माजी प्रांतपाल डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे
लातूर :-(प्रतिनिधी)
रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजोपयोगी कार्य करणारी महत्वपूर्ण संस्था आहे. आज समाजातील अनेक सावित्रीच्या लेकींना त्यांच्या आर्थिक विवंचनेमुळे सायकली खरेदी करून शिक्षण घेणे कठीण जात आहे. त्यामुळे रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ मार्फत समाजातील गरजू आणि गरीब सावित्रीच्या लेकींना सायकल उपलब्ध करून देऊन शिक्षण सुखकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२चे माजी प्रांतपाल रो.डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन, कलापंढरी संस्था, लातूर आणि ग्रामपंचायत कार्यालय, बिटरगाव यांच्या संयूक्त विद्यमाने बिटरगाव येथे साविञीच्या लेकी अभियानातर्गत गरजू आणि गरीब किशोरी मुलींना सायकली वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिटरगाव ग्रा.पं.सदस्या अनूसया गाडे ह्या होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून रोटरीचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.संजय गवई, डॉ.मल्लिकार्जुन हुलसुरे, रोटरीचे अध्यक्ष निळकंठ स्वामी, सचिव माधव पांडे, प्रोजेक्ट चेअरमन तथा कलापंढरी संस्था अध्यक्ष बी.पी.सुर्यवंशी, विश्वनाथ स्वामी सावळे, किशोरी आसमा शेख आणि सविता कुलकर्णी आदींची उपस्थीती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बालक आणि किशोरी संसाधन केंद्राचे उद्घाटन रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.संजय गवई यांनी केले.
पुढे बोलताना डॉ.ओममप्रकाश मोतीपवळे म्हणाले की, ग्रामीण भागातील किशोरी मुलींना शाळा लांब असल्यामुळे वाहनांची सोय नाही. आज अनेक मुली पायी चालत जाऊन शिक्षण घेत आहेत. वाहनांची सोय नसल्यामुळे अनेक पालकाना आपल्या मुलींना शिक्षणापासून वंचीत ठेवावे लागत आहे. याचा विचार करुन आम्ही किशोरी मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहाव्यात, वाडी, वस्ती, तांड्यावरील शाळेत जाणाऱ्या मुलींचा शैक्षणिक प्रवास सुखकर व्हावा म्हणून रोटरी क्लब ऑफ लातूर होरायजन आणि कलापंढरी संस्थेच्या मागणीनुसार सायकलीचे वाटप करीत आहोत. या सायकलीचा किशोरी मुलींनी शिक्षणासाठी पुरेपुर फायदा घ्यावा असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ.संजय गवई म्हणाले की, आपल्या मुला-मुलींना योग्य संस्कार आणि शिक्षण देण्याची महत्त्वाची जबाबदारी कुटुंबाची असली तरी त्यामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे आपण कुटुंबामध्ये आपल्या कौटुंबिक जबाबदारी सोबत किशोरी मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारीसुद्धा घेतली पाहिजे. बालक आणि किशोरी संसाधन केंद्रातून शालेय शिक्षणासोबत जीवन आणि व्यावसायिक कौशल्याचे धडे सुद्धा किशोरी मुलींना दिले जाणार आहे. त्यामुळे या केंद्राचा गावकऱ्यांनी बालकांच्या विकासासाठी उपयोग करून घ्यावा असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बी.पी.सुर्यवंशी म्हणाले की, रेणापुर तालूक्यातील अनेक वाडी, वस्ती आणि तांड्यावरील मुली केवळ प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे शाळाबाह्य होत आहेत. तर काही ठिकाणी बालविवाह सुद्धा होत आहेत हे थांबावे म्हणून अशा दुर्गम भागातील मुली शालेय प्रवाहात टिकून रहाव्या म्हणून मुलींना सायकली वाटप केल्या जात आहे याचा मला आनंद झाला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलापंढरीचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर गालफाडे यांनी केले तर आभार सचिव माधव पांडे यांनी मानले.
या कार्यक्रमाला बिटरगाव येथील ग्रामस्थ, महिला, बालक व किशोरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलापंढरीचे शालू साके, सुप्रिया रामदासी, अतूल वाकडे, विलास दंदे आणि गावातील किशोरी मुली आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments