*डॉल्बीमुक्त वैचारिक शिवजयंती*
औराद शहाजनी:-
ममदापूर नगरीत डॉल्बीमुक्त व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची वैचारिक पेरणी करणारी शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून शिवचरित्रकार, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचे प्रदेश संघटक, शिवश्री सतीश हानेगावे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील अनेक घटना, प्रसंग सांगून दैववाद, प्रारब्धवाद, अवतारवाद, अंधश्रद्धा, धर्मांधता, बुवाबाजी यावर कडाडून हल्ला चढविला. चुकीच्या भाकडकथांच्या आधारे महापुरुषांचे विकॄतीकरण करणाऱ्या बागेश्वरी धाम अर्थात धोपटश्वर महाराजांसारख्या तदर्थ बुवाबाजांचा पर्दाफाश केला.
शिवाजी महाराजांनी आपले 80 ते 90% युद्धं ही अमावास्याच्या रात्री केली. शुभ अशुभ यांच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज समजून घेतला पाहिजे. जगभर शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली जात असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जगातल्या कुठल्याच महापुरुषांची जयंती साजरी होत नाही याबद्दल गौरव व्यक्त केला. छत्रपती शिवरायांची कार्य हे काल, आज आणि उद्याही तितकेच विश्वकल्याणकारी असून, साम्राज्य येतात आणि जातात पण मानवी मूल्य आणि आदर्श कधीच मरत नाहीत हेच शिवरायांनी दाखवून दिले.
शिवरायांचा इतिहास जसा धैर्याचा, शौर्याचा, पराक्रमाचा आहे. तसाच तो तितकाच लोककल्याणकारी व विश्वाला वंदनीय ठरणारा आहे. जोपर्यंत या पृथ्वीतलावरती चंद्र, सूर्य, तारे असतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी राजांचे आदर्श मूल्य या पृथ्वीतलावरती शाश्वत राहतील. धर्म, जात पात, गटतट,व्यक्ती, भाषा, प्रांत, जगातल्या साऱ्या सीमा पार करून छत्रपती शिवराय हे संपूर्ण जगाचे झालेले आहेत. आपण कोत्या मनाने छत्रपती शिवाजी महाराजाला छोटा करण्याचा प्रयत्न करू नये ते महापातक आहे, अशा प्रकारची तंबी दिली. तथाकथित साधुसंत, महाराज व राजकारण्याने इतिहास या विषयावरती बोलत असताना सत्याचे भान ठेवून बोलावे. महापुरुषांचे विकृतीकरण टाळावे अन्यथा त्यांना वाचणारा समाज माफ करणार नाही, असा सावधगिरीचा इशारा दिला. मराठा- बहुजनांची मुले आता वाचत आहेत, बोलत आहेत.लिहित आहेत. तांड्या वस्तीपर्यंत आणि आदिवासीपर्यंत आता शिवराय पुनर्ईतिहासाच्या रूपाने पोहोचत आहेत. शिवजयंती साजरी करताना डामडौल, डॉल्बी, फटाके, नाच गाणे, अनावश्यक सजावट, बॅनरबाजी या साऱ्या गोष्टीतून मुक्त होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार समाजात रुजवण्याची व तो विचार घेऊन जीवन जगण्याची नवी पिढी तयार झाली पाहिजे, अशा प्रकारचा आशावाद सतीश हानेगावे यांनी व्यक्त केला. गावातील चौदावा अखंड हरिनाम सप्ताह व शिवजयंतीच्या औचित्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती इंदुबाई बिरादार ह्या होत्या.


Post a Comment
0 Comments