Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*‘चला जाणूया नदीला’ अभियानातून नदी संवर्धनाचा विचार कृतीत आणण्यास मदत होईलपद्मश्री डॉ.पोपटराव पवार*

चला जाणूया नदीला’ अभियानातून नदी संवर्धनाचा विचार कृतीत आणण्यास मदत होईल
पद्मश्री डॉ.पोपटराव पवार 
मांजरा नदी जलसंवाद यात्रेचा औराद शहाजानी येथील केंद्रीय जि.प.प्राथमिक शाळेत समारोप

लातूर :-( प्रतिनिधी)
‘चला जाणूया नदीला’ अभियानामुळे नदीकाठच्या गावांमध्ये व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे नागरिक नदीसाक्षर बनण्यास मदत होणार असून या अभियानाच्या माध्यमातून नदी संवर्धनाचा विचार कृतीत येण्यास मदत होईल असा विश्वास आदर्श गाव योजनेचे कार्यकारी अध्यक्ष पद्मश्री डॉ.पोपटराव पवार यांनी व्यक्त केला. 
‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत महासंस्कृती, राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर, मानवलोक संस्था, अंबाजोगाई, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, ग्रामपंचायत कार्यालय, औराद आणि मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय समिती, लातूर  यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यात आयोजित जिल्ह्यातील मांजरा नदी जलसंवाद यात्रेच्या समारोपानिमित्त औराद शहाजानी (ता. निलंगा) येथे आयोजित कार्यक्रमात पद्मश्री डॉ.पोपटराव पवार बोलत होते. 
यावेळी विचारमंचावर मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे लातूर जिल्हा समन्वयक डॉ.संजय गवई, सहसमन्वयक कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, मानवलोक संस्थेचे लालासाहेब आगळे, अण्णासाहेब रोहम, जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बी.एस.गायकवाड, प्राचार्य डॉ.श्रीकांत  गायकवाड, सरपंच आरती भंडारे, बी.पी.सूर्यवंशी, डॉ.गुणवंत बिरादार, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, सुपर्ण जगताप आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.पोपटराव पवार म्हणाले की, मानवी जीवन हे नदीवर अवलंबून आहे, त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून प्रयत्न करण्याची गरज आहे. यामध्ये सर्वाधिक जबाबदारी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांवर असून नदीमध्ये जाणारे सांडपाणी, शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर रोखण्यासाठी गावपातळीवरच नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी जलसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावांमध्ये करण्यात आलेले प्रबोधन उपयुक्त ठरणार असून नदीसंवर्धनाचा केवळ विचार मांडून न थांबता, तो विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच नदीसंवर्धनासोबतच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सुध्दा वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गातील जैवविविधता धोक्यात आली असून त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. निसर्गात होणाऱ्या या बदलांचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होणार आहे. त्यामुळे वृक्षारोपणासाठीही नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. वृक्षारोपणामुळे जलसंवर्धनासाठीही मदत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना लालासाहेब आगळे म्हणाले की, लातूर जिल्ह्यात यात्रा कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नदीकाठच्या गावांमधील नागरिकांमध्ये नदीसाक्षरतेविषयी प्रबोधन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या गावांमध्ये जावून नदीच्या आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या असून त्याबाबतचा कृती आराखडा प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. लातूर जिल्ह्यातील परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ही जलसंवाद यात्रा कर्नाटक राज्यात प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले.
जलकलश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्कृष्ट जलसंवाद यात्रेचे नियोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते, शाहीर, जलमित्र, शेतकरी, सहभागी स्वयंसेवक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. शेतकरी विलास आगळे यांनी मनोगत तर शाहीर सुधाकर  देशमुख आणि धम्मपाल सावंत यांनी नदीसंवर्धन विषयक विविध गीतांचे सादरीकरण केले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार डॉ.शिवप्रसाद डोंगरे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समिती सदस्य डॉ.राहुल डोंबे, डॉ.अभयकुमार धाराशिवे, प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, जि.प.केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक बोयणे, डॉ.विकास कुलकर्णी, संयम गवई, खंडू देडे, पुरी, विश्वनाथ आणि समाजकार्य विभागातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 
सकाळच्या सत्रामध्ये औराद शहाजनी येथील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून प्रबोधन केले. 
या कार्यक्रमाला मानवलोक संस्थेचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, समाजकार्य विभागातील विद्यार्थी आणि पत्रकार बंधु उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments