*शिक्षण क्षेत्रातील संत : शिक्षणमहर्षी विश्वनाथराव वलांडे गुरुजी*
आधुनिक काळात गुरुजी हा शब्द जुना होत चालला आहे. आयुष्याला काना, मात्रा, उकार, रफार देण्याचे काम हाच व्यक्ती करतो. गुरुजी हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर उभं राहतं ते शिक्षणमहर्षी विश्वनाथराव वलांडे गुरुजी यांचं व्यक्तिमत्व. त्यांचा औराद व निलंगा परिसरातील जनमाणसांवर दांडगा प्रभाव होता. सहज बोललेली वाक्ये लिहून ठेवावी अशीच होती. म्हणून त्यांचा उल्लेख 'शिक्षण क्षेत्रातील संत' म्हणून करावा लागेल.
शिक्षणमहर्षी विश्वनाथराव वलांडे गुरुजींची ८ एप्रिल रोजी जयंती. खरं तर वाढदिवस लिहिण्याऐवजी जयंती लिहिताना हात थरथर कापत आहेत, जयंती असं लिहिण्याचं धाडस होत नाही. औराद परिसरामध्ये वलांडे गुरुजींचं शैक्षणिक योगदान खूप मोठं आहे. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अफाट जनसंख्येला संबोधित करताना विश्वनाथराव वलांडे गुरुजींना शिक्षणमहर्षी ही उपाधी दिली. या सभेचा मी स्वतः साक्षीदार आहे. गुरुजींबद्दल लिहायचं ठरवलं तर एक स्वतंत्र ग्रंथ तयार होईल. 'मरावे परी कीर्तीरुपे उरावे' या म्हणीप्रमाणे गुरुजी कीर्ती मागे सोडून गेले.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो या उक्तीप्रमाणे गुरुजींनी आयुष्यभर शारदोपासक शिक्षण संस्थेच्या उन्नतीसाठी मेहनत घेऊन शिक्षणसंस्थेचे वटवृक्षामध्ये रूपांतर केले. आयुष्यात आपल्यापासून कोणीही चोरून घेऊ शकणार नाही अशी संपत्ती म्हणजे ज्ञान. हे ज्ञान सर्वांना देऊन गुरुजी अमर झाले. 'झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच' |
ज्या झाडाच्या सावलीत आपण वाढलो तेच झाड २५ मार्च २०२२ रोजी कमकुवत होऊन कोसळलं. रोपटं कितीही मोठं झालं तरी वटवृक्षाला मिठी मारू शकत नाही. ज्यांनी शक्ती, युक्ती आणि भक्ती असा त्रिवेणी संगम जपला, ज्यांच्याकडे कर्तृत्व होतं, दातृत्व होतं आणि आदर्श नेतृत्व होतं अशा शिक्षणमहर्षी वलांडे गुरुजींना जयंतीनिमित्त अंतःकरणपूर्वक अभिवादन.
*अभिवादक :*
श्री. बालाजी साधूराम मरळे
सहशिक्षक, महाराष्ट्र प्रा विद्यालय औराद शहा.
ता. निलंगा जि. लातूर

Post a Comment
0 Comments