Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*तत्काळ निर्णय घ्या अन्यथा आंदोलन तीव्र करू - अजित पाटील कव्हेकर यांचा इशारा*

तत्काळ निर्णय घ्या अन्यथा आंदोलन तीव्र करू - अजित पाटील कव्हेकर यांचा इशारा

भाजयुमोच्या आंदोलनाने मनपा प्रशासनाला जाग परंतु शहरातील कचर्‍याची परिस्थिती मात्र ’जैसे थे’

लातूर (प्रतिनिधी)

शहरातील कचर्‍याच्या समस्येसंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाने आंदोलन छेडल्यानंतर जाग आलेल्या मनपा प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस बजावली.युवा मोर्चाच्या आंदोलनाची पालिकेला दखल घ्यावी लागली.संबंधिताने कचरा उचलण्यासाठी आवश्यक वाहनांच्या संख्येत वाढही केली परंतु आजही शहरातील कचर्‍याची समस्या कायमच असून पालिकेने लवकरात लवकर शहर स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही तर आंदोलन तीव्र करु असा ईशारा भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी दिलेला आहे.

लातूर शहराला सध्या कचर्‍याचा विळखा पडला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाने ठेकेदार नेमलेला आहे. परंतु संबंधित ठेकेदार केवळ देखावा करून महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची बिले उचलित आहे.यातून ठेकेदार मालामाल होत असला तरी शहरातील नागरिक मात्र कचर्‍यामुळे त्रस्त झाले आहेत.

प्रत्येक कॉलनीत येणार्‍या घंटागाड्या बंद झाल्यामुळे घरात अनेक दिवस ठेवलेला कचरा नागरिक रस्त्यावर व रिकाम्या जागेत टाकत आहेत.यातील प्लास्टिक व कागद वार्‍याने उडून सर्वत्र पसरत आहेत.साठलेल्या कचर्‍याची दुर्गंधी शहरभर पसरलेली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याबाबत पालिकेला वारंवार माहिती देऊनही कार्यवाही केली जात नसल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे लातूर शहर जिल्हाच्यावतीने आंदोलन करत मनपाच्या दारात कचरा नेऊन टाकण्यात आला होता.त्यावेळी पालिकेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली होती.  

मनपा प्रशासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली.या आंदोलनानंतर मनपाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून जाब विचारला होता.त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत एकेकाळी देशात प्रथम क्रमांक पटकावणारे शहर पुन्हा स्वच्छ होईल, अशी आशा निर्माण झाली होती.पालिकेच्या नोटीसी नंतर संबंधिताने कचरा संकलन करण्यासाठी 5 ट्रॅक्टर व 10 घंटा गाड्यांची वाढ केली असल्याचे कळवले होते.

दि.5 जून रोजी शहर स्वच्छतेसाठी व शहरातील कचरा उचलण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस बजावण्याचे सोपस्कार पूर्ण केले. संबंधिताने वाहनांची संख्या वाढवत असल्याचे प्रशासनाला कळवले. प्रत्यक्षात मात्र शहराची बकाल अवस्था आजही कायमच आहे.शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग साठले आहेत.प्रत्येक रस्त्याच्या बाजूला नागरिकांनी टाकलेला कचरा उडून अनेकांच्या घरात जात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर खुल्या प्लॉटमधील कचरा कुजून त्याची दुर्गंधी येत आहे.पाऊस सुरू झाल्यानंतर हाच कचरा शहराला जलमय करण्यास कारणीभूत ठरणार आहे.या स्थितीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून निर्ढावलेल्या प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments