शौर्य चक्र पुरस्कार प्राप्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा सत्कार संपन्न
लातूर :-( प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना नक्षलवाद्याविरोधात कार्यवाही करताना अतुलनीय धाडस दाखविल्याबद्दल लातूरचे कार्यनिष्ठ व कार्यतत्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना दिल्ली येथील दरबार सभागृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते नुकतेचा शौर्य चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते शाल, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, संजय जगताप, डॉ.संजय गवई यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडचिरोली जिल्ह्यातील मार्डीनटोला जंगलात १२ नोव्हेंबर २०२१ रोजी नक्षलवाद्याविरोधात झालेल्या चकमकीत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मोठी कामगिरी केली होती. या चकमकीमध्ये एकूण २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. या कामगिरीची दखल घेऊन आयपीएस अधिकारी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना शौर्य चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या इतिहासात व शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शांतता काळात दिले जाणारे शौर्य चक्र हे तिसरे मोठे पदक आहे.एरवी शौर्य चक्र, कीर्ती चक्र आणि अशोक चक्र ही पदके शांतता काळात लष्करातील वीरांना जाहीर केली जातात पण अपवादात्मक स्थितीत कर्तव्य करताना अतुलनीय साहस दाखविणाऱ्या पोलिसांना ही पदके दिली जातात. याआधी २००९मध्ये पोलीस मुंबई पोलीस दलाला शौर्यचक्राचा मान मिळाला होता. अशा पद्धतीचे शौर्य चक्र २०२२ नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलाला मिळाले आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे म्हणाले की, शासकीय सेवेमध्ये विशेष आणि महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा महाराष्ट्र शासनातर्फे नियमितपणे गौरव केला जातो. तसेच माझ्यासारखे असंख्य प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी आपले कार्य कर्तव्यनिष्ठेने करतात. ही परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. पोलीस विभागातील प्रत्येक वरिष्ठ अधिकारी हे महत्वपूर्ण प्रसंगी प्रत्यक्ष फिल्डवर कार्य करतात. त्यामुळे समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखली जाते असे सांगून त्यांनी नुकतेच पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले निलेश श्रीकांत गायकवाड यांच्याबद्दलही गौरवोद्गार काढून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नक्षलवाद्यांसोबत झालेला थरार हा त्यांच्या शब्दांमध्ये व्यक्त करीत असताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. मात्र ही कामगिरी बजावत असताना इतर पोलीस कॉन्स्टेबलने केलेल्या कार्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले आणि केंद्र आणि राज्य शासनाचे विशेष आभार मानले. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments