महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात पदवी विद्यार्थी आणि पालकांचे उत्साहात स्वागत
लातूर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शक सूचना आणि परिपत्रकाप्रमाणे दि. १५ जुलै २०२३ पासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.एस.डब्ल्यू. आणि बी.सी.ए. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचा श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक प्रा. जी. एम. धाराशिवे यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पहार देऊन तर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, कला शाखा समन्वयक डॉ. बाळासाहेब गोडबोले, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. दीपक चाटे, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. विजयकुमार सोनी, समाजकार्य समन्वयक डॉ. दिनेश मौने, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. यशवंत वळवी, बी.सी.ए. समन्वयक प्रा. सुप्रिया बिराजदार आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
आज बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.एस.डब्ल्यू. आणि बी.सी.ए. पदवी वर्गाचा महाविद्यालयातील पहिला दिवस असल्याने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना संस्थेचे संचालक प्रा. जी. एम. धाराशिवे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे महाराष्ट्रातील ०५ शाखांमधून शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात येणारा विद्यार्थी ग्रामीण व शहरी भागातील असून गरीब आणि गरजू विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. आज पालक आणि विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ बघून मनस्वी आनंद झाला.
यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयातील बी.ए., बी.एस्सी., बी.एस.डब्ल्यू., बी.कॉम., व बी.सी.ए. शाखेत शिकणारे विद्यार्थी व पालकांचा आज माझ्या महाविद्यालयातील समन्वयकांनी उपस्थित राहून सत्कार केला याचे मला विशेष समाधान आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद खोपे, बालाजी डावखरे, सुशील भोसले यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments