*पद्मश्री डॉ.पोपटराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये मांजरा जलसंवाद यात्रेचा समारोप समारंभ*
*मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजनी येथे जय्यत तयारी*
लातूर :-( प्रतिनिधी)
महासंस्कृती, महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृयतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर, मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक), अंबाजोगाई, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजनी आणि मांजरा नदी जनसंवाद यात्रा समन्वय समिती, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ जानेवारी २०२३ रोजी स.११ वा. मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजनी येथे मांजरा जलसंवाद यात्रेचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांची उपस्थिती लाभणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदर्श गाव योजना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ.पोपटराव पवार यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभाताई जाधव, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, मांजरा नदी जलसंवाद यात्रा मराठवाडा समन्वयक अनिकेत लोहिया, जिल्हा समन्वयक डॉ.संजय गवई, सहसमन्वयक कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, प्राचार्य प्रदीप पाटील आणि विकास कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये मांजरा नदी जलसंवाद यात्रेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, उत्कृष्ट जलसंवाद यात्रेचे नियोजन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सत्कार, तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांचा सत्कार, यात्रेतील निरीक्षणे आणि ठराव सादरीकरण आणि जल प्रबोधन मार्गदर्शन संपन्न होणार आहे.
या यात्रेला दि. ११ ते १८ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर, रेनापुर, निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील एकूण ९८ गावामध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, महिला, युवक, स्थानिक पत्रकार बंधू, तलाठी, वनाधिकारी, ग्रामसेवक आणि स्थानिक ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या जलसंवाद यात्रेचे उद्घाटन सारसा येथे जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंग यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यानंतर ही यात्रा लातूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन जल प्रबोधन करीत आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा, नदी पात्राला प्रत्यक्ष भेट, रांगोळी, जलकलश पूजन, ग्रामस्थ आणि महिला सोबत नदी इतिहास चर्चा, बचत गटातील महिलांशी संवाद, गावाची संपूर्ण माहिती, बौद्धिक व्याख्यान, किर्तन, कलापथक, गट चर्चा आणि कॉर्नर बैठक आदी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जल प्रबोधन सुरू आहे.
या यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अनिकेत लोहिया, डॉ.संजय गवई, डॉ.बाळासाहेब गोडबोले, बी.पी.सूर्यवंशी, डॉ.गुणवंत बिरादार, डॉ.राहूल डोंबे आणि अभय धाराशीवे यांच्यासह जिल्हा प्रशासन, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय आणि मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय समिती सदस्यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments