*बदलत्या वातावरणाचा पिकांना बसतोय फटका*
औसा प्रतिनिधी
सोयाबीनने दगा दिल्यानंतर शेतकरी हरभरा पिकातून चांगले उत्पन्न पदरात पडेल ,अशी आशा लावून बसला आहे ; परंतु या भागातील अनेक शिवारात हरभरा वाऱ्यावर डुलत्या अवस्थेत असतानाच यावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
यामुळे फडच्या फड पिवळे पडत असून ,हरभरा जळून जाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त केली जात आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी ,लामजना, तपसे चिंचोली,गोटेवाडी,गाडवेवाडी , या पट्ट्यात सोयाबीन नंतर नगदी पीक म्हणून हरभरा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. लामजना ,तपसे चिंचोली परिसरात रब्बी हंगामातील जवळपास सत्तर टक्के क्षेत्रावर हे पीक घेण्यात आले आहे. यंदा खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बी पेरणीला उशीर झाला होता. सध्या हरभरा पीक वाऱ्यावर डुलत्या अवस्थेत आहे.त्यामुळे सोयाबीनने दगा दिला तरी हरभऱ्यातून काहीतरी पदरात पडेल ,या आशेवर शेतकरी आहे,असे असतानाच हवेने डुलत्या अवस्थेत असलेल्या हरभऱ्यावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतातील उभ्या काकऱ्या पिवळ्या पडून जळून जात आहेत.
तसेच हवामानातील बदलांमुळे हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Post a Comment
0 Comments