*बळीराजा साहित्य संमेलनाध्यक्षपदी डाॅ.शेषराव मोहिते.*
लातूर:-(प्रतिनिधी)
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,महाराष्ट्र आणि शब्द पंढरी प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बळीराजा साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ग्रामीण साहित्यिक, शेतकरी चळवळीविषयी प्रचंड आस्था असलेले लेखक डॉ. शेषराव मोहिते यांची सर्वानुमते निवड केल्याची घोषणा जगद्गुरु साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ निर्मलाताई पाटील, प्रदेश महासचिव बालाजी जाधव, उजेडकर, शब्द पंढरी प्रतिष्ठानचे कवी योगीराज माने,प्रदेश संघटक सतिश हानेगावे यांनी केली आहे. या एकदिवशीय बळीराजा साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सत्र, कृषीजीवनातील व्यथा-वेदना व उपाय या विषयावरील परिसंवाद, निमंत्रित कवींचे कविसंमेलन, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त प्रेरणादायी शेतकऱ्यांची मुलाखत व समारोप सत्र असे एकंदरीत आयोजन करण्यात आले आहे.परिसंवाद प्रा.फ.मु.शहाजिंदे यांच्या अध्यक्षक्षतेखाली घेण्यात येणार असून अमर हबीब,प्रा.सुरेंद्र पाटील, रमेश चिल्ले,प्रा.डॉ. ज्ञानदेव राऊत हे सहभागी होणार आहेत. कवी संमेलनात मराठवाड्यासह सबंध महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींचा सहभाग असणार आहे.या संमेलनासाठी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि शब्द पंढरी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून साहित्य रसिकांनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा संयोजकाकडून व्यक्त करण्यात आली आहे. लवकरच संमेलनाची सविस्तर निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Post a Comment
0 Comments