Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*टाका येथे सह आयुक्त यांच्या उपस्थितीत यशवंत गुणगौरव सोहळा संपन्न*

*टाका येथे सह आयुक्त यांच्या उपस्थितीत यशवंत गुणगौरव सोहळा संपन्न* 

लातूर:-(प्रतिनिधी )
 टाका ता. औसा जि. लातूर या ठिकाणी दीपावली स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विधायक विचार मंचाच्या वतीने विविध क्षेत्रातील यशवंतांचा प्रेरणादायी असा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीत सूर्य केशवराव भोसले शाखा निलंगाचे अमरदीप पाटील यांनी 'गलत मत कदम उठाओ सोचकर चलो' या गीताने मान्यवरांचे स्वागत केले. 
 आयएएस स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि आता सह आयुक्त म्हणून प्रशिक्षण घेत असलेल्या पूजा अशोकराव कदम यांनी कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण प्रस्ताविक केले. देशात साऱ्याच माणसाने गुण्यागोविंदांनी नांदले पाहिजे. हा देश अखंड, एकात्मिक व समृद्ध राष्ट्र म्हणून जगाच्या समोर आले पाहिजे. देशाला सुखी समृद्ध बनवण्याची आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. छोट्या छोट्या कार्यक्रमातून आपण समाजाला चांगला संदेश दिला पाहिजे. सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी आपण सदैव सज्ज असले पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद मराठवाड्याचे कोषाध्यक्ष डीबी बरमदे यांनी जीवनातील शिक्षणाचे महत्त्व सांगून अनेक घटना प्रसंगाच्या माध्यमातून सर्वांनाच प्रेरित केले व भारावून टाकले. कदम परिवाराने लेकींना सन्मान देऊन स्वतःच्या पायावरती स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी उभे केले. खऱ्या अर्थाने लेकींना सन्मान देणारे हे कुटुंब सर्वांसाठीच आदर्श आहे. या कुटुंबाचा व गावचा हा आदर्श जगासमोर आला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या. लातूर येथील पर्यावरण प्रेमी व वृक्षमित्र सुपर्ण जगताप यांनी वृक्षाचे महत्व सांगून येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे, त्याशिवाय आम्ही तुम्ही आणि हे पर्यावरण निरोगी व निरामय असू शकत नाही, याबद्दल आपले विचार लोकांसमोर ठेवले. या गावातल्या शाळेतील माजी मुख्याध्यापक दयानंद पाटील यांनी पूजा कदम यांचे कौतुक करून गावातल्या अनेक गुणवंतांचे संदर्भ देत शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले व येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा कशी महत्त्वाची आहे याबद्दल आपले विचार प्रकट केले.
 
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचे प्रदेश संघटक सतीश हानेगावे यांनी कदम परिवार हा महाराष्ट्रातील एक आदर्श परिवार असून, सामाजिक बांधिलकी जोपासत सामिलकी स्पष्ट करणारा परिवार आहे हे सोदाहरण स्पष्ट केले. दिव्यांग असतानाही पूजा कदम ही आजमीतिला सह आयुक्त म्हणून प्रशिक्षण घेत आहे. हे सर्व गावकऱ्यांसाठी व महाराष्ट्रासाठी अत्यंत प्रेरणादायी घटना आहे अशा शब्दांमध्ये कौतुक केले. कदम परिवाराने राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. अशोक कदम व संध्याताई कदम यांनी आपल्या जयश्री, पल्लवी, पुनम, पूजा यांना उच्चशिक्षित बनवून समाजामध्ये स्वाभिमानाने जीवन जगण्याची उभारी देऊन खऱ्या अर्थाने त्यांना माणूस बनविले. मुलगा आणि मुलगी या भेदाला तडा देऊन मुलगीच खऱ्या अर्थाने दोन्हीही परिवाराच्या वंशाचा दिवा असते हा सन्मान प्राप्त करून दिला. येणाऱ्या काळात विधायक विचार मंचाच्या वतीने एक सोशल मीडियाचा ग्रुप बनवून शैक्षणिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी काम करणार आहोत असा शब्द पूजा कदम यांनी दिला याबद्दल त्यांनी त्यांचे स्वागत केले. दिवाळीच्या निमित्ताने कदम परिवारांनी व गावकऱ्यांनी जो कार्यक्रम घेतला अशा कार्यक्रमाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना त्यांनी केले. 
 
आर्य समाजासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे प्रा.  अखिलेश शर्मा यांनी अध्यक्षीय समारोप करताना कदम परिवार, गावकरी व गुणवंताच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. जीवनात कुठलेही कार्य करत असताना सतत विधायक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण कार्य करत राहिले पाहिजे, यश हे निश्चित मिळते असा यशाचा मूलमंत्र त्यांनी सांगितला. सामान्यांचा व बहुजनांच्या माणुसकीचा बुलंद आवाज 'तुकोबावाणी' या त्रैमासिक अंकाचा प्रकाशन सोहळा सह आयुक्त मा. पूजा कदम यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी समाजातल्या विविध क्षेत्रातील गुणवंत व यशवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.  मा. पी.पी.चव्हाण (सुवर्ण पदक), अभिजित माचवे (निट परीक्षा ६२० गूण), कु. ऋतुजा घाडगे (क्रॉस कंट्री स्पर्धा रौप्य पदक), प्रशासकीय सेवेतील मा.प्रतिक्षा पिंपरे (पीएसआय),भांगे प्रभावती (महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्र, नागपूर), भांगे पोर्णिमा (महापारेषण, पनवेल गुणवंत विद्यार्थीमध्ये नमन शिंदे,कॄष्णा कदम, ओमकार मातोळे, संजना गोरे अशा अनेकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सॉफ्टवेअर इंजिनियर पल्लवी कदम व शिक्षक सुरेश कदम यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. गावकरी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सांगता झाली.
 
 

Post a Comment

0 Comments