Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*लातूरमध्ये अद्यावत व सुसज्ज विज्ञान केंद्राची निर्मिती करणार”खासदार सुधाकर शृंगारे यांचे प्रतिपादन*

“लातूरमध्ये अद्यावत व सुसज्ज विज्ञान केंद्राची निर्मिती करणार”
खासदार सुधाकर शृंगारे यांचे प्रतिपादन 
लातूर :-(प्रतिनिधी)
संपूर्ण देशात लातूर शहराने शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती साध्य केली आहे. आज लातूर पॅटर्न हा सर्व देशभर सर्वांच्या परिचयाचा आहे त्यामुळे लातूरमध्ये तंत्रज्ञानयुक्त, सुसज्ज आणि अद्यावत विज्ञान केंद्राची लवकरच निर्मिती लवकरच केली जाईल आणि यासाठी केंद्रसरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन खासदार सुधाकर शृंगारे यांनी बोलताना व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर  यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी स.११वा. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये “द्वितीय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ” संपन्न झाला यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.सांबप्पा गिरवलकर  हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी व बिजभाषक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आदिनाथ सांगवे, युवा नेत्या प्रेरणाताई होणराव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, विद्यार्थी विकास समिती समन्वयक कॅप्टन प्रा.डॅा.बाळासाहेब गोडबोले आणि परीक्षा विभाग प्रमुख डॉ.शिवप्रसाद डोंगरे आदी मान्यवर उपस्थिती होती. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी परीक्षा विभाग प्रमुख डॉ.शिवप्रसाद डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मान्यवरांच्या समवेत प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, डॉ.गीता गिरवलकर आणि चमुनी स्वागत गीत व विद्यापीठ गीत सादर केले. 
पुढे बोलताना खासदार सुधाकर शृंगारे म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये आपले करिअर बनवले पाहिजे. आजच्या युवकांनी संपूर्ण देशाचे नेतृत्व केले पाहिजे. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून आणले असून लातूर जिल्हा हा शैक्षणिक विकासासोबतच औद्योगिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करेल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही ते म्हणाले. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेद्वारे चालणाऱ्या सर्व युनिट्समध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक व गुणवान बनवले जाते असे सांगून पदवी प्राप्त विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. 
यावेळी बीजभाषक म्हणून बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष आदिनाथ सांगवे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये शैक्षणिक विकासासोबत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून उत्कृष्ट नागरिक निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. आपण सर्वांनी प्रेम, आनंद व निष्ठा याचा मानवी जीवनात अवलंब करून आनंदी जीवन जगले पाहिजे. आपण आपल्या जीवनात कष्ट, मेहनत आणि जिद्दीने यश संपादन केले पाहिजे असेही ते म्हणाले.  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परीक्षा विभाग प्रमुख डॉ.शिवप्रसाद डोंगरे म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडने आमच्या महाविद्यालयाला पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाची संधी उपलब्ध करून दिली आहे. आज शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले.  
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम आणि समाजकार्य अशा पाच विविध शाखांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालय आहे. आपल्या जीवनामध्ये पदवी प्रमाणपत्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे आपण सर्व आनंदाने त्याचा स्वीकार करावा असे ते म्हणाले.  
यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष ॲड.सांबप्पा गिरवलकर म्हणाले की, आज महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि समाजकार्य पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत पदवी प्रदान केली जात आहे याचा मला खूप आनंद होत आहे असे सांगून पदवीचा आपण भविष्यामध्ये आपल्या उज्वल भवितव्यासाठी उपयोग करावा असे ते म्हणाले.  
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कला शाखेतील ८२, वाणिज्य शाखेतील १५३, विज्ञान शाखेतील ७४, पदव्युत्तर विभागातील १३ आणि बीएसडब्ल्यू विभागातील ३२ असे एकूण ४७१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 
या कार्यक्रमाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई, क्रीडा विभागातील डॉ.भास्कर रेड्डी, प्रा.आशिष क्षीरसागर, डॉ.दिनेश मौने, डॉ.दीपक चाटे, डॉ.गुणवंत बिरादार, डॉ.सदाशिव दंदे, डॉ.यशवंत वळवी, डॉ.आनंद शेवाळे, डॉ.शीतल येरुळे, डॉ.राहुल डोंबे, योगिराज माकने, राम पाटील यांच्यासह सर्व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. 
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रत्नाकर बेडगे, प्रा.सुरेन्द्र स्वामी यांनी केले तर आभार डॉ.  श्रीकांत गायकवाड यांनी मानले.
या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments