*ज्ञानाची मशाल खेड्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मयोगी - कै. विश्वनाथराव वलांडे गुरुजी*
शिक्षणाशिवाय मानवी जीवन सुधारू शकत नाही. त्यामुळे शिक्षण शहरी भागापुरते मर्यादित न राहता गावागावांत, खेड्यांपर्यंत पोहचले पाहिजे, खेड्यातील मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही म्हणून महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील औरादसारख्या निमशहरामध्ये कै. विश्वनाथराव वलांडे गुरुजींनी शारदोपासक शिक्षणसंस्थेची स्थापना केली. विद्यालय, माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज स्थापन करून शिक्षणाच्या पवित्र कार्याचे तेरणातीरावर तोरण बांधले. जिथे प्रयत्नांची उंची जास्त असते तिथे नशिबलाही झुकावे लागते.
गुरुजींचा जन्म ८ एप्रिल १९३७ मध्ये देवणी तालुक्यातील धनेगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव नागम्माबाई तर वडिलांचे नाव शंकरेप्पा वलांडे होते. तेरणा नदीच्या कुशीमध्ये वसलेल्या तगरखेडा या मुळगावी गुरुजींचे बालपण गेले. लहान वयापासूनच ते अत्यंत हुशार व बुद्धिमान होते. त्यांचा विवाह १९५९ मध्ये सौ. प्रयागबाई यांच्याशी झाला. श्री राजेशजी वलांडे, श्री बस्वराजजी वलांडे व श्री अशोकजी वलांडे ही त्यांची मुले. उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद या ठिकाणाहून गुरुजींनी १९५९ मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर कर्नाटकातील मेहकर या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी केली. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य समजून महाराष्ट्र विद्यालय औराद शहाजानी येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. आपल्या कार्यकौशल्याने पुढे मुख्याध्यापक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयात त्यांचा हातखंडा होता. १९५६ साली महाराष्ट्र शिक्षण समिती औराद ही शारदोपासक शिक्षण संस्थेमध्ये विलीन झाली. त्यानंतर १९७० मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, १९८३ मध्ये महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, २००९ मध्ये संगणकशास्त्र महाविद्यालय, २०१० मध्ये शारदा पॉलिटेक्निक कॉलेजची स्थापना केली. कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, प्रबळ इच्छाशक्ती हे त्यांच्या यशाचे रहस्य होते. त्यांच्या त्यागी व सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचे नाव आजही आदराने घेतले जातेे. गुरुजींची आदरयुक्त भीती सर्वांनाच वाटत असे. सर्व पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांसोबत गुरुजींचा वावर होता.
वलांडे गुरुजी म्हणजे निश्चयाचा महामेरू. एकदा केलेला संकल्प कितीही संकटे आली तरी त्यातून मार्ग काढून यश मिळवत. जे कार्य हाती घेतले ते प्रामाणिकपणाने, कष्टाने साध्य केलेले असते ते कधीच नष्ट होत नाही म्हणून गुरुजींच्या शिक्षण कार्याचा विकास होत गेला. जिथे प्रयत्नांची पराकाष्टा होते तिथे नशिबाला झुकावेच लागते. महात्मा बसवेश्वर, कुमारस्वामीजी धारवाड, विजयकुमार महास्वामी तांबाळा आणि आई नागम्मादेवी यांच्यावर गुरुजींची नितांत श्रद्धा होती. गुरुजींना वाचन, कायद्यांच्या पुस्तकांचा अभ्यास, अध्यात्मिक वाचनाचा छंद होता. तर कच्चे नकाशे काढणे, नियोजन, आयोजन ही विशेष कौशल्ये अवगत होती. स्पष्टवक्तेपणा, चिकित्सकवृत्ती, निर्भीडपणा, संवेदनशीलता, कल्पकता हे त्यांचे विशेष गुण होते. गुरुजी आयुष्यभर शुद्ध शाकाहारी व निर्व्यसनी जीवन जगले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव गुरुजींच्या विचारातून व कार्यपद्धतीतून दिसून येतो. त्यांनी स्वतः खादीचा वापर केला. गांधीजींच्या खेड्यांकडे चला या संदेशाप्रमाणे ग्रामीण भागात शैक्षणिक चळवळ उभी केली. शिक्षकाने गुणवत्तापूर्ण अध्यापन करावे यासाठी चिंतन शिबीर, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संस्कार शिबीर, मान्यवरांच्या भेटी, कमवा आणि शिका आदी उपक्रम आजही या संस्थेमध्ये राबवले जातात. त्यामुळे गुरुजींना आपण शिक्षणमहर्षी या नावाने ओळखतो. या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख शिक्षणातील संत म्हणून करावा लागेल. गुरुजींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले पण त्याचा गाजावाजा त्यांनी कधीही केला नाही.
आम्ही कॉलेजला असताना अनेकदा पाहिलं आहे की, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किंवा भाषण करत असताना गुरुजी विचार करून अंतरात्म्यातून बोलत असत. भाषण देत असताना डोळे बंद करून भाषण देणे ही त्यांची खास शैली. ज्ञानाची मशाल खेड्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मयोगी, शिक्षणमहर्षी, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त, शिस्तप्रिय प्रशासक, आदर्श संस्थाचालक कै. विश्वनाथराव वलांडे गुरुजी यांची २५ मार्च २०२२ रोजी प्राणज्योत मावळली. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी पवित्र स्मृतीस व कार्यास विनम्र अभिवादन.
*शब्दांकन :*
श्री बालाजी साधूराम मरळे
सहशिक्षक, महाराष्ट्र प्रा विद्यालय औराद शहा.
ता. निलंगा जि. लातूर
भ्रमणध्वनी : ९९२२६९९११५

Post a Comment
0 Comments