Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*कविता, पुस्तक आणि व्याख्यानाने आयुष्य बदलते-अतुल देऊळगावकर*


कविता, पुस्तक आणि व्याख्यानाने आयुष्य बदलते-
अतुल देऊळगावकर 

लातूर :-
आजचे जीवन धकाधकीचे आणि गुंतागुंतीचे बनले आहे. अशावेळी कविता, पुस्तक आणि तज्ञ व्यक्तीच्या व्याख्यानाचे श्रवण केल्यास आपले संपूर्ण आयुष्य बदलते असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी बोलताना व्यक्त केले.  
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभाग, राज्यशास्त्र विभाग, भूगोल विभाग आणि व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम, लातूर द्वारा “पंडित नेहरू समजून घेताना” या विषयावर विद्यार्थी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.  
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश मौने हे होते तर विचारमंचावर उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, भूगोल विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यशवंत वळवी आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय गवई यांची उपस्थिती होती.  
पुढे बोलताना अतुल देऊळगावकर म्हणाले की, आपल्या सर्वांना बुद्धी सारखीच असते त्याचा आपण वापर कसा व किती करतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला पडणाऱ्या प्रश्नावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. सध्या सौंदर्याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्याचा काळ हा आत्मप्रेमग्रस्ततेचा आहे. विद्यार्थी आणि पत्रकारांना प्रश्न विचारण्याची मुभा असते. विद्यार्थ्यांनी आपला मन, मेंदू आणि ऊर्जेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे असे सांगून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ७५  विविध संस्थांची निर्मिती करून देशाच्या विकासात मोठा सहभाग दिला आहे. विद्यार्थ्यांनी विविध तज्ञांची व्याख्याने ऐकली पाहिजे यामधून आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनते असे सांगून शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ५.३० वा. दयानंद सभागृहामध्ये प्रोफेसर न. गो. राजूरकर (हैदराबाद) यांचे पंडित नेहरू समजून घेताना या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्यावतीने व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.  
यावेळी पर्यावरण तज्ञ सुपर्ण जगताप यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.  
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश मौने म्हणाले की, आज आपले सर्वांचे वाचन, चिंतन आणि अनुभव कमी होत चाललेले आहे. आपण अशा तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. अभ्यासासोबतच आपण तज्ञांच्या व्याख्यानाचा लाभ घेतल्याने आपले व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ बनते. महापुरुषांमधील असलेल्या चांगल्या बाबींचा आदर्श आपण घेऊन त्याची प्रत्यक्ष कृती केली पाहिजे असेही ते म्हणाले.  
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय गवई यांनी केले तर आभार डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राहूल डोंबे, बालाजी डावकरे, नंदू काजापुरे आदींनी परिश्रम घेतले.  
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील भूगोल विभाग, राज्यशास्त्र विभाग, समाजकार्य विभाग आणि व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments