Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*कवितेतून मानवी मूल्य रुजवणाऱ्या कवी योगिराज माने यांना जगद्गुरु तुकोबाराय 'जीवनगौरव पुरस्कार'*

*कवितेतून मानवी मूल्य रुजवणाऱ्या कवी योगिराज माने यांना जगद्गुरु तुकोबाराय 'जीवनगौरव पुरस्कार'*

औराद शहाजनी :-(प्रतिनिधी)

 शिक्षण संस्था व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरील वैचारिक चळवळ असलेल्या मराठा सेवा संघ प्रणीत जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने तुकोबारायांच्या जन्मदिनी दरवर्षी दिला जाणारा 'जगद्गुरु तुकोबाराय जीवनगौरव पुरस्कार' यावर्षी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, गीतकार योगीराज माने यांना अत्यंत सन्मानाने प्रदान करण्यात आला. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून  मराठीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक फ.म.शहाजिंदे, शारदोपासक शिक्षण संस्थेचे संचालक दगडू गिरबने, पुरस्कारार्थी कवी योगीराज माने, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे महासचिव तथा तुकोबावाणीचे संपादक बालाजी जाधव, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश संघटक सतीश हानेगावे, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद मराठवाड्याचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव बरमदे, प्राचार्य डॉ. व्यंकट अनिगुंटे, कवयित्री शांता गिरबने यांची उपस्थिती होती.

जगद्गुरु तुकोबाराय यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या महाविद्यालयातल्या संगीत विभागाच्या वतीने प्रा. दुर्गादास सबनीस यांनी तुकोबारायांच्या अभंगाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना, ज्ञानदेव बरमदे यांनी तुकोबारायांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरेमुळे माणूस कसा नागावला गेला आहे हे सांगितले. आजच्या काळामध्ये तुकोबारायांच्या समतावादी विचाराची सर्वात जास्त गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 तुकोबारायांच्या जयंती बद्दल बोलत असताना,  सतीश हानेगावे यांनी महाराष्ट्र शासनाने महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या यादीत जगद्गुरु तुकोबाराय  यांचे नाव कसे काय आले नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. समाज व्यवस्थेतल्या  काही तथाकथित साहित्यिकांने तुकोबारायांची प्रतिमा अंधश्रद्धाळू, दैववादी, चमत्कारी, भोळाभाबडा, व्यवहारशून्य अशी रंगवून तुकोबारायांच्या बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकवादी, विज्ञानवादी, प्रयत्नवादी, मानवतावादी विचारांचा खून अशा मारेकऱ्यांनी केला याचे प्रतिपादन केले. तुकोबारायांचे विचार हे जात, धर्म, भाषा, सातासमुद्रापार सीमा ओलांडून  विश्व मानवाला गवसणी घालणारे असे 'वसुधैव कुटुंबकमचे'  होते. अशा महापुरुषांचे विचार मातीत रुजवण्यासाठी खऱ्या अर्थाने जयंती असते असे प्रतिपादन केले.
 बालाजी जाधव यांनी महापुरुषांचे जीवन चरित्र वाचून त्यांचे विज्ञानवादी, विवेकवादी, चिकित्सक विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचे सांगितले. ही परिषद परिवर्तनाच्या चळवळीसाठी समर्पित असून विवेकाचा जागर घडवून आणण्यासाठी वाचणारी, लिहिणारी, बोलणारी व कृती करणारी पिढी घडली पाहिजे असा आशावाद व्यक्त केला. या परिषदेने कोरोना काळामध्ये जगातील पहिले ऑनलाईन साहित्य संमेलन घेऊन तंत्रज्ञानाशी आपली नाळ जोडल्याचे मत व्यक्त केले. या परिषदेने तळागाळातल्या अनेक लोकांना  लिहिते करून प्रकाशात आणण्याचे काम केले आहे असे सांगितले.
 
 फ.म. शहाजिंदे सरांनी समाजातील प्रस्थापित व्यवस्था विस्थापित व्यवस्थेला जन्म देत असते. आहे रे, नाही रे  हा संघर्ष अटळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय हे वैश्विक संत असल्यामुळे मी त्यांना साहित्य क्षेत्रातला जागतिक स्तरावरचा बाप मानतो. त्यांचे अभंग हे अक्षर वांग्मय असून मानव जातीच्या कल्याणासाठी जन्माला आलेले आहेत. मराठी साहित्यातल्या एका अत्यंत प्रतिभाशाली अशा कवी योगिराज माने यांना जगद्गुरु तुकोबाराय जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल मी परिषदेचे अभिनंदन करतो, अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 
 पुरस्काराला उत्तर देताना अभंग आणि कवितेच्या माध्यमातून कवी योगीराज माने यांनी युवकांच्या व गावकऱ्यांच्या मनाची मशागत केली. गेल्या पंचवीस वर्षापासून मी कविता लिहितो व सादरीकरण करतो. या माझ्या तपश्चर्येला खऱ्या अर्थाने या पुरस्कारामुळे अर्थ प्राप्त झाला  आहे. पुन्हा अजून अधिक उर्मीने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मला मिळाली. तुकोबारायांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी चिरस्थायी,अविस्मरणीय, अक्षय ठेवा असून तो विचारांच्या रूपाने मी जतन करेन अशा  भावना त्यांनी व्यक्त केल्या. किल्लारीच्या महाभयानक भूकंपामध्ये माझे कुटुंबीय, नातेवाईक बेचिराख झाले. त्या वेदनेतून मुक्त होण्यासाठी  खऱ्या अर्थाने मी कवितेकडे वळलो. विविध प्रकारच्या कविता सादर करून, कविता हा माझा अंतिम श्वास आहे, मी कविता जगणारा माणूस असून शेवटच्या श्वासापर्यंत मी कविता जगत राहीन, असे प्रतिपादन त्यांनी केले. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेने सन्मान करून पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. 
 
प्रा. डॉ. शंकर कल्याणे यांनी अत्यंत ओघवते असे सूत्रसंचालन करून मान्यवरांचे आभार व्यक्त केले. मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या या कार्यक्रमात या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी, विद्यार्थी, गावातील डॉ. प्रकाशसिंह कच्छवा,  माजी सरपंच प्रकाश स्वामी, मारुती बिरादार, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत बोंडगे,  मुख्याध्यापक विजयकुमार रावजादे, शाहूराज पाटील, सजनशेट्टी सर, अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
 

Post a Comment

0 Comments