तुम्ही थुंका…. आम्ही साफ करतो ! वसुंधरा प्रतिष्ठानने स्वच्छ केल्या भिंती;
सुपारी खाऊन सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन.
लातूर – प्रतिनिधी
लातूर शहरात मनपाने मोठ्या प्रमाणावर खर्च करून भिंतीचे सुशोभीकरण केले आहे. मात्र अनेकजण सुपाऱ्या खाऊन थुंकत असल्याने या भिंतींचे विद्रुपीकरण होत आहे. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवून स्वतः या भिंती स्वच्छ केल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम राबवून पदाधिकारी यांनी अक्षरशः सुपारी खाऊन थुंकलेल्या अस्वच्छ भिंती पाण्याने धुऊन स्वच्छ केल्या. लातूर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही या माध्यमातून वसुंधरा प्रतिष्ठानने केले आहे.
आपले लातूर स्वच्छ अन सुंदर दिसण्यासाठी लातूर मनपाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर खर्च करून भिंतींचे सुशोभिकरण केले आहे. अनेक भिंती विविध रंगानी रंगवून बोलक्या केल्या. मात्र, अनेकजण सुपाऱ्या खाऊन थुंकत असल्याने या भिंती लालबुंद झाल्या आहेत. भिंतींचे होणारे विद्रुपीकरण थांबावे यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने या भिंती स्वच्छ केल्या आहेत. शिवाय, स्वच्छ लातूरकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे. नागरिक मनपाकडे कर भरणा करतात या भरलेल्या कर रकमेतून शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी भिंतींचे सुशोभीकरण मनपाने केले आहे. मात्र, या भिंतीवर थुंकल्याने याचे विद्रुपीकरण होत असल्याचे निदर्शनास आल्याने वसुंधरा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी या रंगविलेल्या भिंती स्वच्छ केल्या आहेत. या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा.योगेश शर्मा, डॉ.अजित चिखलीकर, अमोलआप्पा स्वामी, हुसेन शेख, संजय माकुडे आदींनी सहभाग घेत स्वतः या भिंती स्वच्छ केल्या.
*लातूरची स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी……!*
*************************
आपले लातूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोणीही थुंकू नये, असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे. सुपाऱ्या खाऊन थुंकणाऱ्याना ‘बहाद्दर’ अशी उपाधी देण्यात आली आहे. शहरात स्वच्छता असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाखाली उघड्यावर नागरिक लघुशंका करीत असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांनी लघुशंकेसाठी मनपाच्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे आवश्यक आहे. आपले लातूर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानने केले आहे.

Post a Comment
0 Comments