लावलेल्या झाडासोबत साजरा केला स्वतःचा वाढदिवस
प्रत्येकाने वाढदिवसाला एक झाड लावून जगवावे
लातूर :
वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असून, प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोलआप्पा स्वामी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 2021मध्ये लावलेल्या झाडाचा वाढदिवस स्वतःच्या यावर्षीच्या वाढदिवसा सोबत साजरा करून एक आदर्श आणि अनुकरणीय उपक्रम राबविला आहे.
लातूर जिल्हा हा कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे. २०१६ चा दुष्काळ आणि रेल्वेने पाणी आणण्याची वेळ का आली? याचा अभ्यास केल्यास लातूर जिल्ह्यात झाडांची संख्या कमी हे कारण लक्षात येते. वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यात मोठे योगदान दिले जात आहे. या काळात प्रतिष्ठानने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन वृक्ष चळवळ ही लोकचळवळ करण्यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती केली आहे. स्वतःचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करीत केवळ वृक्ष लागवड करून न थांबता लावलेल्या झाडासोबत आपला पुढील वाढदिवस साजरा व्हावा या हेतूने अमोलआप्पा स्वामी यांनी गतवर्षी लावलेल्या झाडासोबत यावर्षीचा वाढदिवस साजरा केला आहे. एक-एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन केल्याशिवाय पर्यावरण संरक्षण होणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. वाढदिवसानिमित्त एक झाड लावून त्या झाडाचे संगोपन केल्यास मोठ्या प्रमाणावर वृक्ष संवर्धन होण्यास मदत होणार आहे. झाडाचा पहिला वाढदिवस फुगे बांधून साजरा करण्यात आला. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रा.योगेश शर्मा, सदस्य संतोष धानुरे व प्रसाद कोळी उपस्थित होते.
*वाढदिवसाचा करू संकल्प-लावू वृक्ष करू त्याचे संवर्धन : प्रा.योगेश शर्मा*
*************************
प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प करायला हवा. मी माझा वाढदिवस किमान एक तरी वृक्ष लावून साजरा करणार आणि पुढील वर्षी त्या लावलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा करून स्वतःचा वाढदिवस साजरा करणार. वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज असून, प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन केल्यास मोठ्या प्रमाणावर वृक्षांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे स्वतःचा असो किंवा घरातील इतर सदस्यांचा वाढदिवस असो किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे आणि त्या झाडासोबत पुढील वर्षी वाढदिवस साजरा करावा असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रा.योगेश शर्मा यांनी या माध्यमातून केले आहे.

Post a Comment
0 Comments