कलेत रमणारा अस्सल कलावंत : प्रा.अनंत गोदरेसर
मादीमं महाविद्यालय, संगीत विभाग औराद शहाजनी
जीवनातली कुठलीही कला ही माणसाला येणे महत भाग्याची गोष्ट असते. कारण कला मानवी जीवनाला आनंद देते व पूर्णत्वाच्या वाटेकडे घेऊन जाण्याचे काम करते. त्या दृष्टीने कलावंत व कला ही मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरते. ही कहाणी आहे अशाच एका हरहुन्नरी, धडपड्या कलावंताची. प्रा. अनंत विश्वनाथ गोदरे मूळचे अर्धापूर ता. अर्धापूर जि. नांदेड (महाराष्ट्र) येथील एक संगीत अलंकार असलेलं व्यक्तिमत्व. जंगम अर्थात स्वामी घराण्यात जन्म. चार घरे भिक्षा मागून कुटुंबाची गुजराण करणारे अत्यंत हलकीचे हे कुटुंब. वडील विश्वनाथराव व आई गिताबाई हे दोघेही अत्यंत कष्टी. चिकाटीने संसार करून आपल्या मुलांनी शिकले पाहिजे असे ध्येयवेडे स्वप्न उराशी बाळगणारे. त्यांच्या शिक्षणाची मूळ प्रेरणा ही आई-वडिलांची तळमळ होय. गावातल्या जिल्हा परिषदेत शाळेतच सरांचे प्राथमिक शिक्षण झालेले. हायस्कूलचे शिक्षणही येथेच पूर्ण झाले. अकरावी बारावीच्या निमित्ताने ते नांदेडला नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात पोहोचले. नांदेड या ठिकाणीच त्यांचे बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.
अशा काळातच आयुष्याला कलाटणी देणारे काही क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आले. संगीत क्षेत्रामध्ये त्यावेळी महाराष्ट्रातून डिलीट झालेल्या अत्यंत मोजक्या व्यक्तीमध्ये डॉ. अण्णासाहेब गुंजकर यांचे नाव घ्यावे लागते. यांचे चिरंजीव पंडित सूरमणी श्याम गुंजकर या दोघांच्या सहवासामुळे ते गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई अंतर्गत असलेल्या गायन- वादन महाविद्यालय नांदेड येथे संगीताचे शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली. या दोन्हीही संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या गायन व वादनाचा खूप मोठा प्रभाव सरांच्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो. ते संगीत क्षेत्रातील सरांचे खऱ्या अर्थाने आदर्श आहेत. या इथेच त्यांना संगीत अलंकार ही संगीत क्षेत्रातील अत्यंत सन्मानजनक पदवी प्राप्त झाली व ते संगीत अलंकार झाले. विशेष म्हणजे गोदरे सरांचे बीएपर्यंतचे शिक्षण ज्या महाविद्यालयात झाले तिथूनच त्यांनी मराठी विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. हा त्यांचा सारा शैक्षणिक प्रवास मिळेल ते काम करत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये पूर्ण झालेला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आयुष्य बदलणारे काही घटना प्रसंग येतात आणि संधीचे द्वार ठोठावून जातात.
काही कामा निमित्त आदरणीय विश्वनाथराव वलांडे गुरुजी हे अर्धापूर गावी आले होते. या ठिकाणी सरांच्या वडिलांची व गुरुजींची भेट झाली. सरांच्या वडिलांनी नम्रपणे मुलाच्या शिक्षणाबद्दल गुरुजींच्या कानावर घातले आणि सांगितले की, "माझ्या या मुलाला आपल्या पदरात घ्यावे", त्याच क्षणी गुरुजींनी शब्द दिला. शब्द पाळलाही आणि आज तेहतीस वर्षाची नोकरी पूर्ण करून आदरणीय सर सेवानिवृत्त होत आहेत. 'आधी केले मग सांगितले' याची अनुभूती त्यांनी स्वतः आपल्या आयुष्यात घेतलेली आहे. आदरणीय गुरुजींच्या सहवासातच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची जडणघडण झाली व जीवनाला एक अर्थ प्राप्त झाला अशा शब्दांमध्ये नेहमी ते गुरुजी बद्दल गौरव उद्गार काढतात. आदरणीय सदाविजय आर्य यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्यामुळे व्यक्तिमत्वास झळाळी आली असे ते मानतात.
आयुष्यातील एक चांगला मित्र व प्रेरक म्हणून मा. प्रदीप घोणसीकर यांचे योगदान अविस्मरणीय असल्याचे ते बोलतात. फॉरेनची पाटलीन, चिरगुट, तिचा उंबरठा अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एकमेव संगीत महाविद्यालय असलेल्या, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेल्या, तेरणा आणि मांजरा नदीच्या काठावर असलेल्या, शारदोपासक शिक्षण संस्थेच्या अंतर्गत मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या, संगीत विभागात ते संगीत व गायन कलेचे प्राध्यापक म्हणून दिनांक ०७ ऑगस्ट १९८९ रोजी रुजू झाले. संगीत, गायन,नाट्य क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवलेल्या मास्टर दिनानाथांच्या नावानं असलेल्या या महाविद्यालयात संगीत विभागात नोकरी मिळण्याचे अहोभाग्य सरांना प्राप्त झाले. या महाविद्यालयाच्या माध्यमातून आदरणीय आनंद गोदरे, दुर्गादास सबनीस, भालचंद्र गरुड या संगीतप्रेमींनी वाडीवस्तीवरच्या ग्रामीण भागातल्या हजारो विद्यार्थ्यांची कलाक्षेत्रातील जडणघडण घडवून आणली. गोदरे सरांनी शंभर पेक्षाही जास्त विद्यार्थ्यास नोकरीसाठी प्रेरणा दिली व मदत केली आहे. औराद पंचक्रोशीतील व निलंगा- लातूर जिल्ह्यातील विविध संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून या परिसराला आगळी-वेगळी सांस्कृतिक ओळख देण्याचं काम या संगीत विभागांनी केलेले आहे. दरवर्षी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जन्मदिवशी 'स्वरलता' अविस्मरणीय अशा कार्यक्रमाचे आयोजन या संगीत विभागाने केलेले आहे. कुठल्याही संस्थेच्या कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट संगीत विभागाच्या गायनाने होते. मग तो कार्यक्रम २६ जानेवारी असो की १५ ऑगस्ट संगीत विभागाचा सहभाग हा अनिवार्य असतो. असा आगळावेगळा पायंडा या विभागांनी निर्माण केलेला आहे.
निलंगा तालुक्याचा व लातूर जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा औराद नगरीतील या संगीत विभागाचे नाव या सांस्कृतिक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांने लिहावे लागेल. अशा प्रकारचे कार्य या विभागाने केले आहे. या महाविद्यालयातील या नोकरीमुळेच मी डॉ. पूजा, डॉ. आरती, डॉ. प्रसाद या तिन्ही अपत्यांना मी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर बनवू शकलो असे ते अत्यंत कृतज्ञतेने म्हणाले. सरांची ही तीनही मुले फक्त वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत आहेत असे नाही, तर त्यांच्या अंतरात्म्यामध्ये गायन -वादन आणि सांस्कृतिक मूल्य रुजवण्याचं संस्कार ही सरांनी त्यांच्या मनावरती केलेला आहे. पत्नी सौ.इंदुमती (अपर्णा) शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनमोल सहकार्याशिवाय हा सारा प्रवास अपूर्णच आहे. अर्धापूर सारख्या वाडीवस्तीवरच्या एका मुलाला संगीत क्षेत्रामध्ये संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने करून आपले आयुष्य अजून अधिक सार्थकी लावले आहे. ही गोष्ट त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे व वेळोवेळी कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेण्यासाठी मार्गदर्शन करणारी आहे.
संगीत क्षेत्रातील ३३ वर्षाचा प्रदिर्घ कालखंड हा निश्चितच अत्यंत प्रेरणादायी व भारावून टाकणारा राहिला आहे. आदरणीय गोदरे सरांचा आवाज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने इथल्या गावागावातून, तांड्यावस्तीत दुमदुमला आहे. विद्यापीठ युवक महोत्सवात अनेक पुरस्कार या विभागाने पटकावून आपला नावलौकिक महाराष्ट्र पातळीवरती वाढवलेला आहे. हा सारा परिसर त्यांनी आपल्या आवाजाने मंतरून टाकलेला आहे. महाविद्यालयातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनावरती त्यांनी आपल्या आवाजाचे गारुड निर्माण केले आहे, याचा विसर आम्हाला पडत नाही. त्यांच्या या दीर्घकाळ केलेल्या सेवेबद्दल खऱ्या अर्थाने त्यांचे अभिनंदन करणे योग्य ठरेल.
आदरणीय प्रा अनंत गोदरे सर हे दिनांक ३० सप्टें २०२२ रोजी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. जन्माला येणारा प्रत्येक माणूस येताना आपल्या मुठीत आपले कर्म घेऊन येतो. आदरणीय अनंत गोदरे सर संगीत व गायन रुपी कर्म आपल्या सोबत घेऊन आयुष्यभर ते या कलाक्षेत्रात रमले. अनेकांना त्यांनी या कलेत रमावलं. असा कलेत रात्रंदिवस रमणाऱ्या व्यक्तीबद्दलच्या या भावना व्यक्त करताना या क्षणी त्यांच्या आठवणींने अंतकरण भरून येत आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी हा छोटासा शब्दप्रपंच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख व्हावी म्हणून मांडला. आयोजकाने लिहिण्याची विनंती केली म्हणून हा लेख मी सर्वांच्या समोर ठेवला त्याबद्दल आयोजकांचे आभार!...
सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या भावी आयुष्यासाठी निरामय, आनंदी व दीर्घ आयुष्यास व पुढील विधायक कार्यास आमच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा...
"आपल्या संगीत आणि गायनांनी दुमदुमला काठ तेरणेचा लतादीदींच्या स्वराने अमर, अभंग झाला काठ तेरणेचा"
शब्दांकन: सतीश हानेगावे
(प्रदेश संघटक-जगद्गुरु तुकोबाराय
साहित्य परिषद, महाराष्ट्र)

Post a Comment
0 Comments