Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*“मांजरा नदी जल संवाद यात्रेचा लातूर पॅटर्न निर्माण करू” राज्य समिती सदस्य अनिकेत भैय्या लोहिया*

“मांजरा नदी जल संवाद यात्रेचा लातूर पॅटर्न निर्माण करू” 
राज्य समिती सदस्य अनिकेत भैय्या लोहिया
मांजरा नदी जलसंवाद यात्रा पूर्व नियोजन बैठक 
लातूर :-(प्रतिनिधी)
संपूर्ण देशामध्ये शिक्षण, भूकंप पुनर्वसन, राजकारण, औद्योगिक, आरोग्य, स्वयंसेवी संस्था, जल व्यवस्थापन आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये स्वतंत्र लातूर पॅटर्न निर्माण केला आहे त्याचपद्धतीने मांजरा नदी जलसंवाद यात्रेचाही एक नवा लातूर पॅटर्न शासन, स्वयंसेवी संस्था आणि नदी प्रेमीच्या माध्यमातून निर्माण केला जाईल असे प्रतिपादन राज्य समिती सदस्य तथा मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत भैय्या लोहिया यांनी बोलताना व्यक्त केले. 
महासंस्कृती, महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर, बीड आणि मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय समिती, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मॅगसेस पुरस्कार विजेते, जलपुरुष तथा वैश्विक पूर लोक आयोगाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली “चला जाणूया नदीला” अभियानांतर्गत “मांजरा नदी जलसंवाद यात्रा शुभारंभ समारंभ” माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी स.११.३० वा. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे संपन्न झाला. त्याच्या पुढील मांजरा नदी जलसंवाद यात्रा पूर्व नियोजनाची बैठक मानवलोक संस्था, अंबाजोगाई येथे ऑन/ऑफ लाइन पद्धतीने संपन्न झाली यावेळी ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.  
या बैठकीला लातूर डॉ.सुमंत पांडे (पुणे), माहिती व जनसंपर्क कार्यालय, लातूरच्या उपसंचालक डॉ.सुरेखा मूळे, लातूर जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.संजय गवई, सहसमन्वयक कॅप्टन डॉ.बी.एम.गोडबोले, सदस्य बी.पी.सूर्यवंशी, डॉ.गुणवंत बिरादार, लालासाहेब आगळे, युवाग्रामचे एच.पी.देशमुख, संजय शिंदे (नेकनूर), श्रीराम काळदाते, निलेश शिंदे, डॉ.हनुमंत साळुंके,  करसन पटेल (कळंब), संजय देवरा, दिमंत राष्ट्रपाल, रवींद्र  देवरवाडे, महादेव कदम, हुसेन चौधरी, सचिन शिरसागर, बाळासाहेब चव्हाण, इरफान शेख, गणेश साखरे, निरंजन जोगी, कृष्णा साप्ते, रामराव हंडीबाग, राम पवार, नरसिंग मर्डे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
यावेळी पुढे बोलताना अनिकेत भैय्या म्हणाले की, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील एकूण ७५ नद्यांवर जनसंवाद यात्रा शासन, स्वयंसेवी संस्था व नदी प्रेमींच्या सहकार्यातून नियोजित केली आहे. मांजरा नदीचे एकूण क्षेत्र हे ७२४ कि.मी.चे असून बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या चारही जिल्ह्यांमध्ये मांजरा नदीचा प्रभाव आहे. तेव्हा ही जलसंवाद यात्रा बीड जिल्ह्यातील उगमापासून ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील संगमापर्यंत ३७५ गावातील महिला, विद्यार्थी व नागरीक तसेच गावातील संस्था व संघटनांचे संघटनांचे सहकार्य घेऊन काढली जाईल. यामध्ये मांजरा नदीचे वैज्ञानिक, अध्यात्मिक व पौराणिक महात्म्य समजून घेवून नदीकाठच्या गावाची रचना व तेथील पाणलोट क्षेत्राची माहिती समजून घेण्यात येणार असून उगमापासून ते संगमापर्यंतचा नदीचा प्रवाहाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामध्ये मा.जिल्हाधिकारी, जिल्हास्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच आणि स्थानिकपातळीवरील सर्व नदी प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले 
यावेळी बोलताना डॉ.संजय गवई म्हणाले की, मांजरा जलसंवाद नदी यात्रा प्रारंभ करण्यापूर्वी राज्यपातळीवर मा.मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार आणि मा.सचिव महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घ्यावी त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात बैठक घ्यावी आणि संपूर्ण यात्रेचा संभाव्य आराखडा निर्माण करून त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले.  
यावेळी डॉ.सुमंत पांडे (पुणे), उपसंचालक सुरेखा मूळे, कॅप्टन डॉ.बी.एम.गोडबोले, बी.पी.सूर्यवंशी, करसन पटेल (कळंब), नरसिंग मर्डे यांनी मनोगते व्यक्त केली.  
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालासाहेब आगळे यांनी केले तर आभार युवाग्राम संस्थेचे एच.पी.  देशमुख यांनी मानले या बैठकीच्या यशस्वीतेसाठी मानवलोक संस्थेतील प्राध्यापक, संस्थेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments