लातूर :-(प्रतिनिधी)
येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.संजय पवार यांची तर पर्यवेक्षक म्हणून प्रा.शिवशरण हावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल स्थानिक व्यवस्थापन समिती बैठकीत त्यांचा संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे आणि सचिव मन्मथप्पा लोखंडे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक शि.वै.खानापूरे, संचालक प्रा.जि.एम. धाराशिवे, स्वीकृत संचालक अशोकप्पा उपासे, प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचे उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे आणि प्रा.विजयकुमार धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपप्राचार्य प्रा.संजय पवार हे लातूर जिल्ह्यातील सुगावचे सुपुत्र असून त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड जिल्ह्यातील पेनुर या गावी झाले. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी व्यंकटेश शाळा, लातूर येथे एस.एस.सी. येथे पूर्ण केले आणि अकरावी विज्ञान ते बी.एस्सी.पर्यंतचे सर्व शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयांमध्ये पूर्ण केले. औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी.पदवी संपादन करून सुशिलादेवी अध्यापक महाविद्यालय येथून त्यांनी बी.एड.पूर्ण केले. महात्मा बसवेश्वषर महाविद्यालयातील विज्ञान विभागात रसायनशास्त्राचे एक उत्तम व अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांनी मागील तीस वर्षापासून सातत्याने विद्यार्थी यांची शैक्षणिक सेवा केली आहे. त्याने एच.एच.सी.बोर्डमध्ये पेपर सेटर, परीक्षक, मॉडरेडर अशा विविध ठिकाणी कार्य केले असून राज्य, विभाग, जिल्हा आणि स्थानिकस्तरावरील विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महाविद्यालयाच्या विविध समित्यांमध्ये त्यांचे सक्रीय योगदान राहिलेले आहे. ते लोहार समाज सेवाभावी संस्था, लातूरचे सचिव आहेत. त्यांनी इंदु लातूर पॅटर्न केमिस्ट्री या पुस्तकाचे लेखन केले असून विविध परिषदा, कार्यशाळा, परिसंवाद आणि प्रशिक्षणात सक्रिय सहभाग आहे.
पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे यांचे वरनाळवाडी जि.उस्मानाबाद येथे प्राथमिक शिक्षण झाले त्यानंतर त्यांनी आलूर येथे पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेऊन अकरावीपासून ते एम.ए.पर्यंतचे सर्व पदव्युत्तर शिक्षण हे राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे झाले. त्यांनी शासकीय अध्यापक विद्यालय, परभणी येथे बी.एड.पूर्ण केले असून घाटनांदुर येथे त्यांनी कनिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. महात्मा बसवेश्व र महाविद्यालयामध्ये ०५ सप्टेंबर १९९१ पासून भूगोल विभागांमध्ये कार्यरत असून आज त्यांची शैक्षणिक सेवा तब्बल ३१ वर्षे पूर्ण झाली आहे. सन १९८६-८७मध्ये त्यांना उत्कृष्ठ राष्ट्रीय रासेयो स्वयंसेवक म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी एस.एस.हूसेन यांच्या हस्ते पानचिंचोली येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात समन्वयक म्हणून १९९६ ते २०२२ या कालावधीमध्ये कार्य केले आहे. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांची उज्वल यशाची परंपरा निर्माण करण्यात त्याचं मोठ योगदान आहे त्यामुळे त्यांना सन १९९५-९६चा बसव भूषण पुरस्कारही तत्कालीन प्राचार्य डॉ.एम.एस.सितानगरे यांच्या हस्ते मिळाला आहे.
उपप्राचार्य प्रा.संजय पवार व पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे यांच्या नियुक्तीबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, शाखा समन्वयक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments