*जाणून घ्या,'मराठ्यांच्या लढायांचा इतिहास'*
काळ कर्त्या शिवराम महादेव परांजपे यांनी सुमारे ९५ वर्षांपूर्वी लिहिलेले मराठ्यांच्या लढायांवरील लेख चित्रमय जगत् च्या निरनिराळ्या अंकातून (सलग नव्हे) प्रसिद्ध झाले होते. १९२५ ते १९२८ या कालावधीत ही लेखमाला प्रसिद्ध होत होती त्यानंतर १९२८ मध्ये ही पुस्तक रूपाने प्रकाशित झाली. त्याच्या पुढच्या तीन आवृत्ती मात्र पुण्याच्या वरदा प्रकाशनाने काढल्या. नुकतीच त्याची चौथी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. या पुस्तकामध्ये साधारणपणे १८०२ ते १८१८ या कालावधीमध्ये झालेल्या प्रमुख लढाया घेतल्या आहेत. भरपूर नकाशे, इंग्रज लेखकांची अवतरणे आणि छायाचित्रे यांनी हे पुस्तक समृद्ध झालेले आहे. १८०२-३ या वर्षात प्रथम ग्वाल्हेरचे शिंदे आणि नागपूर
चे रघोजीराव भोसले या दोघांनी मिळून इंग्रजांशी लढाई सुरू केली. त्यापैकी असई आणि आरगाव या दोन लढाया निजामाच्या सरहद्दीवर महाराष्ट्रात झाल्या, परंतु यानंतर दौलतराव शिंदे यांच्या हाताखालील फ्रेंच सेनापती आणि मराठे सरदारांनी कोईल, अलिगड, दिल्ली, लासवारी वगैरे ज्या लढाया केल्या, त्याचे रणक्षेत्र दिल्लीच्या आसपास होते. यानंतर १८०४-५ या वर्षी इंदूरच्या यशवंतराव होळकर यांनी मथुरा, दिल्ली, भरतपूर वगैरे उत्तर हिंदुस्थानातील क्षेत्रांमधून लढाया करून इंग्रजांना नामोहरम केले. या लढाया शिंदे, होळकर, भोसले यांच्याशी तह होऊन संपल्या, त्या फिरून १८१७-१८ वर्षी पुण्यातील कोरेगाव, खडकी, अष्टे वगैरे ठिकाणी मुख्यत्वे करुन झाल्या. या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पुस्तकात वाचायला मिळते. मराठ्यांच्या जय-पराजयाची कारणे जाणून घेता येतात. केवळ इंग्रजांविरुद्धच झालेल्या प्रमुख लढायांचा हा दस्तऐवज आहे. यात सर्व लढाया कालानुक्रमे आलेल्या नाहीत, मात्र तशा का नाहीत याचे विवेचन प्रस्तावनेत वाचणेच योग्य होय. यातील पंधरा लेख म्हणजे खडकीची लढाई, येरवड्याची लढाई, कोरेगावची लढाई, अष्ट्याची लढाई, रायगड किल्ल्याची दोन स्थित्यंतरे- १६७४ आणि १८१८, महाराष्ट्रातील किल्ले, असईची लढाई, अरगावची लढाई, उत्तर हिंदुस्थानातील लढाया, अलिगडची लढाई, दिल्लीची लढाई, लासवारीची लढाई, होळकरांशी युद्ध, दीगची लढाई, भरतपुरचा किल्ला आणि इंग्लिशांचे तेथील चार पराभव हे होत. हे सर्वच भाग जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने शि. म.परांजपे यांनी या सर्व लढायांचा इतिहास मांडला आहे. त्यामुळे पुस्तक अत्यंत वाचनीय आणि माहितीपूर्ण म्हणूनच संग्राह्य असे झाले आहे. प्रकाशकाने सदर पुस्तक सवलतीत उपलब्ध करून दिले आहे.
(मराठ्यांच्या लढायांचा इतिहास, शि. म.परांजपे, वरदा प्रकाशन,पुणे 9970169302, पृ.४५५, मूल्य-४५०₹, विशेष सवलत मूल्य-३००₹)
*©डॉ.सच्चिदानंद शेवडे
*


Post a Comment
0 Comments