Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अण्णाभाऊ :परिवर्तनवादी साहित्यसम्राट-..

अण्णाभाऊ :परिवर्तनवादी साहित्यसम्राट-....


 महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वाड:मयीन चळवळीत अण्णाभाऊंचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते .मराठी वाङ:मय समृद्ध करण्याचे कार्य आपल्या परिवर्तनवादी लेखणीतून अण्णाभाऊंनी केले. आपल्या प्रतिभेचा ठसा मराठी साहित्यात उमटवताना अण्णाभाऊंनी सामान्य माणूस आणि त्याची नैतिकता प्रकर्षाने मांडली. साहित्यनिर्मिती हे पोट भरण्याचे व सत्ता - प्रतिष्ठा मिळवण्याचे साधन नसून ते नवनिर्मितीचे साधन आहे हे जगाला ठासून सांगितले.

           "माझी मैना गावाकडे राहिली 
           माझ्या जीवाची होतीय कायली "
हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील  कवन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमू लागले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारातून ,प्रतिभेतून  संयुक्त महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी समाज प्रबोधनातून त्यांचे कार्य कार्यान्वित झाले होते.सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊंचे स्थान अनमोल होते. अमर शेख, अण्णाभाऊ, व शाहीर गव्हाणकर या तिघांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गाजवली. चंदू, भराडकर, जंगमस्वामी, आत्माराम पाटील, लीलाधर हेगडे अशा शाहीर मंडळींसमवेत या त्रिमूर्तीने सारा महाराष्ट्र पिंजून काढला. आचर्य अत्रे, एस. एम. जोशी, सेनापती बापट या. संयुक्त महाराष्ट्राच्या मुलुखमैदान तोफांपूर्वी या शाहिरांच्या तोफा धडाडायच्या. त्याचकाळात त्यांनी बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळावर आधारित 'बंगालची हाक' हा रचलेला पोवाडा कमालीचा लोकप्रिय झाला. तत्कालीन कम्युनिस्ट पुढाऱ्यांच्या प्रभावामुळे अण्णाभाऊ त्या पक्षाकडे ओढले गेले. कम्युनिस्ट विचारधारा त्यांनी आपलीशी केली. या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी तमाशाचे माध्यम निवडले. त्याला तळागाळातील मजुरांचा, कामगारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वैशिष्ट्यपूर्ण नवतमाशांनाच पुढे 'वगनाट्य' हा शब्द रूढ झाला.प्रासंगिक, ऐतिहासिक लढ्यांवर अण्णाभाऊंनी अनेक पोवाडे, लोकगीते, लावण्या लिहिल्या. स्टॅलीनग्राडचा पोवाडा, बर्लीनचा पोवाडा, तेलंगणाचा संग्राम, अमळनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्या बाजाराचा पोवाडा असे अनेक अजरामर पोवाडे त्यांनी लिहिले .अण्णाभाऊंच्या जीवनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कमालीचा प्रभाव होता. 'जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव' हे त्यांचे कवन दलित चळवळीसाठी प्रेरणादायी ठरले. 'फकिरा' ही सर्वाधिक गाजलेली कादंबरी अण्णांभाऊनी डॉ. आंबेडकरांना अर्पण केली आहे. या कादंबरीच्या पुढे सोळा आवृत्त्या निघाल्या. आपल्या साहित्यातून त्यांनी पददलित समाजाचे जगणे समाजापुढे मांडले. 
 तत्कालीन सामाजिक परिस्थितीत दलित समाजाची उपेक्षा त्यांनी त्या दोन दिवसांतच अनुभवली. त्यामुळे शाळेला न जाण्याचा बंडखोर निर्णय घेऊन मातंग समाजातील ही ठिणगी जगण्याचा अनुभघेण्यासाठी थेट मुंबईला गेली. अण्णाभाऊंनी मग मुंबापुरीलाच कर्मभूमी मानले आणि अखेरपर्यंत त्यांनी  व्यवस्थेशी  संघर्ष केला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कधी कोळशाच्या वखारीत, कधी घरगड्याचे काम करून तर कधी हमाल, डोअ किपर, मजूर अशी कामे करून ते उदरनिर्वाह करीत होते. वाटेगावहून ते पायी मुंबईला आले होते. चिरागनगरीत केलेला मुक्काम हा कायमस्वरुपाचा ठरला.
वाटेगावचा हा सामान्य, दलित माणूस रशियाला जाऊन नावलौकिक मिळविला. मनुवादी वृत्तीने आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेने त्यांना शूद्र म्हणून वेशीबाहेर ठेवले, दूर लोटले. परंतु अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीने, परिवर्तनवादी वाडमयाने त्यावर मात केली. त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान दिला नाही. त्यामुळे त्यांचे साहित्यिक मोठेपण कमी झाले नाही. उलटपक्षी ते सर्वसामान्यांच्या, दलितांच्या मनावर अधिराज्य करू लागले. ज्या मनुवादी साहित्यिकांनी  शूद्र स्त्री आणि पुरुष यांना कधी माणूस म्हणून मानले नाही, त्यांना मानवतेचा हक्क मिळू दिला नाही, सतत त्यांची अवहेलना केली
 परंतु अण्णाभाऊंनी मात्र त्यांना खऱ्या अर्थाने नायक-नायिक बनविल्या. अन्याय-अत्याचारांविरुद्ध लढणारे, गोरगरीब, दीनदुबळे, शोषित, पीडित यांना मदत करणारे तसेच पिळवणूक करणाऱ्या शेठ, सावकार, जमीनदार यांच्याविरुद्ध बंड करणारे नायक आणि नायिका अण्णाभाऊंच्या लेखणीने साहित्याला, समाजाला, राजकीय पक्षांना दाखवून दिले.अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई, अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापऱ्या चोर, बिलंदर बडवे अशी कितीतरी प्रभावी वगनाट्ये त्यांनी लिहिली.  वेशीबाहेरचे खरे वास्तव जीवन आपल्या साहित्यातून  समाजासमोर  मांडले. 
समाजाने उपेक्षित केलेला हा वर्ग शरीराने भक्कम होता; पण सततच्या उपेक्षेमुळे मनाने काहीसा कमकुवत होत चालला होता. त्यांच्या वेदना, व्यथांना आपल्या साहित्यातून वाचा फोडली. त्यांनी सादर केलेल्या कथांमधील माणसे अतिशय रसरशीत आणि सशक्त आहेत. समाजाने, व्यवस्थेने नाकारलेल्या या माणसांच्या मनात कायम लढ्याची ठिणगी पेटलेली दिसून येते.अण्णाभाऊंच्या दर्जेदार साहित्याचे अनेक समीक्षकांनी आणि  साहित्यिकांनी तोंड भरून कौतुक केले .श्रेष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी तीन पैशांचा तमाशा हे नाटक अण्णाभाऊंना अर्पण केले, त्यावरूनच त्यांच्या साहित्यातील अभिजात दर्जाची प्रचिती येते.
तत्कालीन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही अण्णाभाऊंच्या साहित्य प्रतिभेबाबत गौरव केला होता. अस्सल अनुभव, समाज निरीक्षण, सामाजिक व आर्थिक विषमता हेच अण्णाभाऊंचे विद्यापीठ होते. त्यामुळेच त्यांच्या लेखणीला कमालीची धार होती. केवळ देशातच नव्हे, तर जगाच्या पाठीवरील सत्तावीस देशांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याला मान्यता मिळाली. आपल्या साहित्याच्या माध्यमातून दलित माणसांचा जागरच
जगात मांडला त्याची दखल देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवरही घेतली गेली. आशयगर्भ, कसदार साहित्यामुळे अण्णाभाऊंना दलितांमधील पहिला साहित्यसम्राट म्हणूनही मान्यता मिळाली. त्यांच्या साहित्यावर वीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनीआतापर्यंत पीएचडी केली आहे. लोकवाङमय,कथा, कादंबऱ्या, नाटके, लोकनाट्ये, चित्रपट गीते, पोवाडे,लावण्या, वग, गवळण, प्रवासवर्णन असे सर्वप्रकार अण्णाभाऊंनी केवळ हाताळलेच नाही,तर त्यावर आपली मोहोर उमटवली आहे.अण्णाभाऊंचा वाचनाचा व्यासंगही दांडगा होता. ऐन तारुण्यात त्यांनी खलील जिब्रान, गॅयकाव्हॉस्की, लिओ टॉलटॉय आदी जगद्विख्यात साहित्यिकांच्या तत्त्वज्ञांचा,साहित्याचा अभ्यास केला होता.
अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट विचारसरणीच्या 'लालबावटा ' युनियनमध्ये काम केले. त्या माध्यमातून मजुरांचे प्रश्न सोडविले त्यांनी कला पथकातून प्रबोधन केले. तमाशातील पारंपारिक गण, गवळणीला फाटा देऊन सामाजिक आशयाची गीते लिहिली, पोवाडे लिहिले आणि गाऊन जनजागृती केली. माकडीचा माळ, मास्तर, गुलाम,  वारणेचा वाघ या त्यांच्या कादंबऱ्या कमालीच्या गाजल्या. वैजयंता, आवडी,  चिखलातील कमळ,वारणेचा वाघ, अलगूज, फकिरा या त्यांच्या कादंबऱ्यांवर काढलेले चित्रपट खूपच गाजले होते .त्यापैकी चार चित्रपटांना विविध पारितोषिकेही मिळाली सामाजिक व साहित्य क्षेत्रात एवढे उत्तुंग काम करतील याची अपेक्षाही त्यावेळी कोणी केली नसेल. कम्युनिस्ट पक्षाची कास धरलेले अण्णाभाऊ समाजातील कर्मठ रूढी परंपरांचे चटके खाल्लेले वैचारिक साहित्यिक होते . त्यांच्यातील  शोधक नजर, तर्कनिष्ठ बुद्धिवाद आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती यामुळे त्यांचे वेगळेपण इतरांपेक्षा वेगळे दिसून येत. परिणामी, त्यांचे कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी कधीच पटले नाही. ते आंबेडकरी चळवळीकडे झुकू लागले. ते कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांना सहन झाले नाही. अखेरच्या काळात ते या पक्षापासून दुरावले.
 अण्णाभाऊंचे साहित्य  विद्रोही अविष्काराचे  माध्यम ठरले. समाजाच्या भावनांचा अचूक ठाव घेणारा लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊंना मान्यता मिळाली.  समाजातील अशिक्षितता, परंपरागत रूढी, परंपरा, जातीभेद, दैववादावर त्यांनी नेहमीच आपल्या साहित्यातून ताशेरे ओढले. त्याचकाळात प्रपंचिक आणि आर्थिक समस्यांनी ते वेढले गेले. सामाजिक जीवनातून काहीसे एकाकी पडलेल्या अण्णाभाऊंना निराशेने एवढे  ग्रासले की हा उच्च कोटीचा परिवर्तनवादी साहित्यसम्राट  आणि समाजप्रबोधनकार  खचून गेला. अखेर,  तुकाराम भाऊसाहेब साठे उर्फ अण्णाभाऊंनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. एक परिवर्तनवादी विचारांचे वादळ  अखेर शमले गेले....


डॉ.उमाकांत लक्ष्मण जाधव

Post a Comment

0 Comments