Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*तेरणाकाठचा उद्योगपती हरपला* -सतीश हानेगावे

*तेरणाकाठचा उद्योगपती हरपला*
                                              -सतीश हानेगावे 

प्रेमचंद बियाणी हे मूळ औराद शहाजनीचे. प्रेमचंद रंगलाल बियाणी या नावाने जि. प. प्रा. शाळा तगरखेडा या शाळेत त्यांच्या नावाचा दाखला सापडतो. त्यांचे बंधू मुकुंददास  बियाणी हे अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्व; पण घरची अत्यंत बिकट परिस्थिती. प्रेमचंदजी यांचा जीवन प्रवास प्रचंड खडतर, प्रतिकूल, संघर्षशील राहिलेला आहे. आम्ही खूप लहान होतो. तेव्हा त्यांचा हॉटेलचा व्यवसाय होता. या व्यवसायापासून त्यांच्या जीवनातील जडणघडणीला सुरुवात झाली. एक एक उद्योगधंदा बदलत बदलत अनेक व्यापार उद्योगधंदे त्यांनी केले. प्रत्येक चढउतारात शिकत राहणारे ते होते‌. जीवनाच्या मुशीतून आलेले त्यांचे शहाणपण त्यांना नंतरच्या काळात एका प्रचंड मोठ्या उंचीवर घेऊन गेले हे एक वास्तव आहे.
 अनेक घटना प्रसंगाच्या माध्यमातून माझा खूप जवळून संपर्क आला. जीवनातल्या काही खाजगी घटना प्रसंगावरही आम्ही अनेकदा बोललो. कालच शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कृतज्ञतेबद्दल भेटायला जायचे होते; परंतु माझा जवळचा पाहुणा वारल्यामुळे मी काल त्यांना भेटू शकलो नाही ही खंत कायमच मनात राहिली. त्यांना जवळून अनुभवत असताना अनेक चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न मी केला. एक साधे हॉटेल चालवणारा माणूस नंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून उत्तम काम करतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यापीठात त्यांचे सिनेट मेंबर म्हणूनही कार्य वाखाण्याजोगे होते.
 
 शारदोपासक शिक्षण संस्थेची त्यांची नाळ लहानपणापासूनच जुळली होती. ते शारदोपासक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते. संस्थेच्या अनेक चढउतारात अडीअडचणीत ते नेहमी खंबीरपणे उभे टाकले. जीवनात आलेल्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर कसे मात करावे याचे शिक्षण त्यांना जीवनातल्या विद्यापीठातून मिळालेले होते. आपल्या स्वतःच्या मोडकळीस आलेल्या कुटुंबाला उभे करण्यासाठी जीवाचं रान करणारा हा माणूस या कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने देवदूतच होता. प्रेमचंदजी यांचा वावर जसा सामाजिक, शैक्षणिक, व्यापार उद्योग, कृषी, धार्मिक कार्यात होता तसाच तो वावर विविध समाज उपयोगी कामांमध्येही होता. अनेक रस्ता बांधकामापासून ते मंदिर उभारणीपर्यंत, मज्जिदीसाठीच्या आर्थिक हातभारापासून ते धार्मिक कार्यातील भोजनाच्या पंक्ती उठवण्यापर्यंत सढळ हाताने मदत करणारा हा माणूस वेगळाच! देणगी मागण्यासाठी आलेल्या कुठल्याही माणसाला आजपर्यंत माघारी पाठवल्याचे आठवत नाही. मग ते काम भवानी मंदिराच्या हातभाराचे असो की गणेश नगर मधील गणेश मंदिराचे असो प्रचंड दानातवॄत्ती लाभलेला हा माणूस औरादच्या इतिहासात वेगळाच ठरतो. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्याची बांधिलकी तर त्यांच्या रोमारोमात भिणलेली होती. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, मा. शिवराज पाटील चाकूरकर, मा. विलासराव देशमुख यांच्यावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. शेवटपर्यंत ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून वावरत राहिले. सेवकापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आणि आमदारापासून ते राज्यपाल, मुख्यमंत्र्यापर्यंत कामे कशी करून घ्यावीत यांचे ते मूर्तीमंत उदाहरण होते. यशस्वी होण्यासाठी व आर्थिक समृद्ध होण्यासाठी प्रचंड कठोर मेहनत घेण्याची त्यांची मानसिक तयारी हे त्यांच्या यशाचे गमक होते. शिस्तबद्ध कागदपत्री नियोजन हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे बलस्थान होते. त्यांच्या घरातील व कार्यालयातील पॅडला नेहमी नियोजनाची कागदपत्रे ठेवलेली असायची व ते दिवसभराचे नियोजन प्रेमाने दाखवायचे. खरे म्हणजे ते औरदकरांसाठी व सर्वांसाठीच मॅनेजमेंट गुरु होते. 
 
कौटुंबिक, शेतीविषयक, संस्थाविषयक, व्यापार उद्योगधंद्यांच्या फायली कशा तयार कराव्यात व ते रेकॉर्ड प्राधान्यक्रमानुसार कसे ठेवावे याचा ते आदर्श वस्तूपाठ  होते हे विसरता येत नाही. त्यांचे पुस्तक प्रेम अफलातून होते. स्वतःच्या घरातच अत्यंत सुंदर अशी लायब्ररी आम्ही पाहिली. ग्रामपंचायत कायद्यापासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी कायद्याची पुस्तके त्यांच्याकडे आहेत. गाजलेली पुस्तके व धार्मिक ग्रंथ हा त्यांच्या आवडीचा छंद होता. आपल्या आयुष्यात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, व्यापार उद्योगधंद्यातील हजारोंच्या संख्येने माणसं जोडली. 

प्रेमचंद बियाणी यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रेमाने, नम्रतेने, संयमाने अवघडातले अवघड काम करून घेण्याचे कौशल्य हे अफलातून होते. त्यांच्या बोलण्यातील शिष्टाचार हा जीवनाच्या अनुभवातून आलेला होता. या शिष्टाचाराने या माणसाला व्यावसायिक जगतामध्ये खूप मोठे बनवले. मग त्यांचे हे बोलणे व्यावसायिक जगतातील असो की, संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारी असो की, सामाजिक चळवळीत किंवा राजकीय व धार्मिक सभेत बोलत असताना ते अत्यंत नम्रतेने अभ्यास करून आपले चिंतन मांडायचे. घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाचा ते अत्यंत आदराने शिष्टाचार करायचे. त्यात त्यांच्या धर्मपत्नीचा सिंहाचा वाटा असायचा.  अनेकदा मोठा पंजाबी ग्लास भरून केशर टाकलेले दूध प्यायला मिळायचे. त्यांच्या शिष्टाचाराणे आम्ही अनेकदा भारावून जायचो. आपल्या मारवाडी समाजाबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. साऱ्या समाजाने एकजुटीने राहिले पाहिजे हे त्यांना शेवटपर्यंत वाटायचे. आपल्या इच्छित ध्येयाशिवाय हा माणूस जीवनात कुठेच रमला नाही. त्यांच्या स्वतःच्या जीवनाला एक शिस्त होती. वेळेचे महत्त्व त्यांनी जाणले होते. नियोजनाशिवाय जीवनात यश मिळत नाही म्हणून रात्रंदिवस तो नियोजनात रमणारा माणूस होता. आपण भले आपले काम भले हे त्यांचे जीवनसूत्र होते. प्रत्येक छोटी मोठी कामे करीत असताना दूरदृष्टी ठेवूनच या माणसाने काम केले. शारदोपासक शिक्षण संस्थेच्या बैठकीत एखादी गोष्ट नाही आवडल्यास ते कर्मचाऱ्यांना प्रेमाने समजावून सांगायचे. नीटनेटकेपणा, सुव्यवस्थितपणा, शिस्त, फाईलीचे व्यवस्थापन त्यांच्या आवडीचा विषय होता. यापुढे आता शारदोपासक शिक्षण संस्थेच्या बैठकीत प्रेमचंदजी  दिसणार नाहीत ही गोष्टच मनाला अस्वस्थ करणारी आहे. गावकीच्या कुठल्याही कामांमध्ये आता त्यांचे नेतृत्व दिसणार नाही या गोष्टीची खंत वाटते. औरादनगरी व तेरणाकाठाला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा हा दीपस्तंभ अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने असा निघून जाणे हे धक्कादायक आहे.

तरुण वयापासून ते आजपर्यंत या माणसाने हजारो किलोमीटरचा प्रवास आपल्या हयातीत केला. पुणे, मुंबई, हैदराबाद, मथुरा, काशी, अहमदाबाद, दिल्ली असे त्यांचे दौरे असायचे. कौटुंबिक धावपळीपासून ते व्यावसायिक धावपळीपर्यंत प्रचंड संघर्ष, त्याग, समर्पण प्रेमचंद बियाणी यांनी केले. जीवनाच्या या प्रचंड धावपळीतल्या रहाटगाडग्यात कदाचित स्वतःच्या प्रकृतीला वेळ देणे त्यांना शक्य झाले नसावे. युवा अवस्थेपासून ते इथपर्यंत या साऱ्या प्रवासाचा ताण  कदाचित त्यांच्या शरीरावर होत गेला असावा. आज औराद नगरीच्या इतिहासात हा अत्यंत दुर्दैवी दुःखाचा क्षण येवून ठेपला. व्यावसायिक क्षेत्रामध्ये असा माणूस पुन्हा घडण्यासाठी अनेक पिढ्या जाव्या लागतात असं हे रसायन होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेल्या औरादनगरीमध्ये अनेक प्रतिभावंत माणसं होऊन गेली. त्यांनी या मातीला   खूप काही देण्याचा प्रयत्न केला आहे. माझे हे वक्तव्य काहींना आवडेल काहींना आवडणारही नाही; परंतु सत्य हे कटू असते. जीवन जगत असताना प्रत्येक माणसांमध्ये गुणदोष असतात. माणूस हा गुणदोषाचाच बनलेला असतो. समोरच्या माणसांना स्वीकारताना त्याला गुणदोषसह स्वीकारले की मग त्यात दोष उरत नाही. जगातला कुठलाही माणूस हा परिपूर्ण नाही.

 तेरणाकाठच्या अनेक प्रतिभावंतापैकी शारदेचे विनम्र उपासक आदरणीय विश्वनाथराव वलांडे गुरुजी, सर्वोत्तम व्यवस्थापक प्राचार्य सदाविजय आर्य, अनेक कला कौशल्य व वक्तृत्वाने संपन्न असलेला वाटाड्या  व्हि.एम.कुलकर्णी, सढळ हाताने आर्थिक मदतीसाठी परोपकाराची भावना घेऊन उभा टाकणारा बस्वराजप्पा गस्तगार आणि आता मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उद्योगपती प्रेमचंदजी बियाणे अशा माणसांच्या निधनाने औराद नगरीतील तेरणाकाठाचे अतोनात नुकसान झाले आहे. व्यावसायिक व व्यापार जगतातील एक खूप मोठा माणूस गेल्याची खंत तेरणेच्या काठाकाठातून व्यक्त होत आहे.
 
 खऱ्या अर्थाने अनेकांच्या काळजामध्ये आपल्या आठवणींने घर करून जाणारा हा माणूस म्हणजे तेरणाकाठच्या अंधारातील दीप होता. हा दीप आता मावळला आहे; परंतु प्रत्येकाच्या अंतकरणात घर करून असलेल्या त्यांच्या चांगल्या आठवणींचा दीपमात्र अखंडपणे प्रत्येकाच्या अंतकरणात तेवतच राहणार आहे. आम्ही सर्वजण आपल्या दुःखात सहभागी आहोत. त्यांची धर्मपत्नी, मुले, सुना, नातवंडे, कुटुंबिय, हितचिंतक यांना हे अपार दुःख पचवण्याचे आत्मसामर्थ्य प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! आम्हा सर्वांच्या वतीने विनम्रपणे शब्दांजली...

शब्दांकन: सतीश हानेगावे 
प्रदेश संघटक-जगद्गुरु तुकोबाराय
साहित्य परिषद, महाराष्ट्र तथा
महासचिव- राष्ट्रीय संत गाडगेबाबा प्रबोधन मंच

Post a Comment

0 Comments