स्वामी दयानंदांप्रमाणे प्रत्येकाने जिज्ञासू वृत्ती जागृत ठेवावी
-आचार्य सोनेराव
लातूर :-( प्रतिनिधी) स्वामी दयानंदांच्या जिज्ञासू वृत्तीमुळेच त्यांच्या जीवनाला लहानपणी कलाटणी मिळाली होती, त्यामुळे माणसाने प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू नजरेने पाहायला शिकावे. जिज्ञासा नसेल तर माणसाची प्रगती होऊ शकणार नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध वैदिक प्रवक्ते आचार्य सोनेरावजी यांनी आर्य समाज, राम नगर लातूर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले.
लातूर येथील आर्यसमाज रामनगर च्या वतीने ऋषि दयानंद बोधोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून इंग्लंड ,अमेरिका वैदिक धर्माच्या प्रचार-प्रसारात कार्यरत असलेले श्री आचार्य सोनेराव यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे प्रधान शंकरराव मोरे होते.
आचार्य सोनेराव पुढे म्हणाले की, महाशिवरात्रीच्या दिवशी बाल दयानंदांच्या मनात जिज्ञासा जागृत झाल्यामुळेच मूर्तीमध्ये ईश्वर नसतो याचा बोध त्यांना झाला.त्याच वेळी त्यांनी खरा ईश्वर शोधण्यासाठी घरदार सोडले. अथक परिश्रम घेऊन व तपश्चर्या करून त्यांनी वेदांचे ज्ञान प्राप्त करून समाजोपयोगी कामे केली. स्वामी दयानंदांप्रमाणेच प्रत्येकाने जिज्ञासू वृत्ती जागृत ठेवावी ज्यामुळे आपली पर्यायाने समाजाची व राष्ट्राची प्रगती होईल.
आचार्य सोनेरावजी चे आर्यसमाजाचे प्रधान शंकरराव मोरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे मुखपत्र "वैदिक गर्जना" चे वर्षभराचे रंगीत मुखपृष्ठ छापण्यासाठी देणगी देणारे ओमप्रकाश जाधव (निरमनाळे) यांचा सत्कार आचार्यजींच्या हस्ते करण्यात आला. त्या आधी ऋषि दयानंद बोधोत्सवानिमित्त विशेष यज्ञ करण्यात आला.यावेळी कु. श्रेयसी आनंद लोखंडे हिने ऋषि दयानंदांवरील एक सुमधूर भजन सादर केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे मंत्री राजेंद्र दिवे यांनी केले. यावेळी आर्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.



Post a Comment
0 Comments