शुक्रवार दि.०५ मे २०२३ रोजी स. ०७:०० वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे अभिवादन कार्यक्रम
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
लातूर :-
शांतीचे अग्रदूत महाकारुणिक विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला इसवी पूर्व ५६३ मध्ये झाला. शील, सदाचार, करुणा, मैत्री आणि शांततेची शिकवण हे भगवान बुध्दाचे व्यावहारिक व आध्यात्मिक तत्त्वज्ञान असून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व सामाजिक न्याय हा तथागत बुद्धांचा समग्र जगाला वैश्विक संदेश आहे. भगवान बुद्ध संपूर्ण आशिया खंडाचे दीपस्तंभ (लाईट आॕफ एशिया) व मार्गदर्शक ठरले आहेत. समाजाला बुद्धीप्रामान्यवादी, विज्ञानवादी आणि सुसंस्कारी बनवणे हे बुद्ध शिकवणुकीचे ध्येय आहे. अशा या भारताच्या महत्तम युग प्रवर्तक महामानव ठरलेल्या तथागत भगवान बुद्धांची जयंती जगभरात मोठ्या स्वरूपात साजरी होताना समस्त लातूर येथील उपासक-उपासिकांच्यावतीने वैशाख पौर्णिमेला शुक्रवार दि.०५ मे २०२३ रोजी सकाळी ठीक ०७:०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महा बुद्ध वंदनाद्वारे सामूहिक अभिवादन करून जयंती साजरी करण्याचे योजिले आहे. तेव्हा सर्वांनी स्वतः व कुटुंबासहित विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्धांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले आहे.
पुढे बोलताना भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की, सर्व समाज बांधवानी आपआपल्या परिसरात, नगरात, चौकात, बुद्ध विहारात, सभागृहात महा बुद्ध वंदने नंतर म्हणजे सकाळी १०.०० नंतर सर्व कार्यक्रम आयोजित करावेत. बुद्ध जयंती दिनी प्रत्येक बौद्धानी आपल्या घरावर पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करावे. सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता सकाळी ठीक ०७:०० वा. लवकरच महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे महा बुद्ध वंदने सहभागी होण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे. महा बुद्ध वंदनेत सहभागी होताना गरजवंत विद्यार्थ्यांसाठी सोबत येताना एक पेन व एक वही घेऊन यावे. शहरात स्वयं प्रेरणेने स्वतःचे फोटो न टाकता केवळ तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संदेश असणारे बॅनर्स व होर्डिंग लावावेत आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी चार चाकी व दुचाकी वाहनाची पार्किंग सात मजली बँकेच्या बाजूला करावी असेही आवाहन भिक्खू पय्यानंद थेरो व संयोजन समितीतील सदस्यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments