Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*“जलसंवर्धन साक्षरतेच्या जाणीवजागृतीत युवकांची भूमिका महत्वाची”* डॉ.संजय गवई


 “जलसंवर्धन साक्षरतेच्या जाणीवजागृतीत युवकांची भूमिका महत्वाची” 

डॉ.संजय गवई 

जलजागरण आणि जलसंवर्धन साक्षरता कार्यक्रम

लातूर :-(प्रतिनिधी)

लातूर शहराचा परिचय हा सन 1993ला झालेला किल्लारी येथील प्रलयकारी भूकंप, शैक्षणिक क्षेत्रामधील क्रांतिकारक शहर आणि मागील काही वर्षापासून रेल्वेने आलेले पाणी! या सर्व बाबींमुळे लातूरचा सर्वांनाच परिचय आहे. मात्र लातूरला रेल्वेने पाणी आणने ही आपल्यासाठी अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे. परंतु मागील तीन ते चार वर्षापासून लातूर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सक्रिय आणि सकारात्मक प्रतिसादामुळे आज लातूर जिल्ह्याची भूजल पातळी ही नक्कीच वाढलेली आहे परंतु भविष्यात ही भूजल पातळी आपल्याला टिकून ठेवायची असेल तर जलजागरण आणि जलसंवर्धन साक्षरता करणे गरजेचे आहे यासाठी समाजातील युवक युवतीने पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन नेहरू युवा केंद्र, लातूरचे सल्लागार समिती सदस्य तथा रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई यांनी केले.  



नेहरू युवा केंद्र संघटन, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा युवा अधिकारी कार्यालय, लातूर आणि ग्रामपंचायत कार्यालय, वलांडी ता.देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने जलजागरण आणि जलसंवर्धन साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी विचारमंचावर सरपंच राणीताई राम भंडारे, उपसरपंच प्रा.मेहमूद सौदागर, प्रमुख अतिथी म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिरीषकुमार जाधव, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तथा वात्सल्य समितीचे सदस्य वरुणराज सूर्यवंशी, नेहरू युवा केंद्राचे देवणी तालुका समन्वयक परमेश्वर बिरादार आणि प्रणव बिरादार यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले हा कार्यक्रम जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैय्या आणि संजय ममदापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.  

पुढे बोलताना डॉ.संजय गवई म्हणाले की, पाण्याची बचत आपण साध्या साध्या गोष्टीपासून करू शकतो जसे आपल्या घरी व्यक्ती आल्यानंतर त्यांना पूर्ण ग्लास पाणी न देता अर्धा ग्लास देणे, घरातील सांडपाण्यावर परसबाग फुलविणे आणि सातत्याने पाण्याच्या बचतीचा विचार कृतीत उतरवणे या बाबी महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले. 

या कार्यक्रमांमध्ये शिरीष जाधव यांनी जलसंवर्धनाची, तर वरुणराज सूर्यवंशी यांनी कोरोना एकल महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पुंडलिक सोनकवडे परिवारातर्फे सरपंच आणि उपसरपंच यांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन उत्कृष्ट कार्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच कोरोनामध्ये निधन झालेल्या श्रीमती रंजना कांबळे यांचाही सत्कार करून त्यांच्या दोन मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. 

यावेळी प्रास्ताविक करताना सरपंच राणीताई भंडारे यांनी वलांडी गावांमधील विविध सामाजिक उपक्रमाची माहिती सर्वांना दिली. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव बिरादार यांनी केले तर आभार प्रा.मेहमूद सौदागर यांनी मानले 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शादुल बोडीवाले, ग्रामसेवक विठ्ठल बनसोडे, ग्राम पंचायत सदस्य महेश बंग, प्रभाकर सोनकवडे, सूर्यकांत वाघमारे आणि सुमित भडके यांनी परिश्रम घेतले. 

या कार्यक्रमाला वलांडी गावातील युवक युवती, कोरोना एकल महिला व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments