चिंचोले परिवार, वसुंधरा प्रतिष्ठानने 2020 साली लावलेल्या 35 झाडांचा वाढदिवस
लातूर : लातूरचे लोकप्रिय माजी जिल्हाधिकारी व सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जी. श्रीकांत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2020 मध्ये शहरातील विशाल नगर, मोती नगर आदी भागात एकूण 35 झाडांची लागवड करण्यात आली होती. या झाडांना आज तीन वर्षे पूर्ण झाली असून, लावलेल्या 35 झाडांपैकी 35 झाडे जगली आहेत. या 35 झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशाल नगर भागात चिंचोले परिवार आणि वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने जी. श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले होते.
एक वृक्ष मित्र, उत्तम प्रशासक, खेळाडू असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे जी. श्रीकांत यांनी लातूरचे जिल्हाधिकारी असताना उत्तम कार्य केले आहे. त्यांच्या कार्याने ते जनमाणसात लोकप्रिय आहेत. 2020 मध्ये अगदी कोरोनाची परिस्थिती असतानाही कोरोनाचे सर्व नियम पाळून जी. श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा प्रतिष्ठानने मोती नगर, बलदवा नगर आणि विशाल नगर भागात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली होती. त्यांचा 35 वा वाढदिवस 35 विविध प्रकारची पर्यावरणपूरक झाडे लावून साजरा करण्यात आला होता. या झाडांपैकी सर्वच्या सर्व झाडे अगदी उत्तम पध्दतीने जगली आहेत. विशाल नगरात लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोकराव चिंचोले, प्रा. प्रतिक चिंचोले, यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्यकारी प्रमुख अमोलआप्पा स्वामी, सदस्य संजय माकुडे, संगमेश्वर स्वामी, शुभम निलंगेकर यांची उपस्थिती होती.
*प्रत्येकाने आपला वाढदिवस झाडांसोबत साजरा करावा : अशोकराव चिंचोले*
************************
केवळ वृक्ष लागवड करून काही उपयोग नाही, लावलेल्या झाडांचे संवर्धन अधिक महत्त्वाचे आहे. किती झाडे लावली यापेक्षा किती जगविता येतील याकडे सर्वांनी अधिक लक्ष द्यायला हवे. पावसाळा सुरू झाला असून, प्रत्येकाने संकल्प करावा आणि या पावसाळ्यात किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करण्यासाठी पुढे यावे. माजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या झाडांचा आज वाढदिवस साजरा करताना मनस्वी आनंद झाला. प्रत्येकाने आपले वाढदिवस अशा पध्दतीने साजरे केल्यास पर्यावरण संरक्षण होण्यास मोठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार अशोक चिंचोले यांनी दिली.


Post a Comment
0 Comments