधण्याची संधी मिळते व अशा प्रकारच्या कार्यक्रमाची ज्येष्ठ नागरिकांना जशी गरज आहे तशीच समाजालाही गरज आहे याचे प्रतिपादन त्यांनी केले. कुटुंब आणि समाज यांनी टाकून दिलेल्या वृद्धांसाठी निश्चितच ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून काही नवीन काम होत असेल तर निश्चितच ती समाजाची गरज आहे याचे त्यांनी समर्थन केले.

 

 या कार्यक्रमाचे आभार तात्याराव लांडगे सर यांनी मानले.

आपल्या ओघवत्या भाषेमध्ये डॉ. प्रकाशसिंह कच्छवा यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.

सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. औराद नगरीतील जवळपास पंचावन्न ते साठ ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते...

 

 तुकोबावाणी ई वार्तांकन:

 सतीश हानेगावे

(प्रदेश संघटक जगद्गुरू तुकोबाराय 

 साहित्य परिषद, महाराष्ट्र)

Post a Comment

0 Comments