Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*भावी पिढीचे गुन्हेगार होणार का ?*

*भावी पिढीचे गुन्हेगार होणार का ?*

वसुंधरा प्रतिष्ठानच्या फलकांनी वेधले लातूरकरांचे लक्ष

लातूर : 
लातूर जिल्ह्यात वनांचे क्षेत्र अत्यल्प आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी लातूर येथील वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गत सात वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देत आहे. वृक्ष लागवड अन संवर्धन ही लोकचळवळ व्हावी यासाठी "माझा श्वास...माझं झाड" हे अभियान हाती घेऊन जनजागृती सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या उपक्रम अंतर्गत शहरातील नाना-नानी पार्क येथे 'भावी पिढीचे गुन्हेगार होणार का?' असा प्रश्न उपस्थित करीत आपल्यासह भावी पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून संवर्धन करावे असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.
वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या ७ वर्षांपासून लातूर शहर आणि जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि संवर्धन केले जात आहे. ही चळवळ लोकचळवळ व्हावी यासाठी आजवर नानाविध उपक्रम राबवित जनजागृती करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने झाडाचा गणपती, सेल्फी विथ ट्री, एक विद्यार्थी:एक वृक्ष, झाडांचे वाढदिवस, पर्यावरण पूरक सणोत्सव, ३० सेकंद पर्यावरणसाठी, प्रदूषणमुक्त लातूर, एक गणेश मंडळ:११ वृक्ष उपक्रम आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आपला श्वास हा ऑक्सिजनवर अवलंबून आहे. झाडे मानवाला जगण्यासाठी मोफत ऑक्सिजन देतात. त्यामुळे मानव श्वास घेऊ शकतो. परंतु, वृक्ष लागवड आणि संवर्धन करायचे सोडून मानवाकडून खुलेआम वृक्षतोड केली जाते आहे. "माझा श्वास...माझं झाड" हे अभियान लातुरात सुरू करून झाडांचे संवर्धन ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे असा संदेश फलकातून दिला जातो आहे. सदर फलक झाडांना बांधून जनजागृती केली जाते आहे. या फलकावर माझा श्वास, माझे झाड.... जगण्यासाठी हवे आहे ना ऑक्सिजन मग चला लावू झाडे आणि करू त्यांचे संवर्धन असा मजकूर लिहण्यात आला आहे. शिवाय भावी पिढीचे गुन्हेगार होणार का? असा प्रश्न फलकातून विचारण्यात आला आहे. सदर फलक लातूर शहरातील नाना-नानी पार्कवर झाडांवर दोरीच्या साह्याने डकविण्यात आले आहेत. या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रा.योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, कार्याध्यक्ष अमोल आप्पा स्वामी, कोअर कमिटी सदस्य शिवाजी निरमनाळे, सदस्य रोहन शिंदे आदींनी सहभाग नोंदवला. लातूरकरांनी सदर फलक वाचून या अभिनव उपक्रमाचे कौतुक आणि स्वागत केले.

*झाडांना इजा होऊ नये म्हणून दोरीच्या साह्याने बांधले फलक : प्रा.योगेश शर्मा*
************************
लातूर शहरात अनेक व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या जाहिराती लावण्यासाठी झाडांना खिळे ठोकतात आणि त्यावर जाहिरातीचे फलक (बॅनर) लावतात. झाडेही सजीव आहेत. त्यांना खिळे ठोकल्याने त्यांनाही वेदना होतात. यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे 'खिळेमुक्त झाड अभियान' उपक्रम राबविला जातो आहे. शिवाय, नाना-नानी पार्क येथे जनजागृती फलक लावताना दोरीच्या साह्याने फलक बांधण्यात आले आहेत. जे जे व्यावसायिक झाडांना खिळे मारतात त्यांनी खिळे मारू नयेत, असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments