Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*मातृसंस्कृतीचा आदर्श भारतीय वारसा* संभाजी नवघरे


मातृसंस्कृतीचा आदर्श भारतीय वारसा

ज्याप्रमाणे एखाद्या गरुडाचे सामर्थ्य त्याच्या पंखात असते, सिंहाचे सामर्थ्य हे त्याच्या दातात आणि नखामध्ये असते, कोकिळेचे सामर्थ्य हे तिच्या कंठात असते, अगदी त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्राच्या विकासाचं खरं सामर्थ्य हे त्या राष्ट्रातील स्त्रियांच्या प्रगतीत असते ज्या राष्ट्रातील स्त्रियांची प्रगती अधिक त्या राष्ट्राचा विकास अधिक हे खऱ्या अर्थाने आता सूत्रच बनलेले आहे हे जगाला दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने दाखवून दिले. भारतासंर्भात विचार करता या देशात प्राचीन सिंधू संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती म्हणून उदयाला आलेली होती या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने या देशात अनेक कर्तृत्ववान महिलांचा इतिहास तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणा देत आलेला आहे . म्हणून आज भारताची ओळख आपण मातृसत्ताक देश ही सांगताना या देशातील प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये सकाळच्या प्रार्थने नंतर आम्ही सर्वजण मोठ्या अभिमानाने म्हणतो की भारत माता की जय जगाच्या पाठीवर आपल्या देशाला माता म्हणणारा भारत हा एकमेव देश आहे यातूनच मातृसत्ताक संस्कृती या देशात किती मोठ्या प्रमाणात रुजली आहे हे आपल्याला सहज लक्षात येण्यासारखे आहे आज आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्ती ही खऱ्या अर्थाने विकासाच्या रथाचे एक अत्यंत महत्त्वाचं आणि सक्षम चाक आहे या अनुषंगाने थोडक्यात घेतलेला हा आढावा.
     भारतीय कुटुंब व्यवस्था ही भारतीय स्त्रीच्या त्यागावर आधारलेली आहे पिढ्यानपिढ्या अपमान आणि दुःख भोगून महिलांनी ही सहज सुंदरता राखून ठेवली होती. कुटुंब संस्था अगदी आवश्यकच आहे परंतु अन्याय केला तरीही तो स्त्रीने मुखाट्याने सहन करावा काय? आज समाजात अनेक उदाहरणे बघावयास मिळतात कुठे दारू पिऊन पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करणारा तर कुठे स्वतः द्विभार्या प्रतिबंधक कायदा असतानाही दुसरी पत्नी करणारा नवरा ,तर कुठे स्वतः काहीही कष्ट न करता केवळ पत्नीच्या कमाई वर जगणारा आइतखाऊ आणि तरीही पत्नीवर अधिकार गाजविणारा अहंकारी नवरा, अशी कितीतरी नवऱ्याची रूपे पहावयास मिळतात या सर्व पुरुषांना स्त्रीने केवळ त्याच्याशी तिचे जन्माचे नाते जोडले आहे म्हणून स्वीकारावं काय? व रडत रखडत आपल्या कर्माला दोष देत जगावे काय? नाही या अन्यायाविरोध सामना करण्यास जेव्हा तिच्यामध्ये संकटाला सामोरे जाण्याची हिंमत येईल तेव्हाच खरी स्त्रीमुक्ती झाली असे आपणास समजायला हरकत नाही. तो दुसरे लग्न करीत असेल तर पत्नी आपल्या पतविरुद्ध तक्रार करण्याची हिम्मत दाखवील तेव्हाच स्त्रीमुक्ती होईल. आणि असे प्रकार जर काही प्रमाणात घडले तर दुसरे लग्न करणारालाही खरी दहशत बसेल. आज अनेक सुशिक्षित स्त्रिया फक्त स्वतःपुरता विचार करताना दिसून येतात शिक्षण घेऊन स्वावलंबी बनलेल्या आमच्या महिला या समाजातील इतर स्त्रियांना कमी लेखतात त्यांचा द्वेष करायला लागतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रियांचे विरोधक किंवा स्त्रियांचं शोषण करणारे हे फक्त पुरुषच आहेत असे नाही तर स्त्रियांचं शोषण करणारी स्त्रिसुध्दा आहे हे आपण समजून घेतले पाहिजे कारण समाजात सुनेचा छळ करणारी सासू ,नणंद आहे ही रूपं समाजातील एक खलनायक बनलेली आहेत ही प्रतिमा कुठेतरी बदलण्याची मानसिकता सर्वच स्त्रियांनी ठेवणे गरजेचे आहे स्त्री मुक्ती म्हणजे सुधारणा परंतु या सुधारणाच्या मागे धावता धावता आपला तोल गमवायला नको बरेचदा या चळवळीमध्ये थोडासा अतिरेक होतानाही जाणवतो. सुधारणा आपण केलीच पाहिजे परंतु हे करताना स्त्रियांनी स्वतःला विविध गोष्टीत अपडेट ठेवणे ही गरजेचे आहे. सामाजिक सुधारणा यांचा आग्रह धरणे ही समाजाची गरज आहे. 
    आजकाल आवडीनिवडीच्या व उच्च राहणीमानाच्या नावाखाली कपड्यांचे भान राहिलेले नाही स्वातंत्र्याच्यानावावर वाटेल तसे घट्ट पारदर्शक कपडे घालून पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या भौतिक वादाच्या मागे धावणाऱ्या युवती किंवा स्त्रिया ह्या पुरुषांना दोष देऊन रिकाम्या होतात हेही योग्य नाही. एकीकडे आपणच स्त्रीशक्तीच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे आपणच पुरुषांच्या हातातील बाहुली बनण्याचा प्रयत्न करायचा हे परस्पर विरोधी नाही काय ? अर्थात या काही अपवादात्मक गोष्टी आपण टाळणे गरजेचे आहे स्त्रीमुक्ती म्हणजे स्वातंत्र्याचा दुरुपयोग कुटुंब व्यवस्थेला तडा नव्हे स्त्री व पुरुष ही संसाररूपी रथाची दोन समान चाक आहेत ज्या रस्त्यावर हा रथ चालवायचा तो रस्ता काही नियतीने अगदी गुळगुळीत करून ठेवलेला नसतो रस्त्यावर खाज खळगी असणारच संसाराचे देखील तसेच आहे परस्परांच्या सामंजस्यातून आणि सहकार्यातून हा संसाराचा रथ चालवावा लागतो याकरिता दोघांनीही त्याग करायला हवा केवळ स्त्रीला त्यागाची सहनशीलतेची मूर्ती बनवू नये स्त्रीयांनाही स्वतः चे व्यक्तिमत्व विकसित करण्याचा हक्क प्रदान करणे गरजेचे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
    भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च हा महिला दिवस1943 साली साजरा केला गेला त्यानंतर 1971 सालच्या 8 मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी येत गेली. स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय संस्कृती परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले. तसे स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या आता बँका ,सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या तसेच काही घरांमधूनही 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा होताना पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान होत आहे.
    8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा होताना जगातल्या सर्व स्त्रियांनी आपले आयडॉल कोण असावेत याचा विचार करणेही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे . आज विविध चित्रपटांच्या आणि मालिकांच्या माध्यमातून अंगावर तोकडे कपडे घालून मिरवणाऱ्या आणि करोडो रुपये कमवण्याच्या नावाखाली अंग प्रदर्शन करणाऱ्या स्वतःला नायिका समजणाऱ्या विकाऊ महिला आपल्या आयडॉल होऊ शकतील का ? याचा आपण विचार करावा ज्या देशात आपण वावरतो आहोत त्या देशात अनेक क्रांतिकारक आणि महापराक्रमी महिलांचाही वारसा आपल्याला मिळालेला आहे जागतिक आदर्श मातृत्वाचा मानबिंदू म्हणून ज्या मातेकडे आपण पाहतो ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ही आपली आदर्श असली पाहिजे. ज्या सावित्रीबाई फुलेंनी समाजातील लोकांचा रोष पत्करून अन्याय अत्याचाराची तमा न बाळगता येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना केला परंतु मुलींना शिक्षणापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही हा ध्यास उराशी बाळगून या देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि सर्व मुलींच्या आणि महिलांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला त्या सावित्रीबाई फुले या आमच्या आदर्श असल्या पाहिजेत. मुस्लिम समाजात बुरखा पद्धत असतानाही खऱ्या अर्थाने शिक्षणातून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदापर्यंत मजल मारणारी फातिमा बीबी ही आपली आदर्श असली पाहिजे. ख्रिश्चन समाजामध्ये जन्माला येऊन खऱ्या अर्थानं प्रचंड मोठं जागतिक स्तरावरचं समाजकार्य करून स्वतःच्या कर्तुत्वाने आंतरराष्ट्रीय नोबेल पारितोषिक विजेती ठरलेली मदर तेरेसा या आपल्या आदर्श असल्या पाहिजेत. ज्या माऊलीने औरंगजेबासारख्या महाबलाढ्य शत्रुला स्वतःच्या तलवारीने पाणी पाजलं आणि याच महाराष्ट्राच्या मातीत त्याची कबर खोदली ती महाराणी महाप्रतापी ताराराणी ही आपली आदर्श असली पाहिजे. आज एकविसाव्या शतकामध्ये स्वतःच्या कार्यकर्तुत्वाने अंतराळामध्ये उडान घेणाऱ्या आणि स्वतःच्या कार्यकर्तुत्वाची छाप जगाला दाखवून देणाऱ्या सुनीता विल्यम्स कल्पना चावला या आपल्या आदर्श असल्या पाहिजेत म्हणून आज जागतिक महिला दिन साजरा करत असताना आमच्या माता भगिनींनी खऱ्या अर्थाने अशा महा कर्तृत्वत्वान महिलांना आपला आदर्श मानून त्यांच्या विचाराने आपल्या जीवनाची वाटचाल चालू ठेवली तर निश्चितपणे आपण जागतिक महिला दिन साजरा करताना आपल्या सर्वांना या सर्व महिलांचा अभिमान वाटला पाहिजे.
   ज्या देशात आपण राहतो त्या देशात स्त्रियांचा महान कार्य कर्तुत्वाचा इतिहास असला तरीही वैदिक काळामध्ये याच देशात स्त्रियांना गुलाम बनवून स्त्रियांवरती अनेक बंधनं लादली गेली अगदी ढोरांप्रमाणे आणि शुद्रांप्रमाणे वागणूक या देशातील स्त्रियांना दिली गेली परंतु तीही परिस्थिती भविष्यात बदलून टाकण्याचं काम आमच्या देशातील अनेक कर्तृत्ववान माता भगिनींनी केलेले आहे.
   म्हणून आज आपल्या देशाचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल आणि त्या देशाला जागतिक महासत्ता बनवायचं आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपण सर्वांनी या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकच संकल्प करूया की,
 जीवनको शत शत आहुती में जलना होगा, गलना होगा, अगर इस देशकी उन्नती करनी है तो नारीकि उन्नती करना होगा.

        संभाजी नवघरे
राष्ट्रीय अध्यक्ष संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष
               तथा
 बहिश:ल वक्ता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड

Post a Comment

0 Comments