Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*दुग्ध विकास अधिकारी मा. ज्ञानेश्वर भंडारे कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित*

दुग्ध विकास अधिकारी मा. ज्ञानेश्वर भंडारे कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित
औराद शहाजनी:-(प्रतिनिधी)
 दुग्धविकास अधिकारी म्हणून ३६ वर्षाच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मा. ज्ञानेश्वर पांडुरंग भंडारे औराद शहाजानी यांना नुकताच डिजिटल रुरल कनेक्ट या संस्थेचा अत्यंत प्रतिष्ठेचा कृतज्ञता पुरस्कार देऊन त्यांच्या जीवनकार्याचा यथोचित गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम वैष्णवी इन्फोसिस व डीआरसी औराद शहाजनी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता. वैष्णवी इन्फोसिसचे बालाजी पाटील यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश श्रोत्यांच्या समोर ठेवून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. ज्ञानेश्वरजी भंडारे यांच्या आयुष्यातील खडतर घटना प्रसंगाला उजाळा देत, त्यांच्या ३६ वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळातील कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन, कृतज्ञता पुरस्काराचे वाचन करून, हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना, प्रदेश संघटक जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचे सतीश हानेगावे यांनी एक आदर्श दुग्ध विकास अधिकारी म्हणून प्रथमता ठाणे, नांदेड, बीड, उदगीर, डहाणू , लातूर, औरंगाबाद या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करून सर्वांची मने जिंकून घेतल्याचा इतिहास सांगितला. या क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, सोबतचे सहकारी, कर्मचारी या सर्वांसोबत त्यांचे अत्यंत स्नेहाचे व सोहार्दपूर्ण संबंध राहिल्याचे सांगितले. एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारीचे भान तर ठेवलेच; पण सोबतच एक आदर्श पिता, पुत्र,भाऊ, मित्र, कुटुंबातील जबाबदार व्यक्ती या नात्याने साऱ्याच भूमिका अत्यंत तळमळने निभावल्याचे लक्षात आणून दिले. आपल्या आयुष्यातील ३६ वर्षाच्या नोकरीतील काळ हा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, विश्वासाने, संयमाने, निष्ठेने व कुठलाही कसलाही कलंक न लागू देता, चारित्र्यसंपन्नता जपत पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून, योग्य व्यक्तीस पुरस्कार दिल्याबद्दल मनस्वी आनंद व्यक्त केला. सत्कारमूर्ती ज्ञानेश्वर भंडारे यांनी आपले प्राथमिक शिक्षण औराद येथे कसे झाले, पुढे देशिकेंद्र लातूर येथे कसे पोहोचलो. बसवेश्वर महाविद्यालयात कसे दिवस गेले व शेवटी वेटरनरी कॉलेज मुंबई या ठिकाणी शिक्षण घेऊन कसे पोटापाण्याला लागलो हा शैक्षणिक प्रवास सर्वांच्या समोर मांडला. शेतकरी व कुणब्यांचे घर व शेत दिसून येते परंतु त्याच्या आत झिरपणारे दारिद्र्य कधीही कुणाच्या लक्षात येत नाही. आई वडील हेच माझ्या आयुष्यातील यशाचे गुरु राहिले आहेत. मी संकटे व दुःखाला कधीही भिलो नाही. आई-वडिलांची खंबीर साथ सोबत असल्यामुळे मी निर्भयपणे प्रत्येक बिकट प्रसंगाला सामोरे गेलो. आयुष्यात चढउताराच्या वेळी अनेक चांगल्या लोकांचा आधार मिळत गेला. डीआरसीने माझ्या कार्याचा गौरव करून जो पुरस्कार मला दिला, त्यामुळे मला मनस्वी आनंद झालेला असून, ती माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा व शिदोरी आहे, अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. 

ज्ञानवर्धिनी विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. सतीश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना शासन- प्रशासनात चारित्र्य संपन्न माणसाची गरज असून ती गरज कुटुंब व समाजाचीही तेवढीच महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वर भंडारे साहेबांनी दुग्धविकास अधिकारी म्हणून प्रदीर्घकाळ सेवा देताना कुटुंबाचीही तेवढीच काळजी घेतल्याचे सांगितले. हे व्यक्तिमत्व संयमी, सहनशील, माणुसकीच्या भावनेने ओथंबलेली आहे. मित्रमंडळी आणि नात्यागोत्यामध्ये कधीही कुठलाही दुरावा येऊ दिला नाही. उलट सर्वांना त्यांनी भरभरून सहकार्य केले आहे. त्यांचा शैक्षणिक जीवनप्रवास हा खडतर राहिलेला आहे. लहान वयातच गाव सोडून जाऊन बाहेर शिक्षण घेणे हे कसोटीचे काम असून, मनात इच्छाशक्ती आणि स्वप्न असल्याशिवाय अशा गोष्टींना पाठबळ मिळत नाही. ज्ञानेश्वर भंडारे यांचे वडील पांडुरंग भंडारे हे नुसते आदर्श कुटुंबकर्ते नाही तर गावकर्ते आहेत त्यांचा नावलौकिक संपूर्ण निलंगा तालुक्यात पसरलेला असल्याचे त्यांनी सांगितले. डीआरसीने योग्यता, पात्रता व गुणवत्ता बघून त्यांच्या जीवन कार्याचा गौरव करून, कृतज्ञता पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी डीआरसीला शुभेच्छा दिल्या. कु. आनंदी हिच्या सुमधुर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाला डॉ. विक्रम पाटील, डॉ. इंद्रायणी पाटील, पांडुरंग भंडारे, अण्णाराव ढोबळे, नेताजीराव पाटील,प्रा. बालाजी बोरोळे, जगदीशराव सूर्यवंशी, अनिल सायगावे, डीआरसीचे विजयकुमार गुजरे, सचिन जाधव इत्यादीची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments