*ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मनोहरराव गोमारे यांना सम्यक समाज संघाचा “नीतीप्रज्ञ न्याय रक्षक पुरस्कार” जाहीर*
दि.०४ डिसेंबर २०२२ रोजी स.११ वा. भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे होणार पुरस्कार सोहळा
लातूर :-( प्रतिनिधी)
आपण १५ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र दिनानिमित्त देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. “हर घर तिरंगा” हा नारा देऊन देशवासीयांच्या मनात राष्ट्र भावना जागृत करण्याचा उपक्रमही राबवला गेला. परंतु असे असले तरी आज देशात जाती-जाती आणि धर्मा-धर्मात द्वेष भावना पसरवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशात असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देश दंगलीच्या उंबरठ्यावर तर उभा नाही ना? अशी शंका सामान्य नागरिकांच्या मनात जाणवत आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय संविधानही धोक्यात आले आहे का? असे प्रश्न चिन्ह ही सामान्य नागरिकांच्या मनात उभे आहेत. या अनुषंगाने सम्यक समाज संघाच्यावतीने विविध ठिकाणी संविधान सन्मान परिषदेचे आयोजन केले जात आहे. शाळा, महाविद्यालय आणि वस्तीगृहात जाऊन उद्याचे जबाबदार नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक समता, बंधुभाव आणि धर्मनिरपेक्ष ही तत्त्वे कशी महत्त्वाची आहे. त्यांची विचार पेरणी समाज संघाच्यावतीने केली जात आहे.
त्याचप्रमाणे या राष्ट्रीय कार्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार व सन्मान देण्याचा उपक्रम सम्यक समाज संघाने हाती घेतला आहे. याअनुषंगाने सम्यक समाज संघ व धम्म भवन चॅरीटेबल ट्रस्ट, कोल्हापूरच्यावतीने लातुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मनोहरराव गोमारे यांना “नीतीप्रज्ञ न्यायरक्षक” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार धर्मराज हल्लाळे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम रविवार दि.०४ डिसेंबर २०२२ रोजी स.११ वाजता भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्यक समाज संघाचे अध्यक्ष ॲड.मंचकराव डोणे हे उपस्थित राहणार असून ॲड.विवेकानंद घाडगे (उपाध्यक्ष बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा) आणि ॲड.प्रकाश मोरे (कोल्हापूर) यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असून प्रमुख अतिथी म्हणून ॲड.अण्णाराव पाटील (सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा), ॲड.बळवंतराव जाधव (माजी सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा), ज्येष्ठ विचारवंत डॉ.सुरेश वाघमारे, मनिषाताई तोकले, डॉ.बाळासाहेब गोडबोले आणि ॲड.करुणा विमल (कोल्हापूर) यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समिती सदस्य प्रा.डॉ.संजय गवई, बी.पी. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ.वेदप्रकाश मलवाडे, अनिल म्हमाने (कोल्हापूर), बी.एम.कांबळे (माजी अप्पर जिल्हाधीकारी), प्रा.आर.आर.सोनकांबळे (पुणे), ॲड.निर्मलाताई नगराळे (पुणे) आदिनी केले आहे.

Post a Comment
0 Comments