महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील कुस्ती खेळाडूंनी पटकावले अंतर विभागीय कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक रौप्य पदक
राजश्री शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित अंतर विभागीय कुस्ती स्पर्धा
लातूर :-(प्रतिनिधी)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित अंतर विभागीय कुस्ती स्पर्धेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील कुस्ती खेळाडूंनी दोन सुवर्णपदक व एक रौप्य पदक प्राप्त केले आहे. या विजेत्या स्पर्धकांचा नुकताच महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या शुभ हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे, क्रीडा विभागप्रमुख डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, समाजकार्य विभागप्रमुख डॉ.दिनेश मौने, वाणिज्य विभागप्रमुख डॉ.विजयकुमार सोनी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई, प्रा.आशिष क्षिरसागर, प्रा.विजया पाटील आणि विष्णू तातपुरे आदी उपस्थित होते.
विभागीय कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयातील बी.ए.तृतीय वर्षातील महेश तातपूरे याने ६५ किलो वजन गटात क विभागातील खेळाडूवर दहा शून्य तांत्रिक गुणाच्या फरकाने विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर बी.एस्सी.प्रथम वर्षातील ज्ञानेश्वर महानवर याने ७४ किलो वजन गटात क विभागातील खेळाडूवर अतिशय रोम हर्षक पद्धतीने विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर ८४ किलो वजन गटात बी.ए.तृतीय वर्षातील तुकाराम महानवर याने द्वितीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाचे नाव लौकिक वाढवला आहे.
या सर्व विजयी आणि गुणवंत महिला खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, डॉ.गुणवंत बिरादार आणि प्रा.आशिष शिरसागर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments