निलंगा-
उभ्या पिकाचे नुकसान करणाऱ्या हिंस्त्र प्राणी हरीण, डुक्कर, माकड अशा प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी जिल्हा वनअधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे पण आज रोजी शेतकरी हा कंगाल झालेला आहे. प्रत्येक वर्षी अतिवृष्टी,आवर्षण या नैसर्गिक संकटामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सावकाराकडून चक्रवाढ व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागत आहे. कर्जाचे डोंगर सारता सारता शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच हरीण, डुक्कर, माकड या हिंस्त्र प्राण्यापासून शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच शेतकरी रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी गेले असता शेतकऱ्यावर प्राणी हल्ला करतात त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नैसर्गिक संकटाबरोबरच या प्राण्यांच्या संकटामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आला आहे. शेतीपासून काही हातात मिळेल या आशेने शेतकरी दिवस रात्र राब राब राबतो पण हाती काहीच लागत नाही. उरलेसुरले हरीण डुक्कर हे हिंस्त्र प्राणी नुकसान करत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहेत. या हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी जिल्हा वनअधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे,मनोज शिंदे, सन्मुख बरदाळे,रमेश धुमाळ,संतोष धुमाळ,युसुफ शेख, बालाजी मिरगाळे, लाईकपाशा शेख, इकबाल पटेल इ. स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments