*पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित अस्थिरोग शिबिरात ५५ रुग्णांची तपासणी*
लातूर, दि. २१ :
राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी पोद्दार अक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ५५ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.
लातूर येथील ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांच्या पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने प्रतिवर्षी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजन करण्यात येते. मागच्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठी मोफत सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच तीन गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष एड. किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते एड. दीपक सूळ, अभिजित देशमुख, डॉ.चेतन सारडा, प्रसाद उदगीरकर, श्याम धूत, माजी उपमहापौर कैलास कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरात अस्थिरोग तपासणी, फिजिओथेरपी, मशीनद्वारे हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्याचप्रमाणे रक्त तपासणी व डिजिटल एक्स रे मध्ये रुग्णांना ५० टक्के सूट देण्यात आली तर एमआरआय, सिटी स्कॅन व सोनोग्राफीवर २५ टक्के सूट देण्यात आली. या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची तपासणी डॉ. अशोक पोद्दार, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ.तुषार पिंपळे यांनी केली. त्यांना डॉ.अंगिराज शेरे, डॉ.सिद्रामप्पा भोसगे , डॉ. पल्लवी जाधव, डॉ. प्रतिमा सरवडीकर, डॉ.मयुरी खोंडे यांनी सहकार्य केले. हे अस्थिरोग शिबीर कोरोनाचे सगळे नियम, सामाजिक अंतराचे पालन करून पार पडले. यासंदर्भांत बोलतांना डॉ. अशोक पोद्दार म्हणाले की, आपल्या हॉस्पिटलच्या वतीने मागच्या सलग अकरा वर्षांपासून अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त असे शिबीर आयोजित केले जाते. प्रतिवर्षी अशा प्रकारचे आरोग्य विषयक तसेच सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. मागच्या वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने अर्थातच सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झालेली आहे. अशा परिस्थितीत आपणही समाजाचे कांही देणे लागतो, या उदात्त भावनेने सदर उपक्रम राबविण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या गरजू रुग्णांना उपलब्धतेप्रमाणे औषधेही मोफत देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिबिरास आशादीप ग्रुप व दिशा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनीही भेट दिली.


Post a Comment
0 Comments