स्पर्धा परीक्षांची तयारी नियोजन बद्ध केली तर यशस्वी होता येते -उपायुक्त सौ. गुरमे
लातूर :-(प्रतिनिधी)
राजर्षी शाहू (स्वायत्त) महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भारताच्या विकासामध्ये महिला शिक्षणाचा प्रभाव या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्त मंजुषा गुरमे या प्रमुख पाहुणे व साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होत्या. महानगरपालिकेच्या उपायुक्त सौ. गुरमे यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कोणीही करू शकते व यशस्वी होऊ शकते म्हणून स्पर्धा परीक्षांची नियोजन बद्ध तयारी करा व यशस्वी व्हा असा अमृततुल्य सल्ला विद्यार्थ्यांना दिला व त्यांच्या उपायुक्त पदापर्यंतची वाटचाल समजावून सांगितली. या कार्यक्रमांमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख सदाशिव शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना विविध महिलांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकत असताना जिजाऊ, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, मदर टेरेसा इत्यादी महास्त्रियांचा दाखला दिला. या देशाच्या व जगाच्या जडणघडणीमध्ये स्त्रियांचा मोठा वाटा आहे असे स्पष्ट केले .
माहेश्वरी पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नुजहत शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कु. मानसी पोरवाल यांनी आभार व्यक्त केले .या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे हे होते. प्रा.डॉ. कल्याण सावंत, प्रा. ज्ञानोबा आव्हाड, प्रा. रोहिणी मेकले, प्रा. धनश्री बिरादार, प्रा. दिक्षा चव्हाण, प्रा.रुखय्या शेख, प्रा.प्रांजली कुंभार व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Post a Comment
0 Comments