Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*स्वामी श्रद्धानंद बलिदान दिवस*


 स्वामी श्रद्धानंद बलिदान दिवस

(२३ डिसेंबर १९२६)

स्वामी श्रद्धानंद आर्यसमाजाचे थोर नेते आणि समाजसुधारक होते. त्यांचे मूळ नाव मुन्शीराम. जन्म २ फेबुवारी १८५६ रोजी पंजाबमधील जलंदर जिल्ह्यातील तलवन ह्या लहानशा गावी झाला. त्यांचे वडील नानकचंद ब्रिटिशांच्या पोलीस खात्यात होते. त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मुन्शीरामांच्या शिक्षणात वेळोवेळी खंड पडत गेला. तथापि त्यांच्यापाशी उत्तम बुद्धीमत्ता, ज्ञानार्जनाची ओढ आणि जागृत सदसद्विवेकबुद्धी असल्यामुळे ह्याही परिस्थितीत ते जिद्दीने शिकत राहिले वकिलीची मुख्त्यारी परीक्षा देऊन वकिली करू लागले.

विद्यार्थी असतानाच मुन्शीरामांचा विवाह झाला होता. त्यांची पत्नी शिवदेवी ही त्यावेळी केवळ बारा वर्षांची होती आणि तिला शिक्षणही मिळाले नव्हते. ह्यातूनच बालविवाहाबद्दल तीव्र विरोधाची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. बनारसला असताना एका प्रसंगामुळे मूर्तिपूजेबद्दल त्यांचे मन साशंक बनले. नित्याप्रमाणे विश्वनाथाच्या दर्शनाला ते गेले असताना एका संस्थानाच्या महाराणी मंदिरात पूजा करीत आहेत असे सांगून पोलिसांनी त्यांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही त्यामुळे ‘ मूर्तीत देव आहे काय ? ‘ असा प्रश्न त्यांना पडला. देवाच्या दारी पक्षपात, भेदाभेद असतो का ? असाही प्रश्न मनात आला. काही काळ ते नास्तिकपणाकडेही झुकले होते तथापि आर्यसमाजा चे संस्थापक दयानंद सरस्वती ह्यांच्या प्रवचनांनी ते प्रभावित झाले. त्यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि आर्यसमाजाच्या तत्त्वांचा सक्रिय प्रसार केला. वेदांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. १८९५ साली जलंदरमध्ये ‘ वैदिक पाठशाळा ‘ ही शिक्षणसंस्था त्यांनी स्थापन केली. तसेच मुलींसाठी एक शाळाही काढली. दलितांना आर्यसमाजात प्रवेश देऊन त्यांच्या उन्नतीसाठी ते झटले. प्राचीन ऋषींच्या आश्रमांच्या धर्तीवर विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी कांग्री ह्या हरद्वारजवळील गावात त्यांनी ‘गुरूकुल’ सुरू केले (१९००). संस्कृत भाषा, वेद, प्राचीन विदया ह्यांबरोबरच इंगजी व आधुनिक विज्ञाने ह्यांचा समावेश असलेला अभ्यासक्रम तेथे चालू केला. शिक्षणाचे माध्यम हिंदी होते. शाला, प्रशाला, महाविदयालय असा विकास-विस्तार करीत गुरूकुलातून पुढे पदवीधरही निर्माण झाले. १९०९ साली अखिल भारतीय पातळीवर ‘ सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभे’ची स्थापना होऊन तिचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले (१९१०). ‘ महात्मा मुन्शीराम’ ह्या नावाने ते ओळखले जाऊ लागले.

त्यांच्या पत्नी शिवदेवी ह्यांचे १८९१ मध्ये निधन झाले. त्यातच १९१४ साली हरिश्चंद्र आणि इंद्र ह्या त्यांच्या दोन पुत्रांपैकी हरिश्चंद्र देशाबाहेर निघून गेला (१९१९ नंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा वा संपर्क राहिला नाही). ह्या पार्श्वभूमीवर १२ एप्रिल १९१७ रोजी त्यांनी संन्यास घेऊन ‘ स्वामी श्रद्धानंद ‘ हे नाव धारण केले. १९१८ नंतर ते राजकारणाकडे ओढले जाऊन काँग्रेसचे काम करू लागले. १९१९ साली अमृतसर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते. तथापि गांधीजींशी मतभेद होत गेल्याने ते राजकारणापासून दूर झाले. त्यानंतर त्यांनी हिंदूंच्या संघटनाकार्यास स्वत:ला वाहून घेतले. पूर्वी अन्य धर्मांत गेलेल्या हिंदू लोकांना सन्मानाने परत हिंदू धर्मात आणणे, हा ह्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यासाठी ‘ भारतीय हिंदु शुद्धी सभे ‘च्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. १९२६ च्या मार्च महिन्याच्या अखेरीस कराची येथील अशगरी बेगम ह्या महिलेला तिच्या मुलासह त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश दिला. त्यातून मुस्लिम समाजात मोठा प्रक्षोभ निर्माण झाला. त्यानंतर काही महिन्यांनीच अब्दुल रशीद नावाच्या माथेफिरु माणसाने त्यांची हत्या केली.

स्वामीजी सद्धर्मप्रचारक व आर्य गॅझेट ह्या नियतकालिकांचे संपादक होते. आर्यसमाज अँड इट्स डिट्रक्टर्स : ए व्हिंडिकेशन (१९१०), वेद और आर्यसमाज (१९१६), आदिम सत्यार्थप्रकाश और आर्यसमाज के सिद्धांत (१९१७) अशी काही गंथरचनाही त्यांनी केली आहे. त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या स्मृत्यर्थ देशभरात ज्या संस्था स्थापन झाल्या, त्यांत ‘ श्रद्धानंद महिलाश्रम ‘ (१९२७) ही अग्रगण्य होय.

संदर्भ : मराठी विश्वकोश

साभार :- (सौजन्य) Prasanna khare



Post a Comment

0 Comments