Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*दोरा, सूतकताई, चरख्याचा इतिहास*

 दोरा, सूतकताई, चरख्याचा इतिहास - 


१) दोरा : 

दोन वा अधिक सुते (धागे) एकत्र करून त्यांस पीळ देऊन दोरा तयार करतात. सामान्यतः तीन सुते एकत्र करून पिळून नेहमीचा दोरा तयार करतात. याला तीनपदरी दोरा असे म्हणतात. असे दोन वा अधिक दोरे एकत्रित करून पिळून सहापदरी, नऊपदरी दोरे तयार करण्यात येतात. घरगुती व औद्योगिक शिवणकाम आणि विणकाम-भरतकाम यांसाठी दोऱ्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तसेच दोऱ्याचा उपयोग आवेष्टन इत्यादींसाठीही करण्यात येतो. जास्त पीळ दिलेला दोरा विणकामासाठी व कमी पीळ दिलेला दोरा भरतकामासाठी वापरतात. कापूस, रेशीम, लिनन (फ्लॅक्स) इ. नैसर्गिक सुतांपासून आणि रेयॉन, डेक्रॉन इ. कृत्रिम (मानवनिर्मित) सुतांपासून दोरा तयार करतात.


इतिहास : पुरातत्त्ववेत्त्यांच्या मतानुसार सु. २५ हजार वर्षांपूर्वी गुहांमध्ये राहणाऱ्या आदिमानवाने प्राण्याच्या कातड्यापासून पहिला दोरा तयार केला. अशा दोऱ्याचा उपयोग त्याने हाडाच्या सुईच्या साहाय्याने दोन कातडी शिवण्यासाठी केला. याच सुमारास उष्ण कटिबंधात राहणाऱ्या आदिमानवाने सालीतील तंतूंचा उपयोग दोरा तयार करण्यासाठी केला. हे दोरे पीळ न दिलेले होते. पीळ दिलेले तंतू टिकण्यास उत्तम असतात, असे आढळून आल्यामुळे आदिमानवाने वरील प्रकारच्या तंतूंना पीळ देऊन दोरा तयार केला. सु. २५ शतकांपूर्वी आदिमानवाने दोन वा अधिक तंतू एकत्र करून त्यांना पीळ देऊन दोरा तयार केला, याच मूलभूत क्रिया वापरून हल्लीही दोरा तयार करण्यात येतो. यानंतर दोरा तयार करण्यासाठी लिननचा आणि त्यानंतर कापसाचा व रेशमाचा वापर करण्यात आला. कृत्रिम तंतूंच्या शोधानंतर त्यांचाही उपयोग दोरा तयार करण्यासाठी करण्यात येऊ लागला. तथापि कापसाचा दोराच जास्त प्रमाणात वापरला जातो. लिननचा दोरा जरी बळकट असला, तरी त्याचा वापर कमी झाला आहे. तलम कापडांच्या शिवणकामासाठी रेशमी दोरा वापरण्यात येतो. लोकरीचा उपयोग दोऱ्यासाठी हल्ली करीत नाहीत.


एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत दोरे हातांनीच तयार करीत असत. १८१२ मध्ये यांत्रिक पद्धतीने दोरा तयार करण्याचा पहिला कारखाना पेस्ली (स्कॉटलंड) येथे सुरू झाला. या कारखान्यात पीळ दिलेला तीनपदरी दोरा तयार करण्यात आला. १८५० मध्ये आयझाक सिंगर यांनी शिवणयंत्राचा शोध लावला. यामुळे जलद गतीने चालणाऱ्या यंत्रावर शिवताना टिकेल अशा दोऱ्याचा शोध लागला. त्याचबरोबर दोऱ्याच्या इतर गुणधर्मांकडे लक्ष वेधले जाऊन त्यांनुसार दोरे तयार करण्यात येऊ लागले. ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, जर्मनी हे देश दोरानिर्मितीत अग्रेसर आहेत.

- दाते, अ. गं.


२)सूतकताई : 


नैसर्गिक तंतूंचा पुंजका किंवा संश्लेषित बहुवारिक तंतुद्रव्याची राशी यांच्यापासून सूत काढण्याची (तयार करण्याची) प्रक्रिया म्हणजे सूतकताई होय. या प्रक्रियेत तंतू ओढले जाऊन त्यांची लांबी एकाच वेळी परस्परव्यापी होऊन त्यांना पीळ दिला जातो. यामुळे तंतू घट्टपणे एकत्र जोडले जाऊन एक अखंड धागा किंवा सूत तयार होते. याचा अर्थ सूतकताईमुळे तंतुखंडांपासून लांब व बळकट सूत तयार होते.[ज्या द्रव्यापासून सूत कातले जाते त्या द्रव्याला तंतुद्रव्य म्हणतात. तंतुद्रव्यापासून काढलेल्या अखंड धाग्याला तंतू (फिलॅमेंट), तंतूच्या तुकड्याला तंतुखंड (स्टेपल) व त्यांच्यापासून कातलेल्या धाग्याला सूत (यार्न) म्हणतात].


तंतुखंडांपासून विणकामाद्वारे वस्त्र तयार करण्याआधी सूतकताई ही आवश्यक प्रक्रिया आहे. सूतकताईचे तत्त्व अश्मयुगापासून ते अत्याधुनिक यंत्रसामग्रीपर्यंत एकच राहिले आहे. सूत, सूत्र, सुतळी, दोरा, रज्जू व दोर यांचा वस्तू बांधण्यासाठी उपयोग झाल्याने मानवी प्रगतीचे अनेक टप्पे गाठले गेले आहेत. आदिम उपकरणे, हत्यारे, शस्त्रे व घरे यांचे घटक बांधणे अवजड वस्तू उचलणे व हलविणे जहाजांवर विविध कामांसाठी दोरांचा उपयोग करणे इ. कामांसाठी सुताचा अप्रत्यक्ष वापर होत आला आहे. उष्ण व शीत ऋतूंत वापरावयाच्या वस्त्रांचा सूत हा मूलभूत घटक आहे. अशा वस्त्रांच्या कपड्यांमुळे मानव विविध प्रकारचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) असलेल्या प्रदेशांमध्ये वस्ती करु शकला.


तंतूंना मांडीवर हाताने पीळ देऊन सूत तयार करणे ही सूतकताईची सर्वांत प्राचीन पद्घत आहे. मांडीवर तंतुद्रव्याला उजव्या हाताने पीळ देतात (वळतात) आणि डाव्या हाताने कापसासारखे तंतुद्रव्य वा त्याचा पेळू पुरवितात. काही ठिकाणी ही पद्घत अजून वापरतात. ईजिप्शियन लोक मांडीऐवजी त्या आकाराचा दगड सूतकताईसाठी वापरीत ग्रीक लोक यासाठी गुडघ्यावर वक्राकार फरशी ठेवीत, तर भारतात वातीवळण्यासाठी सहाणेचा उपयोग करतात.


प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंतच्या काळात टकळी, चाती वा चरकी व चरखा ही साधने सूतकताईसाठी वापरीत असत. तंतूंच्या पुंजक्यातून ओढून काढलेला लांब तंतू जड चातीला घट्ट बांधतात, नंतर कताई करणारा मुक्तपणे टांगत्या अवस्थेत असलेल्या चातीला हाताने वर्तुळाकार गती देतो. यामुळे पुंजक्यातून ओढून निघालेल्या तंतूंना पीळ दिला जातो. अशा रीतीने पुरेशा लांबीचे सूत तयार झाले की कताई थांबवितात आणि तयार झालेले सूत चातीवर गुंडाळतात. अशा प्रकारे सर्व क्रिया पुनः पुन्हा करुन सूत कातले जाते.


भारतात हाताने सूत कातण्यासाठी टकळी व चरखा ही साधने वापरतात, असे सूत मुख्यतः खादीच्या कापडासाठी वापरतात [ → खादी उद्योग]. जानव्याच्या सुतासारखे सूत कातण्यासाठी खेड्यात अजूनही टकळी वापरतात. टकळीवरील सूतकताईची पद्घत चातीवरील सूतकताईसारखी आहे. एका टोकाशी काहीसा आकड्यासारखा आकार दिलेली जाडसर तार व दुसऱ्या टोकाजवळ बसविलेली वजनदार तबकडी असे टकळीचे स्वरुप असते. ही तबकडी ⇨ प्रचक्रा चे किंवा जड चक्राचे काम करते. डाव्या हातातील कापसाचा पुंजका वा पेळू टकळीच्या आकड्यासारख्या टोकाला अडकवून तो हात वर नेतात. यामुळे कापसाचे तंतू ओढले जाऊन त्यांची परस्परव्यापी, जवळजवळ समांतर मांडणी होऊन तंतूंची लांब रचना तयार होते. नंतर टकळी उजव्या हाताने वर्तुळाकार फिरवून तंतूंना थोडा पीळ देतात. यामुळे तंतूंची सैलसर वात तयार होते. नंतर टांगलेल्या मुक्त स्थितीत टकळी उजव्या हाताने जोराने फिरवितात. टकळीच्या वजनदार तबकडीला संवेग मिळून तंतूंना पीळ बसत असताना ते खाली खेचलेही जातात. अशा रीतीने पुरेशा लांबीचे म्हणजे हातभर सूत तयार झाले की ते टकळीच्या तारेवर गुंडाळतात. नंतर ही सर्व प्रक्रिया पुन:पुन्हा करुन सूत कातले जाते. हलक्या स्थितीतील टकळीचे वजन पेलू न शकणाऱ्या तंतूंच्या बाबतीत टकळी जमिनीवर टेकवून सूतकताई करतात. टकळी व चाती हजारो वर्षांपासून वापरली जात असून ईजिप्तमध्ये लिननचे सूत कातण्यासाठी, तर भारतात कच्चे सुती धागे कातण्यासाठी तिचा वापर होतो.


चरखा ही सूतकताईमधील टकळीनंतरची पायरी आहे. चरख्यात एका फळीवर टकळीची उभी दांडी चातीच्या रुपात आडवी बसविलेली असते. सूतकताईचा वेग वाढविण्यासाठी यात चाती फिरविण्यासाठी एक मोठे चाक बसविलेले असते. कताई करणारा हे चाक हस्तभुजेद्वारे हातानेच फिरवतो. या चाकाभोवतीच्या वादीद्वारे चाती फिरते. सूत कातणारा डाव्या हातातील पेळूतून चातीच्या टोकाला तंतू पुरवितो व उजव्या हाताने चाक फिरवितो. डावा हात वर नेऊन पेळूतील तंतू ओढले जातात व चाक फिरविल्याने त्यांना पीळ दिला जातो. हातभर सूत तयार झाले की, ते चातीवर गुंडाळतात. सूत गुंडाळताना सूत कातले जाण्याची क्रिया थांबविली जाते. नंतर या सर्व क्रिया पुनःपुन्हा करुन सूतकताई सुरु राहते. चरखा बहुधा सर्वप्रथम भारतात तयार झाला. भारतातून तो पौर्वात्य व पाश्चात्त्य देशांत गेला, तो चौदाव्या शतकात यूरोपमध्ये गेला. भारताप्रमाणेच इंडोनेशियातही कापूस व भरड रेशीम यांची सूतकताई करण्यासाठी चरखा वापरतात. सूतकताईसाठी भारतात खडा चरखा, किसान चरखा, पेटी चरखा व बांबूचा जनता चरखा यांचा वापर केला जातो. १९४९ मध्ये चार चात्यांचा अंबर चरखा तमिळनाडूमधील एकंबरनाथ यांनी तयार केला. १९५६ मध्ये अंबर चरख्यावरील सूतकताई सुरु झाली. [→ चरखा].


 चरख्याने (वा टकळीने) हातभर सूत कातल्यावर ते चातीवर गुंडाळताना कताई थांबवावी लागते. कातणे व गुंडाळणे या क्रिया एकाच वेळी करणारा चरखा १४५० सालाच्या सुमारास वापरात आला आणि एकोणिसाव्या शतकाअखेरपर्यंत त्याचा व्यापकपणे वापर होत होता. या चरख्यात चातीची दांडी एका अक्षाचे कार्य करते. त्याच्यावर रीळ व सुताला पीळ देणारी फिरती (फ्लायर) बसविलेली असते. इंग्रजी यू (U) अक्षराच्या आकाराच्या फिरतीचे दोन बाहू रुळाच्या पलीकडे विस्तारलेले असतात. चातीच्या टोकाशी असलेल्या नेढ्यातून पेळू जातो. त्या नेढ्याखाली फिरतीच्या भुजेवरील आकड्यावरुन पेळू खाली रिळाकडे जातो. चालक चक्रावरुन रीळ व फिरती यांच्याकडे स्वतंत्र वाद्या आलेल्या असतात. त्यावरील निरनिराळ्या व्यासांच्या कप्प्यांमुळे फिरती रिळापेक्षा अधिक जलद गतीने फिरते. फिरती फिरल्याने वातीला पीळ दिला जाऊन सूत तयार होते व त्याच वेळी ते कमी गतीने फिरणाऱ्या रिळावर गुंडाळले जाते. या चरख्यामुळे सुताचे उत्पादन वाढले. १५२४ मध्ये पायाने चालविता येणारा चरखा पुढे आला व सुताच्या उत्पादनात आणखी वाढ झाली. या चरख्यात पायटा, संयोग दांडा व भुजा हे भाग जोडलेले होते. चाक पायाने फिरविता येऊ लागल्याने चालकाचा उजवा हात मोकळा राहू लागला. या चरख्यामुळे सूतकताईचे यांत्रिकीकरण झाले. यात सूत तयार होताना त्यातील बारीक भागाला जास्त पीळ दिला जातो व सुताचा अधिक जाड भाग खेचला जातो. यामुळे एकसारख्या जाडीचे सूत मिळते. नंतर हा चरखा विविध प्रकारच्या चौकटीवर बसवून त्यात सुधारणा होत गेल्या. तथापि यातील फिरती, चाती, रीळ व पायटा हे आवश्यक भाग तसेच राहिले. उत्पादित सुताची राशी, सुतामधील एकसारखेपणा व सूतकताईची गती यांच्याविषयीच्या वाढत्या अपेक्षांमधून चरख्यातील चात्या व रीळ यांची संख्या वाढत गेली.


सूतकताईचे एक यंत्र लिओनार्दो दा व्हींची यांनी १४९० मध्ये तयार केले होते. यात चात्या व एकसारखे सूत गुंडाळणाऱ्या फिरत्या होत्या. त्याला हस्तभुजाही जोडली होती. यात कताईसाठी चात्या आणि पीळ देणे व गुंडाळणे यांसाठी अनेक फिरत्या होत्या. सोळाव्या शतकात सॅक्सनी चाकाच्या रुपात चरख्यात सुधारणा झाली. यामुळे भरड लोकरीची व सुती धाग्याची अखंडपणे सूतकताई करणे शक्य झाले. सूतकताईच्या गतीतही सुधारणा झाली. परिणामी एका मागावरील विणकामासाठी ३–५ चरखे सुताचा पुरवठा करु शकत. के धोट्याच्या मागामुळे (१७३३) सुताची व त्यामुळे सूतकताईच्या यंत्रसामग्रीची मागणी वाढली. मोठ्या प्रमाणावर सुताचे उत्पादन करणाऱ्या यंत्रांमध्ये अठराव्या शतकात सुधारणा करण्यात आल्या. यातून आधुनिक सूत-गिरण्यांमधील यांत्रिक कार्यपद्घती पुढे आली. यांपैकी जेम्स हार्‌ग्रीव्ह्‌ज व सर रिचर्ड आर्कराइट यांनी केलेल्या सुधारणा महत्त्वाच्या आहेत.


सूतकताईचे सुधारित यंत्र इंग्लंडमधील लुईस पॉल यांनी १७३८ मध्ये तयार केले. यात लोकर किंवा कापूस यांचे तंतू पेळूतून ओढून पीळ देण्याची क्रिया अगदी वेगळ्या तत्त्वानुसार होते. पूर्वी कताई करणारा कापूस व लोकरीचा पुंजका हातात धरुन हात लांब नेत असे. या यंत्रात हे तंतू ओढण्याचे काम यंत्रामार्फत होते. ओढण्याची ही क्रिया साध्य होण्यासाठी या यंत्रात पेळू रुळांच्या काही जोड्यांमधून नेला जातो. रुळांच्या पुढील जोडीची गती मागच्या जोडीपेक्षा जास्त असते. गतींमधील या फरकामुळे तंतू ओढला जातो. थोडक्यात, पेळूतील तंतू आपोआप पुढे जाणे, फिरतीमार्फत पीळ दिला जाणे आणि सूत गुंडाळणे या क्रिया यात होतात. सुताची चाती (वा कांडी ) आपोआप खालीवर होण्याची सोय झाल्यावर चातीच्या पूर्ण लांबीभर सूत थरामागून थर असे एकसारखे गुंडाळले जाऊ लागले.


जेम्स हार्‌ग्रीव्ह्‌ज यांनी १७६४ मध्ये स्पिनिंग जेनी नावाचे सूतकताई यंत्र तयार केले. या यंत्रात एकाच चक्राद्वारे अनेक चात्या फिरविल्या जातात. हे यंत्र चालविणारा कामगार एका हाताने चाक फिरवितो आणि सर्व चात्यांवर सूत एकसारखे गुंडाळण्यासाठी दुसऱ्या हातातील पट्टीचा उपयोग करतो. या यंत्रावर कातलेले सूत विणकामात फक्त बाण्यासाठी वापरण्यायोग्य असे होते. कारण ताण्यासाठी अधिक बळकट सुताची गरज असते. [ →तंत्रविद्या].


सर रिचर्ड आर्कराइट यांनी १७६७ मध्ये जलचौकट (वॉटर फ्रेम) नावाचे सूतकताई यंत्र तयार केले. १७७० पासून ते सर्वत्र वापरले जाऊ लागले. या यंत्रात आधीच्या सर्व शोधांचा व सुधारणांचा अंतर्भाव केलेला होता. यात एकाच वेळी चार पेळूंपासून सूत कातले जाते. हे चालविण्यासाठी जलशक्ती वापरता येत असल्याने याचे जलचौकट नाव पडले. कताई करणारा चात्यांवर सूत गुंडाळण्याचे काम करतो आणि सूत एकसारखे गुंडाळण्याचे काम तो हातानेच करतो. यावर अधिक जाड, चांगला पीळ दिलेले व बळकट सूत तयार होते आणि ते ताण्यासाठी वापरता येते. बाण्यासाठी इतर यंत्रांवर कातलेले सूत वापरले जाते. यात सुधारणा करुन सॅम्युएल क्रॉम्प्टन यांनी १७७४– ७९ या पाच वर्षांत नवीन सूतकताई यंत्र तयार केले. त्यात त्यांनी जलचौकट व सूतकताई जेनी या यंत्रांमधील तत्त्वांचा एकत्रितपणे उपयोग केला होता, म्हणून या संकरित यंत्राला म्यूल (खेचर) हे अन्वर्थक नाव पडले. यात पुढेमागे जाणारा एक गाडा होता. तो एका दिशेने जाताना सुताला पीळ दिला जातो व तो उलट दिशेत जाताना सूत कांडीवर गुंडाळले जाते. यावर विविध प्रकारची सुते जलदपणे व सफाईदार रीतीने तयार होतात. यामुळे सुताची उत्पादनक्षमता वाढली.

- ठाकूर, अ. ना.


३) चरखा : 

कापूस, रेशीम व लोकर यांपासून सूत काढण्याचे साधन. चरख्याचा शोध कधी लागला व विकास कसा झाला, हे अद्यापि स्पष्ट झाले नाही. भारतात ब्रिटिश अंमल येण्यापूर्वी चरखा वापरात होता. इ. स. १५०० पर्यंत चरख्याचा पुष्कळसा विकास झाला होता. तथापि त्यात महात्मा गांधींनी बऱ्याच सुधारणा केल्या. १९१८ पर्यंत देशात जे चरखे वापरात होते ते खड्या पद्धतीचे होते. १९१८ मध्ये साबरमती आश्रमात खड्या चरख्यावर सूत काढावयास शिकवीत असत. १९२१ मध्ये काँग्रेस महासमितीने २० लाख नवीन चरखे तयार करावेत असा प्रस्ताव मांडला. १९२३ मध्ये भारतीय खादी मंडळ स्थापन झाले पण चरख्याच्या रचनेत कोणतेच बदल झाले नाहीत. २२ सप्टेंबर १९२५ रोजी अखिल भारतीय चरखा संघाची पाटणा येथे स्थापना झाली. १९२३ मध्ये नवीन पद्धतीचा चरखा तयार करण्यासाठी या संघामार्फत ५,००० रु. चे बक्षिस ठेवण्यात आले पण त्यात यश आले नाही. १९२९ मध्ये गांधीजींच्या सूचनांनुसार चरखा तयार करण्यासाठी चरखा संघाने एक लाख रुपयांचे बक्षिस ठेवले. पण सूचनांनुसार चरखा बनविणे शक्य झाले नाही. किर्लोस्कर बंधूंनी एक चरखा तयार केला होता पण तो कसोटीस उतरला नाही.


चरखा वापरण्यास सुलभ होण्यासाठी त्याच्या आकारमानात बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. खड्या चरख्याचा प्रकार जो किसान चरखा त्यात सुधारणा झाली. त्यावर गांधीजी स्वतः कताई करीत. किसान चरख्याचे पेटी चरख्यात रूपांतर करण्याचे श्रेय गांधीजींनाच आहे. हे कार्य त्यांनी येरवडा तुरुंगात केले. या चरख्याला येरवडा चरखा असेही म्हणतात. खडड्या चरख्यासारखाच बांबूचा चरखा सतीशचंद्र दासगुप्त यांनी तयार केला. शाळेत मुलांना शिकविण्याकरिता तसेच प्रवासात कताई करण्यासाठी प्रवासी चरखा बनविण्यात आला पण त्याची गती किसान चरख्यापेक्षा कमी होती. सूत काढण्याची गती व त्याची मजबुती या दृष्टीने किसान चरखा उत्तम असला, तरी खेडेगावांमध्ये खडा चरखाच लोकप्रिय होता. गांधीजींच्या मृत्यूनंतरही चरख्यासंबंधी संशोधन व प्रयोग चालूच राहिले.


तमिळनाडूमधील एकंबरनाथ यांनी १९४९ मध्ये एक नवीन चरखा तयार केला. यातील चात्या गिरणीतील चात्यांसारख्याच उभ्या होत्या. एकंबरनाथ यांच्या स्मरणार्थ या चरख्यास अंबर चरखा असे नाव देण्यात आले.

मिठारी भु.चिं.


सौजन्य :- मराठी विश्वकोश 


Post a Comment

0 Comments