श्रमदान करून स्मशानभूमीत लावले वृक्ष !
वसुंधरा प्रतिष्ठानचा उपक्रम; २५ पर्यावरण पूरक झाडांची लागवड
लातूर :
वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने शहरातील सिद्धेश्वर मंदिर जवळील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत रविवारी श्रमदान करून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी श्रमदान करून खड्डे खोदण्यात आले. या मोहीमअंतर्गत एकूण २५ पर्यावरण पूरक विविध प्रकारची झाडे प्रतिष्ठानने स्व खर्चातून लावली.
वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या आठ वर्षांपासून लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्य स्व-खर्चातून करीत आहे. वृक्षांची चळवळ ही लोकचळवळ व्हावी यासाठी नवख्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले. वसुंधरा प्रतिष्ठानने राबविलेले सर्वच उपक्रम आता राज्यभरात अनुकरण केले जात आहेत. या उपक्रमात प्रामुख्याने झाडाचा गणपती, झाडांचे वाढदिवस, खिळेमुक्त झाड अभियान, सेल्फी विथ ट्री, झाडांसोबत मैत्री दिवस, पर्यावरण पूरक सण-उत्सव आदी उपक्रमांचा समावेश आहे. रविवारी वसुंधरा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत श्रमदान करून खड्डे केले. यावेळी कडुनिंब, बकुळी, आकाश मोगरा आदी २५ पर्यावरण पूरक झाडांची लागवड करण्यात आली. ही सर्व झाड ६ ते ७ फूट उंचीची लावण्यात आली.
अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी झाडाची सावली व्हावी आणि या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संवर्धन व्हावे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे प्रतिष्ठानने सांगितले.
या उपक्रमात बसवंतआप्पा भरडे, ज्येष्ठ विधिज्ञ गंगाधरआप्पा हामने, मन्मथआप्पा पंचाक्षरी, रामलिंगआप्पा ठेसे, भीमाशंकर अंकलकोटे, भीमाशंकर सोलापुरे, बाबू स्वामी, कैलास टेंकाळे यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, संस्थापक उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, कार्यकारी प्रमुख अमोलआप्पा स्वामी, कोअर कमिटी सदस्य शिवाजी निरमनाळे, उमेश ब्याकोडे आदींनी सहभाग घेतला.
*या पावसाळ्यात 'एक व्यक्ती:एक वृक्ष' अभियान*
*************************
वृक्षांची चळवळ गतिमान होण्यासाठी या चळवळीत सर्वांचा समावेश असणे गरजेचे आहे. प्रत्येकाला जगण्यासाठी झाडे मोफत ऑक्सिजन देतात. त्यामुळे वृक्ष लागवड आणि संवर्धन ही प्रत्येकाची महत्त्वाची जबाबदारी आहे. लातूर जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड आणि संवर्धन होण्यासाठी या पावसाळ्यात 'एक व्यक्ती : एक वृक्ष' हे अभियान राबविण्याची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन या माध्यमातून वसुंधरा प्रतिष्ठानने केले आहे.

Post a Comment
0 Comments