'थँक यु पोलीस'....! पोलिसांसोबत साजरी झाली दिवाळी !
वसुंधरा प्रतिष्ठानने मानले पोलीस बांधवांचे आभार
आपण आहात म्हणून आम्ही सुरक्षित सण साजरे करू शकतोत; फलकातून कृतज्ञता
लातूर : रात्रंदिवस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सेवेवर रुजू असतात. सण असो अथवा कुठलाही उत्सव असो पोलीस २४ तास ऑन ड्युटी असल्याने आपण सारेजण घरात सुरक्षित सण साजरे करू शकतो हा भाव व्यक्त करण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने 'थँक यु पोलीस' हा अभिनव उपक्रम राबविला आणि लातुरातील पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस बांधवांना मिठाई देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
कुठलाही सण असो अथवा उत्सव. पोलीस बंधू आणि भगिनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतात. त्यांच्यामुळेच आपण (सर्व नागरिक) आपले सण आणि उत्सव आपल्या घरी राहून सुरक्षितपणे साजरे करू शकतो. उन्ह, वारा, पाऊस, सण, उत्सव या काळात पोलीस नेहमीच कर्तव्यावर राहून जनसेवा बजावत असतात. आपल्या सर्वांच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने ते स्वतःच्या कुटुंबियांसोबत कुठलाही सण साजरा करू शकत नाहीत. मात्र, ते आपल्या सुरक्षेसाठी तैनात असल्याने आपण सारेजण आपापल्या घरी आपले सण मोठ्या उत्साहात साजरे करत असतो. पोलीस कर्मचारी यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी वसुंधरा प्रतिष्ठानने अभिनव असा उपक्रम राबविला. लातूर शहरातील गांधी चौक पोलीस स्टेशन, शिवाजी चौक पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना 'थँक यु' फलक देऊन मिठाई देऊन दिवाळी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिसांना देण्यात आलेल्या फलकावर 'आपण आहोत म्हणून आम्ही सण आणि उत्सव अगदी आनंदाने घरात साजरे करू शकतो' असा मजकूर लिहून पोलीस बांधवांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, सपोनि कोल्हे, पोउपनि कोव्हाळे, हेड कॉन्स्टेबल आरदवाड, दामोदर मुळे, बनसोडे, नागरगोजे, अनंतवाड, पाटील, पोतदार, गुट्टे, शिवा पाटील, मामडगे यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, कार्याध्यक्ष अमोलआप्पा स्वामी, सदस्य उमेश ब्याकुडे, फोटोग्राफर संदीप शिंदे आदींची उपस्थिती होती.
*मनस्वी आनंद झाला : प्रेमप्रकाश माकोडे*
***********************
वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने पोलिसांच्या सतत कार्यरत असलेल्या कार्याची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली हे पाहून मनस्वी आनंद होतोय. नागरिकांची सुरक्षा हे पोलिसांचे आद्यकर्तव्य आहे. मात्र, नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल जी प्रतिमा आहे ती बदलण्यासाठी नागरिक आणि पोलीस यांच्यात समन्वय हवा. वसुंधरा प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेला 'थँक यु पोलीस' हा उपक्रम अभिनंदनीय आहे. सर्व पोलीस प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी यावेळी बोलताना केले.
*पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपक्रम : प्रा.योगेश शर्मा*
*************************
कुठलाही सण असो अथवा उत्सव असो 24 तास पोलीस बांधव आणि भगिनी सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. पोलीस असल्यामुळे सर्व नागरिक आपल्या कुटुंबियांसोबत आपला सण आनंदाने साजरे करू शकतात. वसुंधरा प्रतिष्ठान गेल्या 7 वर्षांपासून पोलीस, वाहतूक पोलीस यांच्यासोबत दिवाळी हा आनंदाचा सण साजरा करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशी माहिती वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा यांनी दिली. यावेळी पोलीस बांधवांना मिठाई भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments