Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*मराठी भाषेत करिअर आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध* -डाॅ.संभाजी पाटील



 'मराठी भाषेत करिअर आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध' -डाॅ.संभाजी पाटील 

औराद शहाजानी :-

 मराठी भाषेतून विविध स्पर्धा परीक्षा,प्रसारमाध्यमे,सिनेसृष्टीतील कथालेखन व संवाद,पत्रकारिता,वृत्तवाहिनी,प्रकाशन संस्था,निवेदक,अनुवादक,टंकलेखन व मुद्रितशोधन अशा अनेक प्रकारच्या करिअर व रोजगाराच्या संधी उपलब्ध असून यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत सर्वांगीण प्राविण्य व व्यासंग संपादन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त,लातूर येथील मराठी विभागप्रमुख डाॅ.संभाजी पाटील यांनी केले.येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने 'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ानिमित्त शुक्रवार दि‌‌.२८ जानेवारी २०२२ रोजी 'मराठी भाषेची वाटचाल' या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजितसिंह गहेरवार होते.पुढे बोलताना डाॅ.संभाजी पाटील यांनी प्राचीन काळापासून ते सध्याच्या एकविसाव्या शतकापर्यंतच्या मराठी भाषेच्या समृद्ध वाटचालीवर संदर्भासह प्रकाश टाकला.मराठी भाषेचे संवर्धन हे केवळ शासन आदेश म्हणून ठराविक पंधरवडय़ापुरतेच करावयाचे नसून यासाठी मराठी भाषिक जनतेने निरंतर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.मराठी भाषेबाबत 

सातवाहन,यादव,बहामनी,निजाम आणि ब्रिटिश इत्यादी राजवटीचा आढावा घेत वारकरी,महानुभाव,शैव,नाथ या संप्रदायांचे योगदान मांडले.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम यांच्यासोबतच विविध संतांच्या साहित्यिक कार्याचा परिचय ही करून दिला.मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,कोकण,विदर्भ,खानदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मराठी बोली भाषेतील इतरांपेक्षा असलेले वेगळेपण विविध उदाहरणांतून स्पष्ट केले.शिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकचळवळीवर भर देत जागतिकीकरण,वाढते स्थलांतर,इंग्रजी शाळांचे वाढलेले प्रमाण इत्यादी बाबींकडे आपल्या व्याख्यानातून उपस्थितांचे लक्ष वेधले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.अजितसिंह गहेरवार यांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन याबाबत आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डाॅ.शंकर कल्याणे यांनी केले तसेच डाॅ.अशोक नारनवरे यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.बलभीम सातपुते यांनी मानले.गुगल मिटच्या माध्यमातून संपन्न झालेल्या या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमास उपप्राचार्य डाॅ.प्रदीप पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी आणि ग्रामस्थ (आॅनलाईन )आभासी पद्धतीने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments