Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*सद् गुणांचा अनमोल ठेवा : स्व. गणपतराव निरमनाळे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ...*

 


*सद्गुणांचा अनमोल ठेवा : स्व. गणपतराव निरमनाळे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ...*

महाराष्ट्र विद्यालय औराद शहाजनी येथील निष्ठावान शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती होती, असे विद्यार्थी प्रिय

शिक्षक. अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवले आणि त्यांच्या जीवनात योग्य मार्गदर्शन करण्याची ज्या व्यक्तीने जबाबदारी पार पाडली असे ते व्यक्तिमत्व होते. "अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक" या भावनेतून जीवन जगणारा तगरखेडचा एक भूमि पुत्र गेल्या वर्षी पडद्याआड गेला आहे ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे...



तगरखेडा ता.निलंगा जि.लातूर या गावांमध्ये एकापेक्षा एक मोठी माणसे होऊन गेली आणि आहेतही. ज्या परिसरातली माती व पिकपाणी जसे असते तशीच त्या परिसरातली माणसेही चिवट व जिद्दीच्या गुणवत्तेची असतात. या वृत्तीला स्व.गणपतराव निरमनाळे गुरुजी अपवाद नव्हते. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे सालस, शांत, संयमी चिंतनशील असे होते. अध्यात्मिक व वैचारिक चिंतन त्यांना आवडायचे. यावर ते तासोनतास विद्वानांशी व अभ्यासकांशी चर्चा करत राहायचे. वेद, उपनिषद यांचे ते खूप चांगले अभ्यासक होते. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या विचारावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यांची ज्ञानावर जशी निष्ठा होती, तशीच निष्ठा विद्यार्थ्यावर होती आणि संस्थेवर सुद्धा. महाराष्ट्र विद्यालय औराद शहाजनी या विद्यालयात ते इतिहास-भूगोल शिकवायचे. स्त्री स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. आपली धर्मपत्नी सीताताई निरमनाळे यांच्याशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे व जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. ते फक्त बोलके स्त्री समर्थक नव्हते तर स्त्री-स्वातंत्र्याचा वास्तव जीवनामध्ये पुरस्कार करणारे ते कर्ते स्त्री पुरस्कर्ते होते, याची अनुभूती आम्ही अनेकदा घेतलेली आहे.

या परिसरातल्या माती आणि माणसांवर त्यांची खुप निष्ठा होती. ते स्वतः शेती अत्यंत उत्तम पद्धतीने करायचे.

त्यांच्या घरचे कपाट नेहमी पुस्तकांनी भरलेलेअसायचे. त्यामध्ये बहुतांश वैदिक साहित्य हे जास्त प्रमाणात दिसायचे.  वैदिक धर्माचा प्रचार- प्रसार, सभा, मेळावे, अभ्यास, सहली हा त्यांचा आवडीचा विषय असायचा. सारे कुटूंब आर्यसमाजी असल्यामुळे गावामध्ये त्यांच्याबद्दल वेगळी चर्चा असायची. निरमनाळे गुरुजी यांच्या अंगी स्पष्टवक्तेपणा होता. त्यामुळे त्यांचे बोलणे बहुतांश अनेकांना बरऱ्याचदा आवडायचे नाही. त्यांची ही स्पष्टता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष गुण होता. जो काही विषय बोलायचा असेल तो समोरच्याच्या समोर स्पष्ट तोंडावर बोलून ती व्यक्त होत असत. समाजाला नेहमी गोड गुळगुळीत बोलणारी माणसं जास्त आवडतात. सत्य आणि स्पष्ट बोलणारी माणसं समाजाला कधीही आवडत नसतात.

उत्तम आरोग्य, आहार, विहार, व्यायाम, योग हा त्यांचा नित्याचाच भाग होता. त्यांनी आयुष्यात कसलेही व्यसन केले नाही. आयुष्यभर ते निर्व्यसनी राहिले व अनेकांना निर्व्यसनी राहण्याचा सल्ला त्यांनी आयुष्यामध्ये दिला.



आपल्या कुटुंबातील मुलांना त्यांनी उत्तम शिक्षण दिले. मुलांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा त्यांनी केली. एक उत्तम पालक. उत्तम शिक्षक. अनेकांचा उत्तम सहकारी आणि अध्यात्मिक बांधिलकी जोपासणारा एक उत्तम आर्य समाजी. उत्तम शेतकरी अशा अनेक विविध भूमिकेतून त्यांनी आपल्या जीवनाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. एक भारदस्त असे उंचेपुरे गोरे- गोमटे व्यक्तिमत्व. त्यांच्याचालण्या-बोलण्यात व्यक्त होणारे सौंदर्य या साऱ्या गोष्टी आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. तेअत्यंत कठोर शिस्तीचे व वेळ पाळणारे होते. स्वच्छता, टापटीपपणा आतून-बाहेरूनची शुद्धता ही त्यांना खूप आवडायची. खऱ्या अर्थाने निरमनाळे गुरुजी म्हणजे अनेक गोरगरीब, अडल्यानडल्यांचा आधारवडच होते. अनेक अज्ञानी, निरक्षर शेतकऱ्यांना त्यांनी उत्तम शेती करण्यासाठीचा दिलेला सल्ला गावकरी कधीही विसरू शकत नाहीत.

प्रत्येकाच्या सुखा-दुखात तोरणदारी व मरणदारी उभा टाकणारा असा हा माणूस होता. समाजातील अनिष्ट रूढी,परंपरा यांचा त्यांना प्रचंड तिटकारा होता. या विरोधात त्यांनी आयुष्यभर समाजामध्ये आपला आर्यसमाजी विचार रुजवत ठेवण्याचा प्रयत्न केला. माणसाने माणूस बनले पाहिजे या मनुर्भवचा त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला. खेड्यापाड्यातल्या शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीची नवी प्रेरणा त्यांनी त्यांच्या मनामध्ये रुजवली.

एखादा माणूस जेव्हा आपल्यातून निघून जातो तेव्हा त्या माणसाचे महत्त्व अजून अधिक जाणवायला लागते, असेच निश्चित आम्हा तगरखेडकरवाशीयांचे झाले आहे. समाजात चारित्र्यवान व विचारी माणसे असणे हा समाजाच्या चांगुलपणासाठीचा अनमोल असा ठेवा असतो. व्यक्ती जन्माला येते आणि हे जग सोडून निघून जाते.

व्यक्ती आज आहे उद्या नाही पण त्या व्यक्तीचा विचार हा कधीही समाजामधून मरत नसतो. त्या विचाराचे पाईक होणे ही आमची तुमची प्रत्येकाची गरज असते. कारण चांगल्या विचारांच्या माणसांचाच चांगला समाज बनत असतो आणि म्हणून अशा चांगल्या माणसाबद्दल मनात आदर असणे हे सामाजिक बांधिलकीसाठी ती एक अत्यंत अनिवार्य गोष्ट असते. असा गावातील व समाजातील अनमोल ठेवा हरवल्याचे मनस्वी दुःख आम्हा सर्वांना तर आहेच. आज आदरणीय स्व. गणपतराव निरमनाळे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ हा छोटासा शब्दप्रपंच मांडून आम्ही त्यांच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करीत आहोत.


शब्दांकन: सतीश हानेगावे

प्रदेश संघटक-जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, महाराष्ट्र

Post a Comment

1 Comments
  1. गुरजी व ताई माझे गुरु. ५ वी ते ७ वी त्यांनी मला शिकवले. मला त्यांनी खुप मदत केली. घटकचाचणी वह्यातील कोरू पाने ते मला द्यायचे त्याच्या वहया मला उपयोगी पडायचा. आर्थिक परिस्थिती वाईट त्यात वडील मी सहावीत असतांना वारले. अशावेळी गुरुजी व ताईंची खुप मदत झाली. गुरु नव्हे माझ्यासाठी ते देव होते.

    ReplyDelete
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.