Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*गावच्या सर्वागीण विकास प्रक्रियेत युवकांनी सक्रिय योगदान दयावे डॉ. संजय गवई*


गावच्या सर्वागीण विकास प्रक्रियेत युवकांनी सक्रिय योगदान दयावे
डॉ. संजय गवई 
लातूर :-

भारत हा ग्रामीण वासियांचा देश आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला हा मूलमंत्र आपल्याला दिलेला आहे. तेव्हा ग्रामीण विकास हा आपल्या देशाचा पाया असल्यामुळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागातील युवकांनी गावातील समस्यांचा अभ्यास करून प्राधान्यक्रम देऊन त्या सोडविण्यासाठी सक्रिय आणि सकारात्मक पद्धतीने सहभागी व्हावे असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक तथा जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य डॉ. संजय गवई यांनी केले.  

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत, नेहरू युवा केंद्र लातूर द्वारा युवा नेतृत्व आणि समुदाय विकास या विषयावर, महाराष्ट्र विद्यालय, लातूर येथे  आयोजित तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण  कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 
यावेळी विचारमंचावर जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्र, लातूर येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे डॉ. पी. एस. पाटील आणि प्रशासकीय अधिकारी संजय ममदापूरे यांची उपस्थिती होती.  
पुढे बोलताना डॉ. संजय गवई म्हणाले की नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यात सहभागी झाल्याने  स्थानिक पातळीवर नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होते. आपल्यामधील क्षमता, कमतरता, समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर सहभागी पद्धतीने प्रशिक्षणार्थींना उदाहरणासह माहिती देऊन गाव पातळीवर कार्य करण्यासाठी वक्तृत्व, निरीक्षण, लेखन, लक्षपूर्वक ऐकणे, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोण आणि सर्वांना सहभागी करून घेणे आदी विविध कौशल्य आत्मसात करून त्याचा विकास कार्यांमध्ये प्रत्यक्ष वापर केला पाहिजे असेही ते म्हणाले.  

यावेळी जिल्हा युवा समन्वयक साक्षी समैया आणि डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तसेच संध्या नंदगावे आणि आदित्य मोठ्ठेराव यांनी मनोगते व्यक्त केली.  
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत साबणे यांनी केले तर आभार अर्पिता मोठ्ठेराव यांनी मानले. यानंतर सहभागी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र  वितरित करण्यात आला.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण जोशी,  चंद्रशेखर पाटील, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक रोहिणी पाटील, अविनाश डोंमपल्ले, खुशाल बिराजदार, भीमाशंकर येळीकर, नवनाथ मगर,  यांनी परिश्रम घेतले.  
या प्रशिक्षणाला लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यातील युवक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments