(उदगीर, प्रतिनिधी) परिसर आणि परिस्थितीनुसार चालीरीती, रूढी- परंपरा व राहणीमान आणि बोली बदलत असतात. त्यातूनच प्रत्येक गावची वेगळी ओळख निर्माण होते. श्रद्धा आणि समज हे प्रसंगाधिष्ठित असतात. अशा परिस्थितीचा कुटुंबासह बालमनावर परिणाम होतो. या सर्वांवर प्रकाश टाकत उदयगिरी बोली आणि परिसराची ओळख करून देणारी बगळा ही कादंबरी होय असे मत शिवाजी अंबुलगेकर यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादचे 349 वे पुष्प सुप्रसिद्ध साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर यांनी उदगीरचे भूमिपुत्र प्रसाद कुमठेकर लिखित बगळा या कादंबरीवर संवाद साधून गुंफले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहि साहित्यिक राजेश्वर वेरुळकर हे होते. यावेळी बोलताना शिवाजी अंबुलगेकर म्हणाले की, उदगीरच्या निसर्गातली अनंत विपुलता किती व कशी आहे हे सांगण्यासाठी परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांची ओळख, येथे बोलली जाणारी बोली व त्यातली शिवी याचा बालमनावर होणारा परिणाम आणि येथील शिक्षण पद्धती यामुळे वेगळ्या वाटेकडे वळणारी मुलं याचा जाणकाराने डोळसपणे विचार करायला पाहिजे असे लेखक प्रसाद कुमठेकर यांनी बगळा या कादंबरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असे म्हणाले.
अध्यक्षीय समारोपत वेरूळकर म्हणाले प्रसाद कुमटेकरांचे आपल्या माती विषयीचे मत बगळा कादंबरीच्या आधारे शिवाजी अंबुलगेकर यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने पटवून दिले आहे.
अत्यंत प्रभावी ठरलेल्या या कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ. म. ई. तंगावार यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. विठ्ठल गोरे यांनी करून दिले तर आभार नाट्य लेखक तुळशीदास बिरादार यांनी मानले.

Post a Comment
0 Comments