Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना प्रलंबित अर्जांसाठी लातूर विभागाला 11 कोटी 78 लाख रुपये प्राप्त*







भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना प्रलंबित अर्जांसाठी लातूर विभागाला 11 कोटी 78 लाख रुपये प्राप्त

• नूतनीकरण, दुसऱ्या हप्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर होणार जमा
• सन 2021-22 व 2022-23 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना लाभ

 लातूर,  : शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. या योजनेच्या सन 2021-22 व 2022-23 या शैक्षणिक वर्षातील लातूर विभागातील विद्यार्थ्यांना नूतनीकरण व दुसऱ्या हप्त्याची रक्कम अदा करण्यासाठी 11 कोटी 78 लाख 97 हजार रुपये निधी प्राप्त झाला असल्याची माहिती समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अ.र. देवसटवार यांनी दिली आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा यासाठी या योजनेच्या माध्यमातून आवश्यक रक्कम अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात येते. सन 2016-17 पासून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. 

सन 2021-22 व 2022-23  या शैक्षणिक वर्षातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी लातूर विभागातील लातूर , नांदेड, उस्मानाबाद व हिंगोली या जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी सबंधित जिल्ह्यामध्ये स्वाधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. यापूर्वी विभागनिहाय वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेची रक्कम त्यांच्या आधार संलग्न खात्यावर वितरीत करण्यात आली आहे.

विभागातील 23 हजार 146 विद्यार्थ्यांची नुतनीकरणाची व दुसऱ्या हप्याची रक्कम प्रलंबित आहे. या अनुषंगाने सन 2023-24 या आर्थिक वर्षात राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रयत्नातून स्वाधार योजनेसाठी शासनस्तरावरुन लातूर विभागास प्रलंबित अर्जासाठी 11 कोटी 78 लाख 97 हजार रुपये प्राप्त झाले आहे. 

पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात तातडीने सादर करावीत. याबाबत सबंधित जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्यास्तरावरुन कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचित करावे. तसेच पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याचीही दक्षता महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची प्रलंबित रक्कम  पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलगन खात्यावर जमा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देवसटवार यांनी केले आहे. स्वाधार योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूरू होणार असल्याने याबाबत त्यांनी समाज कल्याण आयुक्तांचे आभार मानले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून 
लातूर विभागाला प्राप्त निधी

जिल्ह्याचे नाव प्राप्त तरतूद
लातूर 2,95,84,000/-
नांदेड 7,39,59,000/-
उस्मानाबाद 90,71,000/-
हिंगोली 52,83,000/-
एकूण 11,78,97,000/-
*

Post a Comment

0 Comments