*शारदोपासक शिक्षण संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
औराद शहाजानी (प्रतिनिधी) :
येथील शारदोपासक शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षणमहर्षी विश्वनाथराव वलांडे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. शिक्षणमहर्षी विश्वनाथराव वलांडे गुरुजी यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश बगदुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सध्याचे युग धावपळीचे असल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. वेळी-अवेळी जेवणे, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टींमुळे उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरावेळी औराद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पोतदार साहेब व त्यांची अनुभवी टीम उपस्थित होती. पूर्ण शरीराची तपासणी, हृदयरोग, रक्तदाब, दंत आदी तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर ज्यांना आवश्यकता आहे अशा रुग्णांना मोफत औषधे व समुपदेशन करण्यात आले. परिसरातील गरजू नागरिकांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचे डॉ पोतदार यांनी सांगितले. याप्रसंगी शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, उपाध्यक्ष प्रेमचंद बियाणी, सचिव रमेश बगदुरे, संचालक दगडू गिरबने, प्रभारी प्राचार्य प्रदीप पाटील, प्राचार्य वसंत पाटील, मुख्याध्यापक महेबूब लष्करे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments