*व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
महापालिकेच्यावतीने ४ केंद्रांवर चाचणीची सुविधा
आठ दिवसात चाचण्या करून घेण्याचे आवाहन*
लातूर/ प्रतिनिधी: कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी शहरातील सर्व व्यापारी,व्यावसायिक आणि दुकानदारांच्या कोरोना चाचण्या करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून चाचण्यांसाठी महानगरपालिकेच्या वतीने ४ केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आठ दिवसांच्या कालावधीत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या कोरोना चाचण्या करून घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील काही दिवसात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.यांनी दि.१८ मार्च रोजी एक आदेश जारी केला आहे. शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी चाचण्या करून घ्याव्यात असे निर्देश त्यांनी दिले आहेत.या अनुषंगाने शहरातील व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अमन मित्तल यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. महानगरपालिकेच्या वतीने व्यापारी,व्यावसायिक आणि दुकानदारांच्या तपासण्या करून घेण्याची तयारी करण्यात आली आहे.यासाठी ४ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.औषधी भवन,साळे गल्लीतील यशवंत शाळा,औसा रोडवरील पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनचे केंद्र व समाज कल्याण वसतिगृह या चार ठिकाणी चाचण्या करता येणार आहेत.त्यानुसार सोमवारपासून ( दि.२२ मार्च )पालिकेने चाचण्या सुरूही केल्या आहेत.
या चारही चाचणी केंद्रावर व्यापारी,दुकानदार व व्यावसायिकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.
यासाठी त्या- त्या भागातील व्यापारी,व्यावसायिक आणि दुकानदारांनी संघटनांशी संपर्क साधावा.एकाच केंद्रावर गर्दी होवू नये यासाठी संघटनांनी प्रत्येक तारखेनुसार नियोजन करावे.
व्यापारी आणि संघटनांच्या नियोजनानुसार आठ दिवसांच्या कालावधीत प्रत्येकाने तपासण्या करून घ्याव्यात,असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments