प्राध्यापक ते पुणे कार्यकारी अभियंता आणि आता डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार
( एक प्रेरणादायी जीवन प्रवास)
मा. भागवत थेटे यांना नुकताच दि.१८ ऑक्टोबर२०२२ रोजी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्ताने ड्रीम फाउंडेशन व डॉ. कलाम मिशन यांच्या वतीने हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
मा. भागवत बाबुराव थेटे, तगरखेडा
(कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पुणे)
तगरखेडा गावाने अनेक प्रतिभावंतांना जन्म दिला आहे.
ज्या परिसराची माती, पीक पाणी जसे असते तसेच तिथले अन्न घटक माणसांमध्ये उतरतात असे म्हटले जाते. जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने इथल्या माणसांनी तसाच रंगही धारण केला आहे, हे एका खेड्यातल्या भागवत थेटे या युवकाने यशस्वीपणे दाखवून दिले आहे. भारतीय विद्यापीठातील एक ख्यातनाम प्राध्यापक ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पुणे येथील कार्यकारी अभियंता हा त्यांचा जीवन प्रवास येणाऱ्या पिढीला निश्चितच प्रेरणा देणारा आहे. हजारो-लाखो खेड्यापाड्यातल्या मुलांनी आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावरती यशाच्या आकाशात उत्तुंग झेप घेतली आहे. त्या पिढीपैकी भागवत थेटे हा एक होय.
घरची परिस्थिती अत्यंत चांगली त्यामुळे इतरांसारख्या शिक्षणाच्या हालअपेष्टा भागवत यांना सोसाव्या लागलेल्या नाहीत; परंतु त्यांच्या शिक्षणाच्या यशामध्ये आजी सुंदरामाय यांच्या मायेचा सर्वात मोठा वाटा आहे. शिक्षणासाठी त्यांची प्रेरणा मला सतत प्रोत्साहन देत राहिली असे तो म्हणाला. त्यांचे वडील बाबूराव व आई केराबाई यांचे खूप मौलिक योगदान आहे. आपल्या मुलांनी शिकले पाहिजे यासाठी या दोघांचा प्रयत्न शेवटपर्यंत राहिला आहे. शाळेमध्ये जाणे, शिक्षकांना भेटणे, मुलांची काळजी घेणे या साऱ्या गोष्टी आईवडिलांनी केलेल्या आहेत.
तगरखेडा येथील जिल्हा परिषद शाळा ही अवतीभवतीच्या पाच-पंचवीस खेड्यामध्ये त्यावेळी गाजलेली शाळा होती. अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्या वेळी या शाळेला मिळालेले होते. डोक्यावर काळी टोपी, अंगात कोट,पांढरे धोतर, हातात काठी अशा एका बापूराव मास्तरने या शाळेला गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून वैभवाच्या शिखरावर पोहोचवलेले होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षणाचे आणि खेळाचे भारावून टाकणारे अशा प्रकारचे वातावरण याठिकाणी निर्माण झालेले होते. अनेक खेड्यापाड्यातून मुले या ठिकाणी शिकण्यासाठी येत. भागवत थेटे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद तगरखेडच्या शाळेत झाले. याठिकाणी मदने गुरुजी म्हणून अत्यंत प्रभावी अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व होते. नाईट क्लास घेणे, घरी ट्युशन घेणे यातून अनेक मुले घडत होती. इंग्रजी उत्तम शिकवण्याकडे त्यांचा कल होता. इंग्रजी व्याकरणावर त्यांची पकड होती. याचा प्रभाव भागवतवरती पडला आणि तो गुरुजीच्या शिकविणीमुळे प्रभावित होऊन इंग्रजी भाषेचा जास्तीचा अभ्यास करू लागला. या विषयाचा फायदा पुढच्या भविष्यामध्ये त्यांना झाला. मदने गुरुजी त्यावेळी यादवराव बिरादार यांच्या घरी राहायचे. ते अनेक विद्यार्थ्यांचे आवडते झाले ते त्यांच्या शिकवणीमुळेच!..
आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण औराद शहाजानी येथील शारदोपासक शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या महाराष्ट्र विद्यालय या ठिकाणी झाले. आदरणीय दगडू गिरबणे सर हे शेकडो-हजारो विद्यार्थ्यासाठी एक आदर्श शिक्षक बनले होते. भागवतचेही ते आदर्श शिक्षक बनले यात नवल नाही. गणित विषयात हातखंडा असलेले गिरबणेसर हे अत्यंत उत्तम पद्धतीने शिकवायचे व ट्युशन्स घ्यायचे. याचा यावेळच्या तरुण पिढीवरती खूप मोठा प्रभाव पडलेला होता होता. यामुळे अनेक विद्यार्थी घडले. भागवतचा गणिताचा पाया गिरबणे सरांमुळे पक्का झाला. खऱ्या अर्थाने आदरणीय दगडू गिरबणे सर व गिरबणेताईंने भागवत थेटे यांचे खऱ्या अर्थाने पालकत्व स्वीकारलेले होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आदरणीय खंदारे सर हे इंग्रजीचे उत्तम शिक्षक होते. व्याकरणामध्ये त्यांचा हातखंडा होता. इंग्रजी भाषा भागवतला आवडत असल्यामुळे सहाजिकच खंदारे सरांची शिकवण्याची पद्धत व इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व त्यांना भावले. यामुळे ते खंदारे सरांकडे आकर्षित झाले. आदरणीय खंदारे सर सुद्धा भागवत थेटे यांचे अत्यंत आवडते शिक्षक बनले. लहानपणी अनेकदा भागवतला औरादची शाळा नको वाटायची. अभ्यास थोडासा अवघड जायचा तेव्हा आई वडिलांचे प्रयत्न, आदरणीय गिरबणेसर व खंदारेसर यांच्या प्रयत्नातून भागवतच्या आयुष्याची जडणघडण होत गेली. भागवत थेटे यांना या वयामध्येही एक गोष्ट प्रकर्षाने कळत होते की आपण जरी शेतकरी असलो तरी शिक्षणाशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही ही पक्की गोष्ट भागवतच्या मनामध्ये कुठेतरी खोल रुतून बसलेली होती, म्हणूनच शेती करण्याऐवजी आपण शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणातूनच आपल्याला नवीन भवितव्य मिळू शकतो या गोष्टीवर विश्वास ठेवून तो नावडत्या काळामध्येसुद्धा शिक्षण घेत राहिला, येथेच खऱ्या अर्थाने भागवतच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळत गेली. विद्यार्थ्यांना योग्य दिशा व योग्य मार्गदर्शन लाभले तर कुठलाही? कसलाही? विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये यशोशिखर गाठू शकतो. दहावीला उत्तम गुणाने भागवत पास झाला. त्यानंतरच्या शिक्षणासाठी ते लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील विज्ञान शाखेत दाखल झाले.
ही महाराष्ट्रातील एक अत्यंत गाजलेली व नामांकित अशा प्रकारची शिक्षण संस्था. या महाविद्यालयात आदरणीय प्राचार्य अनिरुद्ध जाधव सरांसोबत भागवत यांची खूप जवळीकता निर्माण झाली. आदरणीय अनिरुद्ध जाधव सरांची साधी, सोपी, सहज पटेल अशा प्रकारची शैली भागवत यांना खूप आवडायची. जाधव सर हे अत्यंत प्रभावी, परिणामकारक अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व आहे. शिस्त आणि वेळेच्या बाबतीत त्यांचा कोणीही हात धरु शकत नाही. उत्तम प्रशासन देणे हा त्यांच्या खास चिंतनाचा विषय. ते स्वतः आपल्या विषयातील तज्ञ आहेत. हजारोंच्या संख्येने मुले घडवण्याचं काम जाधव सरांनी केलेले आहे. त्यांनी घडवलेली मुले देश-विदेशात आपल्या महाविद्यालयाचे, आई-वडिलांचे व आपल्या गावाचं नाव अजरामर करत आहेत. याच महाविद्यालयातून भागवत थेटे हा बारावीला मेरिटमध्ये आला. भागवत थेटे यांचे नाव या महाविद्यालयात एक अत्यंत हुशार मुलगा म्हणून सुवर्ण अक्षराने लिहिण्यात आले आणि भागवतच्या एका आयुष्याच्या नव्या अध्यायाला या ठिकाणाहून प्रारंभ झाला. तो पुढील शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी पोहोचला. शासकीय अभियंता महाविद्यालय पुणे या ठिकाणी भागवत इंजिनियर झाला. या ठिकाणचे एकूणच सर्व शैक्षणिक वातावरण हे भारावून टाकणारे होते. इथे मन रमले. खूप शिकता आले आणि अभियांत्रिकी पदवी घेऊन ते महाविद्यालयाच्या बाहेर पडले.
आता आपण कुठेतरी नोकरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी भारतीय विद्यापीठ या ठिकाणी मुलाखत दिली. मुलाखती यशस्वी झाली आणि भागवत यांनी भारतीय विद्यापीठाचा प्राध्यापक म्हणून सात वर्षांपर्यंतची सेवा या ठिकाणी दिली. आता पुढे कुठे तरी आपण शासकीय सेवेत रुजू व्हावे म्हणून त्यांनी या ठिकाणचा राजीनामा देऊन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पुणे या ठिकाणी ते सुरुवातीला कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत झाले. या ठिकाणी अभियंता म्हणून कार्य करत असताना सर्वांसोबत व्यवस्थित जुळवून घेणे आणि निर्माण झालेल्या अडीअडचणी वेळेत सोडवणे, शिस्त, तत्परता, कार्यक्षमता,प्रसंगानुरूप सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या अत्यंत सुंदर अमोघ वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे हा त्यांचा आवडता छंद होय. या सार्या गोष्टीच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट सेवा देण्याचे काम या ठिकाणी भागवत थेटे यांनी केले आहे. या परिसरातील अनेक गोरगरीब, होतकरू, अडल्यानडल्या विद्यार्थ्यांना मौलिक मदत त्यांनी केलेली आहे. अनेक बेकारांना स्वावलंबी बनण्यासाठी उभारीचे हात दिले आहेत. भागवत थेटे हा जरी पुणे या ठिकाणी राहत असला तरी गावाबद्दल आणि गावातील माणसाबद्दल त्यांना प्रचंड ओढ आहे. गावातल्या अनेक सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांमध्ये त्यांचे सहकार्य मोलाचे असते.
माझे आई- वडील व गुरुजनांच्या प्रेरणेमुळेच मी खऱ्या अर्थाने शिकत गेलो अशी भावना त्याने व्यक्त केली. माझे काका रामराव थेटे, व्यंकटराव थेटे आमच्या सर्व काकू यांचा मोलाचा वाटा माझ्या यशात आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी नुसती शेती करून उपयोगाचे नाही तर शेतीला दुसरा पर्याय म्हणून शेती व्यतिरिक्त व्यापार-उद्योग, स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी संधी शोधल्या पाहिजेत असे त्यांना वाटते. आज या अत्याधुनिक तंत्रयुगामध्ये कोणीही कोणाला कमी नाही. खेड्यापाड्यातल्या मुलांमध्येही खूप क्षमता आणि योग्यता असतात हे आपण सिद्ध करुन दाखवले पाहिजे. त्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आपल्या सर्वांच्या समोर उपलब्ध आहे. याच भावनेतून मी माझ्या मुलांना शिकवत राहिलो. माझा एक मुलगा आदित्य हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षी शिकत आहे. ऋतुराज हा बारावी मेरिटमधे पास झालेला आहे. आयुष्याच्या या सार्या जडणघडणीत आई वडील, गुरुजनाबरोबरच, माझ्या धर्मपत्नीचाही खूप मोठा सिंहाचा वाटा आहे असे भागवत मानतो. माझ्या आयुष्यात जशी परिस्थिती येते गेली, जशा संधी मला मिळत गेल्या, त्या संधीच्या दिशेने मी सतत झेपावत राहिलेलो असल्यामुळे प्राध्यापक ते कनिष्ठ अभियंता आणि आता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पुणे या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून माझी नियुक्ती झाल्याचे तो म्हणाला. या जीवनातल्या साऱ्या प्रवासाबद्दल मी अत्यंत आनंदी आहे अशा प्रकारच्या भावना त्यांनी डीआरसी औराद शहाजानीशी बोलताना व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील कार्यकारी अभियंता हे पद निश्चितच अत्यंत प्रतिष्ठेचे व सन्मानजनक आहे. अशा प्रकारच्या उच्च पदापर्यंत पोहोचलेल्या मा. भागवत थेटे या तगरखेडच्या सुपुत्राला समस्त तगरखेडकरांच्यावतीने आभाळभर हार्दिक शुभेच्छा...
शब्दांकन: सतीश हानेगावे
सौजन्य: डीआरसी औराद शहाजानी
('तेरणेतील शंख आणि शिंपले', मधून साभार)

Post a Comment
0 Comments