*“मानवी जीवनातील ताणतणावातून निर्मळ मनच मुक्ती देते”*
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ.नितीनकुमार आळंदकर
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात मानसिक स्वास्थ्य जाणीव जागृती कार्यशाळा
लातूर :-( प्रतिनिधी)
सध्या धकाधकीच्या मानवी जीवनामध्ये शारीरिक आजारासोबत मानसिक आजारांची मोठ्या प्रमाणात भर पडत आहे त्यासाठी प्रत्येकाने आपले मन हे निर्मळच ठेवले पाहिजे त्यामुळे आपण ताणतणावातून मुक्त होऊ शकतो असा मानसशास्त्रीय सल्ला क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ.नितीनकुमार आळंदकर यांनी दिला.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि महाराष्ट्र शासन, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवानिमित्त “मानसिक स्वास्थ्य जाणीवजागृती कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती यामध्ये ते तज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलत होते
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर सिद्राम डोंगरगे हे होते तर विचारमंचावर आजादी का अमृत महोत्सव समिती प्रमुख डॉ.श्रीकांत गायकवाड, आय.क्यु.ए.सी समन्वयक कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले आणि डॉ.संजय गवई यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
पुढे बोलताना डॉ.नितीन आळंदकर म्हणाले की, समकालीन जीवन हे गुंतागुंतीचे आणि स्पर्धात्मक आहे. अशा परिस्थितीमध्ये मानसिक समाधानाचे कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे ठरते. आभासी कल्पना व उत्तेजक अपेक्षा न बाळगता आजूबाजूची वास्तविकता जाणून घेऊन आपण वर्तमान काळामध्ये आनंदी जीवन जगले पाहिजे असेही म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ.श्रीकांत गायकवाड म्हणाले की, मानवी जीवनामध्ये मानसिक समाधान अत्यंत महत्त्वाचे आहे केवळ आजार नसणे म्हणजे आपले स्वास्थ चांगले आहे असे नव्हे तर शरीर, मन, विचार व भावना ह्या सकारात्मक असणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य प्रोफेसर सिद्राम डोंगरगे म्हणाले की, या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमधील मानसिक स्वास्थ्य विषयीच्या विविध बाबी डॉ.नितीनकुमार आळंदकर यांनी उदाहरणासह आपल्या समोर मांडल्या. तथागत भगवान बुद्ध आणि महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा मानसिक स्वास्थ्याची चिकित्सा केल्याचेही ते म्हणाले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार डॉ.रत्नाकर बेडगे यांनी मानले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी आजादी का अमृत महोत्सव समितीचे सदस्य डॉ.दीपक चाटे, डॉ.विजयकुमार सोनी, डॉ.मनोहर चपळे, डॉ.मंतोष स्वामी, प्रा.बी.पी.पवार, शुभम बिराजदार, नंदू काजापुरे, भीमाशंकर सुगरे, राम पाटील, महादेव स्वामी आणि बालाजी डावकरे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Post a Comment
0 Comments